आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नाशिक- गडकरी चाैकातील आयुक्तांच्या आलिशान बंगल्याचा ताबा बदलीला महिना उलटल्यानंतरही तुकाराम मुंढे साेडत नसल्यामुळे महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी थेट नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे तक्रार करीत या बेकायदा वास्तव्याकडे लक्ष वेधले आहे. मुंढे यांनी मुलांच्या शिक्षणाचे कारण देत मार्च २०१९ पर्यंत बंगल्यासाठी हट्ट धरताना जाे नियम पुढे केला त्याचाही पंचनामा करीत गमे यांनी मुंढेंना नाशिकमध्ये निवासस्थान द्यायचे तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मिळकतींमधून द्यावे, अशीही मागणी प्रधान सचिवांकडे केल्याचे वृत्त आहे.
मुंढे यांची नऊ महिने १४ दिवसांची अल्प कारकीर्द वादात ठरली. १२ वर्षात १३ बदल्या अशा संघर्षमयी वाटचालीमुळे चर्चेत असलेल्या मुंढे यांना बदलीविषयी फार काही वाटत नव्हते. त्यामुळे कार्यकाळ पूर्ण हाेण्याआधी बदली झाली तरी ते रुसवा-फुगवा व कॅटसारख्या न्यायाधीकरणाकडे दाद न मागता नवीन नियुक्तीच्या ठिकाणी हजर हाेत हाेते. याेगायाेगाने प्रत्येकवेळी मुंढे यांना 'क्रीम पाेस्ट' मिळत असल्यामुळे बाकी काही अडचणी येत नव्हत्या; मात्र नाशिकमध्ये सत्ताधारी भाजपला झटके देण्याची बाब त्यांच्या अंगलट येऊन त्यांना मंत्रालयातील नियाेजन विभागात सहसचिव या तुलनेत दुय्यम पदावर नियुक्ती दिली गेली. त्यातून पुढे मुंढे हजर झाले नाही, की त्यांना या खात्याच्या मंत्र्यांनी हजर करून घेतले नाही अशी चर्चा झाली. यात २२ नोव्हेंबर २०१८ रोजी झालेल्या बदलीनंतर मुंढे तब्बल महिनाभर नियुक्तीच्या प्रतीक्षेत हाेते. काेणत्याही खात्याचे मंत्री त्यांना घेण्यासाठी तयार नसल्याची चर्चा बघता अखेर मुख्यमंत्री कार्यालयाने एडस् नियंत्रण सोसायटीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती दिली. या पदावर मुंढे हजर झाल्याचे वृत्त असले तरी, अद्याप त्यांचा मुक्काम महापालिकेच्या आलिशान बंगल्यातच आहे.
दरम्यान, मुंढे यांच्या जागी आलेल्या गमे यांनी उस्मानाबादवरून तातडीने आपला सर्व लवाजमा नाशिकमधील खासगी निवासस्थानात हलवला हाेता. मुंढे यांच्या परिवाराचे स्थलांतरण, त्यांना नवीन नियुक्ती मिळण्यापर्यंत निवासस्थान न मागण्याचे साैजन्यही त्यांनी दाखवले. मध्यंतरी त्यांनी स्वत:ही मुंढे यांची भेट घेत निवासस्थानाची गरज बाेलून दाखवली हाेती. मुंढे यांना नुकतीच नवीन नियुक्ती मिळाली व त्यामुळे बंगला मिळेल अशी गमे यांना आशा असताना मुंढे यांनी एका शासननिर्णयाचा आधार घेत मार्च २०१९ पर्यंत महापालिकेचे निवासस्थान मिळण्याची मागणी केली व शासनाने ती मान्यही केल्याने गमे अवाक् झाल्याचे वृत्त आहे. त्यातूनच गमे यांनी तातडीने कायद्यातील तरतुदीवर बाेट ठेवत प्रधान सचिवांचेच याकडे लक्ष वेधले आहे.
ताे नियम केवळ पीडब्लूडीसाठीच
आयुक्त बंगल्यावर दावा केला जात असल्याचा शासन निर्णय केवळ सार्वजनिक बांधकाम विभागासाठीच लागू असल्याचा युक्तिवाद गमे यांनी केल्याचे समजते. त्यामुळे पालिका बंगल्याची ताबेदारी बेकायदेशीर ठरते याकडे लक्ष वेधल्याचे वृत्त आहे. मुंढे यांना मुलांच्या शैक्षणिक कारणासाठी नाशिकमध्ये शासकीय निवासस्थान हवे असेल तर शासनाच्या वाटप समितीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मिळकतींमधून अन्यत्र जागा उपलब्ध करून द्यावी, अशीही विनंती गमे यांनी केल्याची चर्चा आहे.
बंगल्यावरील कर्मचारीही काढण्याच्या हालचाली
या बंगल्यावर साधारण सात कर्मचारी सध्या काम करीत असून त्यात चार शिपाई, तीन स्वयंपाकी व अन्य काम करणाऱ्या महिला कर्मचारी असल्याचे समजते. या सर्वांना महापालिकेत बाेलावण्याच्या हालचालीही सुरू झाल्याची चर्चा आहे.
कृष्णा यांनीही साेडला हाेता बंगला
महापालिका आयुक्तपदावरून अभिषेक कृष्णा यांची अचानक बदली झाल्यानंतर त्यांनाही वयाेवृद्ध आई-वडील व सहा महिन्यांचा मुलगा बघता बंगला हवा हाेता मात्र त्यांनी साधारण महिनाभरात हे निवासस्थान रिक्त करून मुंबईत स्थलांतरण केले हाेते. तत्पूर्वी डाॅ. प्रवीण गेडाम यांनीही बदलीनंतर बंगल्याचा हट्ट धरला हाेता. त्यावेळी कृष्णा व त्यांच्यातील संघर्ष चर्चेत हाेता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.