आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅरा एशियन खेळाडूंना समान पारितोषिक मिळावे, पॅरास्विमर सुयश जाधवची अपेक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - एशियन गेम्समध्ये यश मिळवणाऱ्या खेळाडूंना सरकार पारितोषिके जाहीर करते. तशीच पारितोषिके पॅरा एशियन गेम्समध्ये यश मिळवणाऱ्या खेळाडूंनाही जाहीर होतात. पण त्यांची रक्कम वेगवेगळी असते, असे का? प्रत्येक खेळाडू यशासाठी कठोर परिश्रम करत असतो. मग त्याच्या पारितोषिकांच्या रकमेत फरक का? विशेषत: जेव्हा अपंग खेळाडू कुठल्याही स्पर्धेसाठी बाहेर पडतो, तेव्हा तंदुरुस्त खेळाडूपेक्षा त्याच्या समस्या अधिक जटिल स्वरूपाच्या असतात. सरकार हे लक्षात घेत नाही. 

 

दुसरी गोष्ट म्हणजे जाहीर केलेल्या पारितोषिकांची रक्कम स्पर्धा होऊन दोन वर्षे झाली तरी मिळत नाही. ती त्वरित मिळायला हवी. तसेच आता देशासाठी २०२० मध्ये टोकियो येथे होणाऱ्या पॅरा ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळवण्याचे माझे स्वप्न आहे, अशी भावना पॅरास्विमर सुयशने सोमवारी व्यक्त केली. 

 

विद्यार्थिदशेत एका अपघातात कोपरापासून दोन्ही हात गमवावे लागलेल्या जलतरणपटू सुयश जाधवने जकार्ता (इंडोनेशिया) येथे झालेल्या एशियन पॅरा गेम्समध्ये तब्बल तीन प्रकारांत पदके पटकावून इतिहास रचला आहे. देशाचे नाव तर त्याने उज्ज्वल केलेच आहे, पण आशिया खंडातील अव्वल खेळाडूंशी स्पर्धात्मक खेळात सुवर्णपदक पटकावले आहे. एशियन पॅरा गेम्समध्ये प्रथमच भारतीय खेळाडूने सुवर्णपदक मिळवले आहे. जकार्ता येथे नुकतेच पॅरा एशियन गेम्स पार पडले. या स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जलतरणपटू सुयश जाधवने ५० मीटर बटरफ्लाय प्रकारात (एस ७ गट) सुवर्णपदक मिळवले. देशाच्या खेळाडूने या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्याचा हा पहिला प्रसंग आहे. त्यामुळे देशासाठी मी अभिमानास्पद कामगिरी करू शकलो, याचा आनंद खूप मोठा आहे, असे सुयश म्हणाला. त्याने या स्पर्धेत २०० मीटर वैयक्तिक मिडले (एसएम ७) आणि ५० मीटर फ्रीस्टाइल (एस ७) या प्रकारांत कांस्यपदकांची कमाई केली. 

 

जागतिक दर्जाचे प्रशिक्षण सुरू 
सुयशचे प्रशिक्षक तपनकुमार पाणिग्रही म्हणाले, 'सुयशचे यश अन्य जलतरणपटूंसाठीच नव्हे, तर सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. खूप मोठी आव्हाने, संकटे आणि संघर्षानंतर त्याने हे यश प्राप्त केले आहे. टोकियो पॅरा ऑलिंपिकमध्येही त्याने असे यश मिळवावे, यासाठी आम्ही त्याला जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देत आहोत.' 

 

बातम्या आणखी आहेत...