आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकताच्या पतीशी करायचे होते लग्न; तिची व मुलांच्या हत्येची दिली सुपारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- चंदननगर येथे २१ नोव्हेंबर रोजी एकता ब्रिजेश भाटी (३२) या महिलेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणी सुपारी किलर बापलेकांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात आणखी नवीन गुंता सापडला आहे. एकताचा नवरा ब्रिजेशसोबत लग्न करण्यासाठी दिल्लीतील महिलेने एकतासह तिच्या जुळ्या मुलांनाही ठार मारण्याचा कट रचल्याचे उघडकीस आले आहे.

 

यासाठी संध्याने १० लाखांची खंडणी दिली होती. सुदैवाने मुले यातून बचावली. संध्या विनय पुरी (३३) असे आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने तिला ७ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.  संध्याचे एकताचा पती ब्रिजेशसोबत काही वर्षांपासून अनैतिक संबंध होते. या संबंधात संध्याने ब्रिजेशला ६३ लाख रुपयांची मदतही केली. दरम्यान, लग्न करण्यासाठी ती मागे लागली होती. मात्र, आधीच लग्न होऊन दोन मुले झाल्याने ब्रिजेशने तिला नकार दिला. पैसे परत करण्यावरूनही त्यांच्यात वाद सुरू होते. दरम्यान, संध्या ही दोन जणांसोबत ब्रिजेशच्या पुण्यातील घरी येऊन गेली होती. त्यानंतर तिने ब्रिजेशचा भाऊ प्रतिमोहनला फोन करून ‘उसका खानदान खत्म कर दूंगी’ असा धमकीवजा इशाराही दिला होता. त्यानंतर तिने शिवलाल राव (३९) व मुकेश राव (१९, दोघे रा.दिल्ली, मू..रा. राजस्थान) या बापलेकांना एकतासोबत तिच्या जुळ्या मुलांच्या हत्येची दहा लाख रुपयांत सुपारी दिली. त्यानुसार, शिवलालने हैदराबादमधून ३ पिस्तुले व ३८ काडतुसे तीन हत्यांच्या उद्देशाने आणली होती. एकताची हत्या करून दोघेही पुणे रेल्वे स्थानकावरून झेलम एक्स्प्रेसने पळून जाण्याच्या तयारीत होते. त्यांना पोलिस निरीक्षक गजानन पवार यांनी पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्यावरच तीन गोळ्या झाडून पसार झाले. परंतु, अन्य पोलिसांनी दोघांनीही वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले.  

 

मुलांच्या शाळेचे लोकेशन होते महिला व आरोपींकडे   
ब्रिजेश यांचा मुलगा व मुलगी  हे वडगाव शेरी येथील संस्कृती विद्यालयात शिकतात. त्या शाळेच्या लोकेशनची माहिती संध्याने शिवलालला दिली होती. शिवलाल त्याच्या मोबाइलवरून संध्याची बहीण टीनाच्या मोबाइलवर संपर्क साधायचा. टीना त्याला संध्याशी कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जोडायची, अशी कबुली आरोपींनी दिली. पोलिसांनी संध्याचा लॅपटॉप व मोबाइल जप्त केला.

बातम्या आणखी आहेत...