आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही चॅनेलच्या सिग्नल प्रक्षेपणासाठी बीएसएनएल केबलला परस्पर जोडणी 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर सोलापूर. भारतीय दूरसंचार निगमच्या (बीएसएनएल) केबलला परस्पर जोडणी करून केबल प्रक्षेपण केल्याचा प्रकार नान्नज येथे उघडकीस आला असून, या चोरीत दूरसंचार खात्यातील काही अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप होत आहे. यामुळे विभागाला लाखो रुपयांचा चुना लागला आहे. अधिकाऱ्यांनी मात्र हा आरोप फेटाळत ती केबलच आमची नाही, असा पवित्रा घेतला आहे. 


दूरसंचार विभागाचे सर्वत्र फायबर केबलचे जाळे पसरले आहे. विभाग स्वतःच्या व्यवसायाच्या सेवा पुरवण्यासाठी या केबलचा वापर करतो. त्याच बरोबर खासगी संस्थांनाही सेवा भाडे तत्त्वावर उपलब्ध करून देतो. केबलच्या भाड्याचे दर प्रति किलोमीटर २० हजार रुपये वार्षिक आहे. सोलापूर शहरातून बार्शीला जाणारी दूरसंचार विभागाची फायबर केबल आहे. त्या फायबर केबलला जुना कारंबा नाका येथे केबल वाहिनी उघडून त्याला सोलापूर शहरातील एक स्थानिक केबल नेटवर्कचे कनेक्शन करण्यात आले. तेच कनेक्शन नान्नज येथे उघडण्यात आले. केलेल्या केबल जोडणीला कुठलीही परवानगी घेतली नसल्याचे दिसत आहे. याबाबत एका व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल होताच विभागातील अधिकाऱ्यांनी केबल कनेक्शन काढून टाकले आहे. कायदेशीर कारवाई बाबत त्यांना विचारणा केली असता ती केबल दूरसंचार विभागाची नाहीच, असा पवित्रा अधिकाऱ्यांनी घेतला. जिल्ह्यात आणखी काही ठिकाणी असे प्रकार होत असण्याची शक्यता आहे. अधिकारीच सामील असल्यास कारवाई करणार कोण? हा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा दरोड्यांमुळेच हा विभाग डबघाईला आला आहे. 

 

जुना कारंबा नाका व नान्नज येथे केबल जोडणीचा गैरप्रकार उघडकीस 
केबलमधून बेकायदा सिग्नल घेत असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. पण सदरप्रकरणी ती केबल आमची नसल्याचा अहवाल आमच्या स्थानिक अधिकाऱ्याने दिला आहे. आर. एल. उंबरजे, उपप्रबंधक, दूरसंचार विभाग, सोलापूर 

 

अधिकाऱ्यांकडे बोट 
या संदर्भात उप अभियंता एफ. जी. शेख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. सदर केबल बीएसएनएलची नसल्याचा दावा अधिकारी करत आहेत. मग अधिकाऱ्यांनी कारंबा नाका येथे जाऊन केबल जोडणी का काढली? हा प्रश्न उपस्थित होतो. 
जुना कारंबा नाका येथून सोलापूरहून बार्शीकडे गेलेले केबल उघडे आहे. 

 

घटनाक्रम काय सांगतो 
३ महिन्यांपूर्वी नान्नजमध्ये सोलापुरातील एका केबल कंपनीने प्रक्षेपण सुरू केले. केबल न ओढताच प्रक्षेपणामुळे संशय आला. 
१९ डिसेंबर रोजी बीएसएनएलच्या मुख्यालयात तक्रारदारांकडून तक्रार. त्यानंतर उप अभियंता शेख यांच्याकडे पाठपुरावा. पण कारवाई शून्य. 
२ जानेवारी रोजी तक्रारदाराची प्रबंधकांकडे चोरीबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी. प्रबंधक आर. एम. प्रधान यांनी चौकशीचे आदेश, शेख यांच्याकडेच चौकशी ती केबल बीएसएनएलची नसल्याचा अहवाल. 
२८ डिसेंबर रोजी प्रभारी प्रबंधक भोसले यांची भेट, दुपारी लगेचच शेख यांनी कर्मचारी घेऊन जुना कारंबा नाका येथे जाऊन केबल कट केली. भोसले यांची केबल बीएसएनएलची असल्याचे मान्य, पण पुढील कारवाई प्रबंधकांच्या अखत्यारित. 
 

बातम्या आणखी आहेत...