आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
यवतमाळ- आगामी साहित्य संमेलनासाठी उद््घाटक म्हणून निवडण्यात आलेल्या लेखिका आणि भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पुतणी नयनतारा सहगल यांना आता नकार कळवण्यात आला आहे. इंग्रजीमध्येच लेखन करणाऱ्या लेखकाच्या हस्ते संमेलनाचे उद््घाटन होऊ देणार नाही, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली होती. या पार्श्वभूमीवर नयनतारा यांना उद््घाटक म्हणून दिलेले निमंत्रण मागे घेतल्याचे अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजक समितीकडून कळवण्यात आले आहे. यासंदर्भात त्यांना पत्रही पाठवण्यात आले आहे.
९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ११, १२ आणि १३ जानेवारी रोजी यवतमाळात होणार आहे. या संमेलनाच्या अनुषंगाने जय्यत तयारी सुरू आहे. अशात मराठी साहित्य संमेलनात उद््घाटक म्हणून लेखिका नयनतारा सहगल यांचे नाव साहित्य महामंडळाने आयोजन समितीला सुचवले होते. त्या दृष्टीने उद््घाटक म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. मात्र, त्यांचे नाव निश्चित झाल्यानंतर विविध प्रकारच्या वावड्या उठवण्यात आल्या होत्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संमेलनाच्या उद््घाटक म्हणून सहगल यांच्या नावाला विरोध दर्शवण्यात आला. यात प्रामुख्याने सहगल यांच्या भाषा लेखनाबद्दल अनेकांनी आक्षेप घेतला होता. त्यांना संमेलनाच्या उद््घाटनास बोलावल्यास आम्ही संमेलन उधळून टाकू, असा इशाराही मनसेकडून देण्यात आला होता. या प्रकारामुळे संमेलनाच्या आयोजनावर विपरीत परिणाम पडू नये म्हणून आयोजन समितीने याची कल्पना महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांना दिली. एकंदरीतच प्रकरण चिघळू नये आणि त्याचा परिणाम संमेलनाच्या आयोजनावर होऊ नये, म्हणून आयोजन समितीने लेखिका नयनतारा सहगल यांना लेखी पत्र लिहून निमंत्रण मागे घेण्यात येत असल्याचे कळवण्यात आले. त्यामुळे त्या साहित्य संमेलनाला उपस्थित राहणार नाही, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांनी प्रसिद्धिपत्रकातून दिली आहे.
ही महामंडळाची नव्हे, आयोजकांची भूमिका
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडून संमेलनासाठी कुणालाही निमंत्रित केले जात नाही. आयोजकच ते ठरवतात. त्यामुळे सहगल यांना निमंत्रित करण्याचे व त्यानंतर न येण्याबाबत आयोजकांनीच कळवले आहे. महामंडळाच्या निर्देशानुसार त्यांना कळवल्याचे चुकीचे आहे. विरोधाच्या पार्श्वभूमीवर आयोजकांनी असे न केल्यास संमेलनच होऊ शकणार नाही. म्हणूनच आयोजकांनी ही भूमिका घेतली आहे. महामंडळ लेखकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदरच करते. महामंडळ स्वत: कधीही नयनतारा सहगलांसारख्यांना बोलावू नका, असे म्हणणार नाही. महामंडळास तसे म्हणण्याचे कोणते कारणही नाही. - श्रीपाद जोशी, अ.भा. मराठी साहित्य महामंडळ
सहगल यांना न येऊ देण्याची भूमिका चुकीची : तावडे
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नयनतारा सहगल यांना त्यांची भूमिका मांडू द्यावी. ती भूमिका पटली नाही म्हणून विरोध झाला तर समजू शकतो. पण, त्यांना संमेलनात येऊ न देण्याची भूमिका चुकीची आहे, अशा शब्दांत सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी भूमिका मांडली आहे. तावडे म्हणाले, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कोणत्याही वादविवादापासून दूर राहून झाले पाहिजे. पुरोगामी महाराष्ट्र हा प्रत्येकाला आपली प्रतिभा व्यक्त करण्याची संधी देणारा आहे. सहगल यांनी संमेलनात येऊन भूमिका मांडल्यानंतर त्याला विरोध झाला तर ते समजून घेऊ शकतो. मात्र, त्यांना येऊ न देणे योग्य नाही. साहित्य संमेलनात वाद होऊ नयेत, असे माझे स्पष्ट मत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.