आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्र्यांच्या घरीही घेतले जेवण, त्याचा उल्लेख का नाही?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर सुरेश पाटील विषबाधाप्रकरणी गुरुवारी दुपारी महापौर शोभा बनशेट्टी, त्यांचे पती श्रीशैल बनशेट्टी आणि भाजपचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांचा जाबजबाब जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला. पालकमंत्र्यांच्या घरीही सुरेश पाटील यांच्यासह आम्ही जेवण घेतले होते. डाक बंगल्यातील अनेक बैठकांत हाेते. पण ते पाटील यांच्या लक्षात राहिले नाही. ते आम्ही पोलिसांच्या लक्षात आणून दिले, लिंगायत समाजात दुसरे नेतृत्व मोठे होऊ नये म्हणून आमची नावे गोवली गेली असल्याचा जबाब दिल्याची माहिती महापौर शोभा बनशेट्टी यांचे पती श्रीशैल बनशेट्टी यांनी दिली आहे.


नगरसेवक सुरेश पाटील विषबाधा प्रकरणात भाजपचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांच्यासह पाच संशयितांची नावे भाजप नगरसेवक सुरेश पाटील यांनी घेतली. या तक्रारीच्या अनुषंगाने होत असलेल्या चौकशीकामी जोडभावी पेठ पोलिस चौकीत गुरुवारी चौकशीसाठी बाेलावण्यात आले होते. अशोक निंबर्गी यांनी सांगितले, मी, महापौर शोभा बनशेट्टी आणि श्रीशैल बनशेट्टी यांनी जबाब दिला. तक्रारीच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे आम्ही दिली. प्रकरणात योग्य तो तपास पोलिस खात्याकडून निश्चित होईल. आणि या प्रकरणात जे कोणी दोषी असतील ते समोर आले पाहिजेत.

 

अशी आग्रहाची मागणीही आम्ही केली आहे. आमच्यावर राजकीय हेतूने प्रेरित होऊन जो खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्याला आम्ही सक्षमपणाने सामाेरे जाऊ. आम्ही निर्दोष आहोत, हे सप्रमाण शाबीत करण्याचा निर्धार व्यक्त करतो. सुरेश पाटील यांच्यावर ज्या कोणी नराधमाने विषप्रयोग केला असेल तो जनतेसमोर आलाच पाहिजे. त्यासाठी पोलिसांच्या तपास कामाला सहकार्य करणार आहोत. कोणाकडे याबाबतची माहिती असेल तर त्यांनी ती पोलिसांनाही द्यावी, असे आवाहनही करतो. सत्य निश्चितपणे बाहेर येईल.सुरेश पाटील विषबाधा प्रकरणात संशयाचे विष बाहेर पडल्यामुळे सोलापूरचे राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे.

 

... असे अपमानित होण्यापेक्षा राजीनामा देऊन बसलेले बरे
जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुरुवारी महापौर शोभा बनशेट्टी या भावविवश झाल्या. नंतर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता तेव्हा सुद्धा त्यांना रडू आवरणे अवघड जात होते. त्या म्हणाल्या, मी ज्याला भाऊ मानत होते त्यांनी माझ्याबद्दल असे केल्याने मला खूप मानसिक त्रास होत आहे. मी लिंगायत समाजाची आहे आणि लिंगायत समाजामध्ये माझे नेतृत्व वाढत असल्याने राजकीय डावपेच करीत काहीनी हा डाव रचला आहे. मी इज्जतदार घराण्याची आहे, एका स्त्रीबद्दल असे करणे चुकीचे आहे. प्रामाणिक काम करत असताना अशा किती अग्निपरीक्षा द्याव्या लागतील सिद्धरामेश्वरालाच माहीत. असे अपमानित होण्यापेक्षा राजीनामा देऊन घरी बसलेले बरे.


महापौर, त्यांचे पती, अन् भाजप शहराध्यक्षांचे पोलिसांकडे जाब जबाब
श्रीशैल बनशेट्टी - बऱ्याच महिन्यांनंतर आज तोंड उघडतील, उद्या तोंड उघडतील असे म्हणत म्हणत सुरेश पाटील यांनी एकदाचे तोंड उघडले. त्यांना साथ देणारे जे जे लोक होते, त्या सगळ्या लोकांना ते जे सांगत होते, त्याप्रमाणे त्यामागे वेगळाच माणूस आहे, असे सर्वांना वाटत होते. त्यांनी अशी नावे घेतली की कोणालाही या गोष्टीवर विश्वास बसणार नाही. मी एफआयआरची कॉपी पाहिली. त्यात अगदी छोट्या छोट्या घटनांचा उल्लेख आहे. अगदी जेवताना कोण कोण उपस्थित होते, तेही सांगितले आहे. पण या सगळ्यात मुंबईत काही मंत्र्यांकडे जेवायला गेल्याचा कुठेच उल्लेख नाही. पोलिसांनी मला विचारले कुठे कुठे जेवलो. आता जेवायला बसताना एकत्रच बसत असतो की. एकाच भांड्यातून भाजी घेतो. पण ते जर वाढताना कळाले नसेल, तेव्हा खटकले पाहिजे. तर सात आठ महिने झाल्यानंतर याचा उल्लेख होतो. सुरेश पाटील यांनी आपल्या लेकराची शपथ घेऊन सांगावे की, या या ठिकाणी मी या या लोकांबरोबर जेवलो. या पाच जणांमध्ये माझा उल्लेख झाला आहे. मी सांगतो, गेल्या पाच ते सहा महिन्यांत या माणसाने माझ्याबरोबर जेवण घेतले नाही, चहा घेतला नाही, पाणी घेतले नाही.

 

महापौरांनी जेवढ्या बैठका घेतल्या, माझ्या माहितीप्रमाणे सुरेश पाटील बैठकींना विरोध करीत होता. बैठकीला जात नव्हता. केवळ महापौरांना विरोध करीत होता. त्या प्रत्येक वेळी तो ताेंडावर आपटला. त्याचा राग काढण्यासाठी हा सर्व गोंधळ घातलेला आहे. काही मुद्दे लेखी, काही तोंडी सांगितल्याचेही बनशेट्टी म्हणाले.
 

शहाजी पवार, जिल्हाध्यक्ष, भाजप - सुरेश पाटील यांनी एवढे आरोप केले ते इतके उशिरा का केले? काही नाराजी असेल तर ही बाब पक्षाच्या अंतर्गतसुद्धा सांगण्यासारखी होती. ती माध्यमांच्या माध्यमातून सांगणे योग्य नाही. दवाखान्यातून आल्या आल्या त्यांना पक्षाकडे नाराजी व्यक्त करता आली असती. राजकारण होत असते, पण हे पक्षाचे राजकारण नाही. हे वैयक्तिक हेवेदावे आहेत. त्याचे हे पडसाद आहेत.

बातम्या आणखी आहेत...