आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅन्ट्री विनापरवाना, बिल, दरपत्रक निघाले बनावट, प्रवाशांची लूट कोणार्क एक्स्प्रेस भिगवणजवळ रोखली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - विना तिकीट प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांवर कडक कारवाई होते. परंतु प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या कोणार्क एक्स्प्रेसच्या पॅन्ट्री चालकाकडे परवाना नसताना दुर्लक्ष केले जात असल्याचे समाेर आले आहे. परवाना दोन वर्षांंपूर्वीच संपला असताना तो खाद्यपदार्थांची विक्री करीत आहे. प्रवाशांना मागूनही बिल देत नाही. बिलावर जीएसटीचा उल्लेख नाही. विशेष म्हणजे नकली दरपत्रक वापरून आर्थिक फसवणूक करीत आहे. प्रवाशांची आर्थिक लूट राजरोस सुरू असताना रेल्वे प्रशासन तक्रारीची वाट पाहात आहे. मंगळवारी हा प्रकार उघड होताच भिगवणजवळ प्रवाशांनी कोणार्क एक्स्प्रेस रोखली होती. 

 

रेल्वे गाड्यांतील पॅन्ट्रीकारवर आयआरसीटीसीचे नियंत्रण आहे. जेवणाच्या दर्जावर अनेकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. जेवणात कधी अळ्या तर कधी झुरळ निघाल्याने प्रवाशांनी अनेकदा गाड्या रोखून धरल्याच्या घटना घडल्या. मंगळवारी संजीव उन्नी (रा. पुणे)हे कोणार्क एक्स्प्रेस बी २ डब्यातून पुणे ते सोलापूर असा प्रवास करीत होते. प्रवासात त्यांनी बिर्याणीची ऑर्डर दिल्यानंतर त्यांच्याकडून अधिक दराची मागणी करण्यात अाली. त्यांनी पॅन्ट्री चालकाकडे दरपत्रक मागितले. तर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. खाद्य पदार्थांचे बिल मागितले तर नकार दिला. नंतर जीएसटीचा उल्लेख नसलेले बिल हाती सोपवले. 


सर्वात गंभीर बाब म्हणजे पॅन्ट्रीकार चालकाकडील परवाना ७ जून २०१६ रोजी संपलेला आहे. विना परवाना जर पॅन्ट्रीतून खाद्य पदार्थांची विक्री होत असेल तर ते बेकायदेशीर आहेच. प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. रेल्वेतील पॅन्ट्रीकार चालकांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी रेल्वेमंत्री घोषणा करीत असले तरी प्रत्यक्षात प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. कोणार्क एक्स्प्रेसच्या पॅन्ट्री कार भोंगळ कारभारचा फटका प्रवाशांना बसत आहे. 


आयआरसीटीसीचे नियंत्रण 
पॅन्ट्री कारवर नियंत्रण आयआरसीटीसीचे असते. त्यामुळे रेल्वे त्यांच्यावर कारवाई करू शकत नाही. प्रवाशांची तक्रार आल्यानंतर आम्ही त्यांना कळवू.'' सुरेश चंद्र जैन, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, सोलापूर 


प्रवाशांच्या जीवाशी खेळ 
पॅन्ट्रीकार चालक उघडपणे प्रवाशांच्या जीवाशी खेळत अाहे. तर दुसरीकडे रेल्वे प्रशासन आयआरसीटीसीकडे बोट दाखवत जबाबदारी झटकत आहे. प्रवाशांची लूट करण्यासाठी बनावट दरपत्रकदेखिल तयार केले आहे. रेल्वेने या बाबीकडे गांभीर्याने पाहावे.'' संजीव उन्नी, प्रवासी, पुणे 

बातम्या आणखी आहेत...