आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नायझेरियन टोळीचा गंडा, विधवा महिलेची साडेसोळा लाख रुपयांनी फसवणूक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- शहरात राहणाऱ्या एका विधवा महिलेेसोबत सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर आपण अमेरिकेत उच्च पदावर कार्यरत असून, तुझ्यासाठी ७२ लाख पाठवत आहे, असे सांगून या महिलेला टप्प्याटप्प्याने तब्बल १६ लाख ५७ हजार रुपयांनी गंडवल्याची घटना शनिवारी (दि. १२) उघड झाली. फसवणूक करणारी ही नायझेरियन टोळी असावी, असा अंदाज सायबर पोलिसांनी वर्तवला आहे. यापूर्वीही नायझेरियन टोळीने शहरातील काही व्यक्तींना गंडवले आहे. 


राधानगर भागात एक विधवा महिला तिच्या मुलीसह राहते. काही दिवसांपूर्वीच तीने स्वत:चे घर विकले आहे, त्यामुळे घर विकून आलेली रक्कम महिलेकडे होती. दरम्यान, २० सप्टेंबरला या महिलेला सोशल मीडियावरून अॅलेक्स माशल नावाच्या व्यक्तीची 'फ्रेन्ड रिक्वेस्ट' आली. तिने ती स्वीकारली. त्यामुळे अॅलेक्स आणि या महिलेचे चॅटींग सुरू झाले. एकमेकांबाबत दोघेही माहितीची देवाण घेवाण करू लागले. दरम्यान, दोघांनीही एकमेकांच्या व्हाट्सअॅप क्रमांकाची देवाण घेवाण केली. त्यानंतर महिलेने अॅलेक्सला सांगितले की, माझ्या पतींचे निधन झाले असून मी माझ्या मुलीसह राहते व खासगी नोकरी करते. दरम्यान अॅलेक्सने सांगितले की, माझ्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यामुळे मी एकाकी पडलो आहे. मी अमेरिकेतील एका मोठ्या शिपींग कंपनीमध्ये वरिष्ठ व्यवस्थापक आहे. माझ्याकडे भरपूर पैसे असून ते ठेवण्यासाठी जागा नाही. त्यामुळे ६० हजार अमेरिकनन डॉलर व काही ज्वेलरी तुझ्याकडे पाठवून देते आणि काही दिवसात मी पण भारतात येते. असे सांगून त्याने लगेच एका पार्सलचा फोटाे या महिलेला पाठवला, त्यामुळे अमेरिकेतून पार्सल निघाले, असा विश्वास या महिलेला आला. 


दरम्यान, तीन दिवसांनी शहरातील महिलेला एका महिलेचा फोन आला. तिने सांगितले की, मी दिल्लीच्या आंतररराष्ट्रीय विमानतळावरून बोलत असून तुमच्या नावावे आलेले पार्सल पकडले आहे. ते सोडवण्यासाठी ३५ हजार  रुपये लागतील. त्यामुळे त्याच महिलेने दिलेल्या खाते क्रमांकावर विधवा महिलेने रक्कम ट्रान्सफर केली. त्यानंतर दुसरा फोन आला कि, पार्सल स्कॅन केले असता त्यामध्ये डायमंड ज्वेलरी आणि डॉलर आहे, त्यावर विविध प्रकारचे कर लागल्याचे सांगून सव्वा लाख, अडीच लाख, पुन्हा अडीच लाख अशा पध्दतीने या टोळीने विधवा महिलेकडून रक्कम उकळणे सुरू केले. दरम्यान, पार्सल सुटण्यापुर्वीच अॅलेक्ससुद्धा भारतात आल्याचे महिलेला सांगण्यात आले. त्यालासुद्धा ४० हजार अमेरिकन डॉलर घेेऊन पकडलेे.

 

तो तुमच्याकडेच येत असल्यामुळे त्याची सुटका करण्यासाठी पुन्हा काही रक्कम महिलेकडून ऑनलाइन मागण्यात आली. अशा प्रकारे सप्टेंबरपासून महिलेकडून तब्बल १६ लाख ५७ हजार पाचशे रुपये उकळले मात्र तो अॅलेक्सही दिसला नाही, त्याने पाठवलेले पार्सलही चार महिन्यात आले नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे महिलेला लक्षात आले. महिलेने या प्रकरणी शनिवारी सायबर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून सायबर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, शहरात यापूर्वीही नायजेरियन टोळीने नागरिकांना गंडवल्याचे प्रकार घडल्याच्या नोंदी पोलिस दप्तरी आहेत.  


नायझेरियन टोळीचा प्रताप 
यापूर्वीही शहरातील दोन ते तीन व्यक्तींची याच प्रकारे आर्थीक फसवणूक झाली आहे. या प्रकारचा गुन्हा केल्याप्रकरणी आम्ही दीड वर्षांपूर्वी नाायझेरियन टोळीला अटक केली होती. हा गुन्हासुद्धा नायझेरियन टोळीने केल्याचा अंदाज आहे, त्यादिशेने आम्ही तपास सुरू केला आहे. कांचन पांडे,एपीआय, सायबर पोलिस ठाणे. 
 

बातम्या आणखी आहेत...