Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | news about unauthorized bus stops food

अनधिकृत बसथांब्यांवर पावती नसली तरी जेवण मिळते चांगले, बसचालकांचे 'दिव्य मराठी'ला अजब उत्तर

टीम दिव्य मराठी | Update - Aug 23, 2018, 05:05 AM IST

महामार्गांवरील काही एसटी बसथांब्यांवर "दिव्य मराठी'च्या प्रतिनिधींनी भेट दिली असता धक्कादायक बाबी समाेर आल्या आहेत.

 • news about unauthorized bus stops food

  नगर - महामार्गांवरील काही एसटी बसथांब्यांवर "दिव्य मराठी'च्या प्रतिनिधींनी भेट दिली असता धक्कादायक बाबी समाेर आल्या आहेत. "अधिकृत' बसथांबा नसूनही काही "अनधिकृत' ढाब्यांवर व हॉटेलांवर एसटी महामंडळाच्या बसेस अर्धा-अर्धा तास नाष्ट्यासाठी थांबत असल्याचे चित्र दिसले. अनधिकृत थांबा असूनही येथेच का थांबता, याबाबत जाफ्राबाद आगाराच्या एका बसचालकांकडे चौकशी केली असता, "हॉटेल अनधिकृत आहे हे आम्हालाही माहित आहे. येथे पावती मिळत नसली म्हणून काय झाले. जेवण तर चांगले मिळते,' असा खुलासा एेकायला मिळाला. वाहकानेही "हे हॉटेल माझ्या मित्राचे असल्याने तो माझ्याकडून पैसे घेत नाही,' असे स्पष्टीकरण दिले.

  नगर ते पुणे महामार्गावर नगर जिल्ह्यात इमामपूर घाटाजवळ हॉटेल लिलियम पार्क, वडाळा गावानजिक हॉटेल धनश्री, तर व्होल्व्हो बससाठी पुणे रोडवर हॉटेस स्माइल स्टोन येथे बसेसना अधिकृत थांबा आहे. मात्र दिव्य मराठीच्या प्रतिनिधींनी केलेल्या पाहणीत या मार्गावर जिल्ह्याच्या हद्दीत ६ ते ७ "अनधिकृत' हॉटेलांवर बसेस थांबत असल्याचे आढळून आले. या हॉटेलांवर बसेस थांबण्याचा अधिकृत बसथांबा असल्याच्या कोणत्याही सूचना लावलेल्या नाहीत. तरीही येथे बसेस थांबतात. याबाबत प्रवासी ओरड करत असले तरी बसचालक व वाहक त्यांना जुमानत नाहीत. त्यामुळे प्रवाशांचाही नाईलाज होतो.

  या ढाब्यांवर थांबणाऱ्या बसेस नगर आगाराच्या नसल्या तरी त्यातून प्रवास करणारे प्रवासी मात्र नगर जिल्ह्यातील असतात. त्यामुळे बाहेरच्या आगाराची बस अशा थांब्यांवर थांबली, तरी प्रवाशांच्या लुटीला व प्रवासामध्ये होणाऱ्या उशीराला एसटी प्रशासनच जबाबदार आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया काही प्रवाशांनी "दिव्य मराठी'कडे व्यक्त केल्या आहेत. एसटी महामंडळाने याबाबत खमकी भूमिका घ्यायला हवी, लांबच्या पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या बसचालक व वाहकांबद्दल सहानुभूती आहे. मात्र प्रवाशांच्या भावनांचाही विचार व्हायला हवा, अशी अपेक्षाही प्रवाशांनी व्यक्त केली आहे.


  नगर औरंगाबाद रोडवर घोडेगावपासून दोन किलोमीटर अंतरावर हॉटेल अन्नपूर्णा आहे. येथेही अनधिकृतपणे एसटी बसेस थांबतात. "दिव्य मराठीच्या प्रतिनिधी'ने याबद्दल जाफराबाद आगाराच्या बसच्या एका वाहकाकडे चौकशी केली. त्यावर त्यांनी "अधिकृत थांबा असलेले हॉटेल धनश्री हे पुण्याकडून येताना रस्त्याच्या उजव्या बाजूला आहे. हॉटेल धनश्रीच्या मालकानेच अन्नपूर्णा हॉटेल हे मित्राचे असल्याचे सांगितले आहे. तुम्ही तिथे थांबलात, तरी मला चालते, असे सांगितले आहे. त्यामुळे आम्ही तेथे थांबतो', असे अजब उत्तर दिले. पावती संदर्भात विचारले झाला असता वाहक म्हणाले, येथे पावती मिळत नाही, पण आम्हाला जेवण चांगले मिळते. लिलियम पार्क हॉटेलवर पावती मिळते. पण तिथे जेवण चांगले मिळत नाही. दरम्यान, दैनिक दिव्य मराठीने सुरू केलेल्या अनधिकृत बसथांब्याविषयी वृत्ताचे वाचकांनी स्वागत केले आहे. यासंदर्भात दैनिक दिव्य मराठी पाठपुरावा करत आहे.

  पण लक्ष कोण देतो?
  दोन दिवसांपूर्वी पुणे ते बीड बसमध्ये पुण्यातील शिवाजीनगर बसस्थानकात बसताना फक्त नगरचे प्रवासी बसा. मधल्या टप्प्यातील बसू नका, असे आम्हाला सांगण्यात आले. बस नगर जिल्ह्यात आल्यानंतर अचानक सुप्यातील गंगासागर ढाब्यावर थांबली. प्रवाशांना खोटे सांगून दिशाभूल केली कारण तेथील खाद्यपदार्थही निकृष्ट दर्जाचे होते. बसमध्ये आजारी प्रवासी होते. बस वेळेवर इच्छित ठिकाणी जाणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात पुण्याहून नगरला यायलाच पाच तास लागले. चालक व वाहकांना जेवण फुकट मिळत असले, तरी प्रवाशांना त्रास कशाला? याबाबत मंत्र्यांकडे तक्रार करणार आहे. - अॅड. गोकुळ बिडवे, नगर

  तक्रार करू तरी कोठे?
  माझे माहेर पुण्यात असल्याने नेहमी पुण्याला-जाणे येणे असते. तेथून लवकर घरी येऊन सायंकाळचा स्वयंपाक लवकर होईल, असे मनात असते. मात्र मध्येच बस थांबल्याने घरी परतायला उशीर हाेतो. जेथे बस थांबते तेथील खाद्यपदार्थांचे दर इतर ठिकाणच्या दरांपेक्षा अधिकच असतात. चिडचिड झाली तरी तक्रार कोठे करावी, हेच माहिती नसते. त्यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाणे या म्हणीची आठवण होते. एसटी महामंडळाने अशा बसथांब्यांवर प्रवाशांच्या सोयीसाठी तक्रारपेटी किंवा तक्रार नोंदवण्यासाठी फोन नंबर द्यायला हवा. जेणेकरुन प्रवाशांची गैरसोय हाेणार नाही.
  - दिप्ती शिंदे, प्राध्यापिका, नगर.

  'दिव्य मराठी'चे आभार
  'प्रवाशांच्या सेवेसाठी' असे एसटी महामंडळाचे ब्रीद आहे. आजपर्यंत याला एसटी प्रशासन प्राणपणाने जागत आले आहे. मात्र, महामार्गांवर प्रवास करणाऱ्या एसटी बसेस काही अधिकृत व अनधिकृत थांब्यांवर अर्धा-अर्धा तास थांबतात. या हॉटेलांवर तब्बल दीडपट दराने (निकृष्ट दर्जाचे) खाद्यपदार्थ प्रवाशंाच्या माथी मारले जातात, हे वास्तव आहे. प्रवासादरम्यान प्रवाशांना येणाऱ्या अडचणी नेमक्या काेठे सांगायच्या, हेच प्रवाशांना माहिती नसते. त्यामुळे 'दिव्य मराठी'ने या बाबी समोर आणल्याने प्रवाशांनी दिव्य मराठीचे सोशल मिडियावर, फोनवरुन आभार मानले आहे. प्रवाशांचा त्रास कमी व्हावा, हीच दिव्य मराठीची अपेक्षा आहे.

Trending