आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोरणा गडावर गाडलेला दरवाजा खुला, अनेक वास्तुविशेष आले प्रकाशात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - वर्षानुवर्षे माती, धोंडे साचल्याने व त्यावर झाडझाडोरा फोफावल्याने गाडला गेलेला तोरणा गडावरील चित्ता दरवाजा दुर्गप्रेमी विद्यार्थ्यांनी सामूहिक प्रयत्नांतून उजेडात आणला आहे. हा दरवाजा खुला झाल्याने गडाच्या पश्चिमेकडील दुर्लक्षित वास्तुविशेष प्रकाशात आले आहेत. कुठल्याही सरकारी वा अन्य यंत्रणेच्या मदतीशिवाय 'स्वराज्याचे शिलेदार' या समूहातील विद्यार्थ्यांनी ही कामगिरी केली आहे. 

 

शिवछत्रपतींनी स्वराज्यस्थापनेचे तोरण बांधलेला गड म्हणजे किल्ले तोरणा. पुणे जिल्ह्यातील हा सर्वात उंच डोंगर असून, याची उंची १४०३ मीटर (४६०४ फूट) आहे. हा गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला असून, पूर्वेच्या दिशेने चढाईचा मार्ग वहीवाटीचा आहे. पुण्यातील विविध महाविद्यालयांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी 'स्वराज्याचे शिलेदार' या नावाने केलेल्या चढाईत तोरण्याच्या पश्चिमेकडील दुर्लक्षित बाजूचा भाग उजेडात आणला. मुख्यत: या शिलेदारांनी पश्चिमेकडील चित्ता दरवाजा पुन्हा खुला केला आहे. त्यामुळे तोरण्याच्या पश्चिमेकडील कापूर टाके, बुधला, दारूखाना, गंगजाई मंदिर, चिलखती बुरूज, घोडेजिन खांब असे वास्तुविशेषही प्रकाशात आले. या वास्तुविशेषांचा उल्लेख जुन्या नकाशात, संदर्भशास्त्रात, शासकीय दस्तऐवजात तसेच काही दुर्गप्रेमींच्या ग्रंथात आढळतात. पण गेल्या अनेक वर्षांत तोरण्याची पश्चिमेकडील बाजू दुर्लक्षित राहिल्याने बहुतेक दुर्गप्रेमीही पूर्वेकडे फिरतात व परत जातात. आता चित्ता दरवाजा उघडला गेल्याने तोरण्याचे पश्चिमेकडील निसर्गवैभव आणि वास्तुविशेषही पाहणे शक्य होणार आहे. 

 

आता जतनाची जबाबदारी मात्र पुरातत्त्व खात्यावर 
स्वराज्याच्या शिलेदारांनी केलेले काम योग्य साधनसामग्री व कुशल मनुष्यबळासह पुढे नेणे ही पुरातत्त्व खात्याची जबाबदारी आहे. आम्ही आमच्या पातळीवर जे शक्य होते, ते सर्व केले आहे. योग्य दिशेने प्रयत्न झाल्यास तोरणा गडा वरील अन्य वास्तुविशेषदेखील उजेडात येतील, अशी भावना दुर्गप्रेमी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. 

 

स्वराज्याच्या शिलेदारांची कामगिरी 
२०१३ मध्ये दुर्गप्रेमी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन गडकोटांच्या सफाईच्या उद्देशाने 'स्वराज्याचे शिलेदार' हा समूह स्थापन केला. समूहाचे सदस्य मंगेश नवघणे, सागर गुजर म्हणाले,'यापूर्वीही तोरण्याला आलो, पण या वेळी जुने नकाशे, पुस्तके, ग्रामस्थांची मदत घेऊन पश्चिमेकडे काम करण्याचे ठरवले. अर्थात आम्ही कोणतेही पुरातत्वीय काम नव्हे तर फक्त चित्ता दरवाजाच्या स्थाननिश्चितीचे प्रयत्न केले. वर्षानुवर्षे फोफावलेला झाडझाडोरा बाजूला केल्यावर जुन्या वास्तुविशेषांचे काही भाग दिसले म्हणून त्याभोवतीची माती, कचरा बाजूला केला. तेव्हा पूर्ण चित्ता दरवाजा गवसला. हे अगदी सहज घडले. मग आसपासचा सगळाच परिसर स्वच्छ केला. तेव्हा तटबंदी, बुरूज, बुधला, विहीर, माची असे सारेच दृश्यमान झाले. 

 

१६४६ मध्ये शिवबांनी तोरणा घेतला ताब्यात 
बहमनी काळात या उंच डोंगरावर प्रथम किल्ला उभारला गेला. १६४६ च्या सुमारास कोवळ्या वयात शिवाजी महाराजांनी हा दुर्गम किल्ला ताब्यात घेतला आणि त्याची योग्य ती डागडुजी करून तो भक्कम बनवला. दुर्ग वेल्हे तालुक्यात असला तरी मावळ भागातून गडाकडे येणारी वाट कालौघात दुर्लक्षित झाली होती. चित्ता दरवाजा त्याचाच एक भाग आहे. तो आता दीर्घकाळानंतर प्रकाशात आला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...