आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावर्धा- वर्धा जिल्ह्यातील पुलगावजवळील सोनेगाव (आबाजी) येथील लष्कराच्या केंद्रीय दारूगोळा भांडाराच्या (सेंट्रल अॅम्युनेशन डेपो) विस्तीर्ण आवारात वापरात नसलेली स्फोटके नष्ट करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, अपघातामुळे स्फोट होऊन त्यात खमारिया आयुध निर्माणीचा कर्मचारी आणि ५ मजुरांसह एकूण ६ जण मृत्युमुखी पडले, तर १० जण जखमी झाले. स्फोटके नष्ट करण्याच्या कामावर असलेल्या पथकाचा निष्काळजीपणा या स्फोटास कारणीभूत ठरल्याची प्राथमिक माहिती आहे.
घटनेतील जखमींवर सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संरक्षण मंत्रालयाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मंगळवारी सकाळी ७ ते ७:१५ दरम्यान झालेल्या भीषण स्फोटाचे आवाज एक ते दीड किमीपर्यंत ऐकू आले.
मृत मजुरांपैकी काहींचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळले.
> चौकशीचे आदेश : संरक्षण विभागाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीसाठी खमारिया आणि चंद्रपूर येथील आयुध निर्माणी आणि डेपोचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणात तूर्त अपघाती मृत्यूची नोंद झाल्याची माहिती नागपूर परिक्षेत्राच्या महानिरीक्षकांनी दिली. पोलिसांच्या वतीने देखील या घटनेची स्वतंत्रपणे चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.
> असा आहे डेपो : पुलगावजवळील सोनेगाव (आबाजी) येथे असलेला हा डेपो देशातील लष्कराच्या मोठ्या दारुगोळा डेपोंपैकी एक आहे. तेथे दारुगोळा ठेवण्यासाठी बंकर्सची व्यवस्था आहे. नागपूर, जबलपूर आणि भंडारा येथील आयुध निर्माणींमध्ये निर्मित होणारा दारुगोळा या डेपोत साठवला जातो. त्यामुळे या डेपोच्या परिसरात अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था असून त्यावर लष्कराच्या जवानांची २४ तास नजर असते.
> मृतांची नावे : जबलपूरच्या खमारिया आयुध निर्माणीचा कर्मचारी उदय वीरसिंग (३८), नारायण शामराव पाचारे (५५), विलास लक्ष्मण पचारे (४०) प्रभाकर रामदास वानखेडे (४० ), राजकुमार राहुल भोवते (२३), प्रवीण प्रकाश मुंजेवार
> ५ लाखांची आर्थिक मदत जाहीर : या घटनेतील मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपये आणि गंभीर जखमींना २ लाख रुपये, तर किरकोळ जखमा झालेल्या व्यक्तींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारने जाहीर केल्याची माहिती वर्धेचे पालकमंत्री व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
> कंत्राटदारांवर आरोप : कंत्राटदार शंकर व अशोक चांडक या भावांना स्फोटके नष्ट करण्याच्या प्रक्रियेतील जुजबी कामांचे कंत्राट दिले होते. त्यांच्यावर सोनेगाव आणि केळापूरच्या ग्रामस्थांकडून आरोप होत आहेत. कंत्राटदार मजुरांना कमी पैसे देऊन त्यांच्याकडून जोखमीची कामे करवून घेत होता. मजुरांना दुखापत झाल्यास कंत्राटदाराकडून मदत मिळत नव्हती.
> आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण : जखमी मजुरांना सावंगी मेघे येथील रुग्णालयात आणल्यावर २ तासांनी उपचार सुरू झाल्याचा आरोप महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारूलता टोकस यांनी केला. त्याचा प्रतिवाद करताना जखमींवर वेळेतच उपचार सुरू झालेत, असा दावा रुग्णालयाचे डॉ. राजीव बोरले यांनी केला. मला या घटनेची माहिती मिळताच मी लगेच रुग्णालयात दाखल झालो, असे डॉ. बोरले यांनी सांगितले. काँग्रेसकडून जखमींच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्याऐवजी राजकारण केले जात असल्याचे माजी खासदार दत्ता मेघे यांनी म्हटले आहे.
> स्फोटाआधी काय - काय घडले?
सूत्रांनुसार, जबलपूरच्या खमारिया निर्माणीतून वापरात नसलेल्या स्फोटकांचा साठा नष्ट करण्यासाठी सोनेगाव भांडार आवारात आणला होता. अधिकाऱ्यांच्या देखरेखीत मैदानात मोठे खड्डे खणल्यावर त्यात स्फोटके व वाळूची पोती टाकून ते नष्ट करणे अपेक्षित होते. त्यासाठी पुलगावच्या शंकर व अशोक चांडक या कंत्राटदारांनी खड्डे खणणे, पेट्या मैदानात आणणे व कचरा गोळा करण्यासाठी मजुरांना कामावर लावले होते. या कामादरम्यान स्फोट झाले.
> तज्ञांचा आरोप : अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा भोवला
घटनेस प्रक्रियेवर देखरेख असलेल्या अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला. स्फोटके नष्ट करण्याची प्रक्रिया सुरक्षित वातावरण व सर्वोच्च काळजी घेऊन पार पाडली जाते. मात्र, या घटनेत ते झाले नसल्याचे दिसत असल्याचे म्हणणे आहे.
> तीन दावे : यामुळे झाले स्फोट
- 1. स्फोटकांच्या पेट्या खाली पडल्या... सकाळी ट्रकमधून स्फोटकांच्या पेट्या काढून त्या आणल्या जात असताना त्या खाली पडून हा स्फोट झाल्याचा दावा काही प्रत्यक्षदर्शीकडून करण्यात आला आहे. नेमक्या कोणत्या स्फोटकांचा स्फोट होऊन हा अपघात झाला, याबाबत संरक्षण विभागाच्या प्रवक्त्याने मौन बाळगले आहे.
- 2. डिटोनेटर्समुळे स्फोट झाले : स्फोटके नष्ट करण्यासाठी डिटोनेटर्सचा वापर करण्यात येतो. स्थानिक लोकांनी डिटोनेटर्सचा स्फोट झाल्याचेही दावे या घटनेनंतर केले आहेत. त्यामुळे स्फोटाच्या नेमक्या कारणांबाबतचे प्रश्न अद्यापही अनुत्तरित असून तपास सुरू आहे.
- 3. रशियन तंत्रज्ञानयुक्त अॅम्युनेशन राउंड जबाबदार काही संरक्षण तज्ज्ञांनी रशियन तंत्रज्ञानाचा वापर असलेल्या २३ एमएमच्या शिल्का हे विमानविरोधी ‘अॅम्युनेशन राऊंड’ यासाठी जबाबदार ठरल्याच्या दावा केला आहे. या राउंडचा आकार सामान्य बंदुकीच्या गोळ्यांच्या तुलनेत बराच मोठा असतो. तांत्रिक कारणांमुळे आयुध निर्माणी मंडळाने या स्फोटकांचे उत्पादन २०१४ मध्येच बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
> येथेच अडीच वर्षांपूर्वी भीषण आगीत २० ठार
१ जून २०१६ च्या मध्यरात्री पुलगावच्याच दारूगोळा भांडारात स्फोटानंतर आगीत किमान २० जण मृत्युमुखी पडले होते. त्यात लष्कराचे अधिकारी, जवान आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
> स्फोटके नष्ट करण्यासाठी रोबोट वापरायला हवे
स्फोटके नष्ट करण्यासाठी प्रगत देशांत रोबोट वापरला जातो. येथेही रोबोटचा वापर झाला असता तर प्राणहानी टाळता आली असती, असे निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.