उत्तरेकडील थंड वाऱ्याने / उत्तरेकडील थंड वाऱ्याने राज्य गारठले; कोल्हापुरात दोन बळी, मराठवाड्यात आठवडाभर राहणार थंडी

दोघांचेही मृत्यू हे नैसर्गिक असून थंडीमुळे हृदयविकाराचा झटका आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. 

Dec 18,2018 07:54:00 AM IST

औरंगाबाद, नाशिक, पुणे- उत्तर भारतातून येणारे थंड वारे आणि महाराष्ट्रात वाढलेले हवेचे दाब यामुळे राज्य गारठले आहे. पश्चिम तसेच उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आठवडाभर थंडीचा मुक्काम राहणार असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले. आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीलगत बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे पूर्व विदर्भात पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, कडाक्याच्या थंडीमुळे कोल्हापुरात रस्त्यावर झोपलेल्या दोन व्यक्तींचा गारठून मृत्यू झाला आहे. सोमवारी सिन्नर (जि. नाशिक ) येथे राज्यातील सर्वात कमी ६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

वायव्य भारतातील पश्चिम विक्षोमामुळे (वेस्टर्न डिस्टर्बन्स) काश्मीर, हिमाचलमध्ये हिमवृष्टी होत आहे. परिणामी उत्तर भारतातून थंड वारे वाहत आहेत. या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील पारा घसरला आहे. पुणे वेधशाळेनुसार, मध्य महाराष्ट्राच्या किमान तापमानात लक्षणीय घट तर उर्वरित भागात किंचित घट झाली आहे. पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला.

सिन्नर येथे राज्यातील नीचांकी ६ अंश तापमानाची नोंद
सोमवारी सिन्नरचे तापमान ६ अंशांपर्यंत घसरले. आठवड्यापासून ८ ते ९ अंशांच्या आसपास पारा होता. २९ डिसेंबरला पारा ९.५ अंशांपर्यंत आला. त्यानंतर ८ ते ९ अंश होता. रविवारी ९.५ अंश तापमानाची नोंद झाल्यानंतर सोमवारी ३.५ अंशाने घसरण होऊन पारा ६ अंशांपर्यंत खाली आला.

थंडीमुळे हृदयविकाराचा झटका; दाेघांचा मृत्यू
थंडीमुळे कोल्हापुरातील कोंबडी बाजार रस्त्यावर झोपणाऱ्या २ व्यक्तींचा गारठून मृत्यू झाला. कडाक्याच्या थंडीचे राज्यातील हे पहिले बळी ठरले. खंडेराव दिनकर कारंडे असे एका मृताचे नाव आहे. दुसऱ्याची ओळख पटली नाही. दोघांचेही मृत्यू हे नैसर्गिक असून थंडीमुळे हृदयविकाराचा झटका आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

X