आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चला मौन सोडू, आता बोलू, मराठवाड्यातील पाच शहरांत अंधारावर मात केली रातरागिणींनी

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - Divya Marathi
उस्मानाबाद

औरंगाबाद : त्यांना ना अंधाराची भीती वाटली ना समाजाची... सर्वच जाेखडांतून मुक्त हाेण्याच्या इराद्यानेच त्यांची पावले रात्रीचा अंधार चिरत बंधनमुक्त हाेण्याच्या प्रगल्भ इच्छेतून कार्यक्रमस्थळाकडे झपाझपा पडू लागली. जाे अावडेल ताे पेहराव तिने केला. स्त्रीमुक्तीच्या गगनभेदी घोषणा देत त्या रॅलीत सहभागी झाल्या. हजारो रातरागिणींनी 'दिव्य मराठी'चा उपक्रम आनंदोत्सवात बदलून टाकला. हजाराे रातरागिणी वर्षातील सर्वात मोठी रात्र असलेल्या २२ डिसेंबरच्या रात्री अंधारावर चालून गेल्या. 'दिव्य मराठी'च्या 'अंधारावर चालून जाणार रातरागिणी' हा 'नाइट वॉक'उपक्रम त्यांच्यासाठी केवळ निमित्त होता. महाराष्ट्रातील सुमारे २३ शहरांतील रातरागिणींनी अंधारावर मात करत महिलाशक्तीचे प्रदर्शन केले. मराठवाड्यात बीड, उस्मानाबाद, जालना आणि नांदेड या शहरातील रातरागिणी अंधारावर चालून गेल्या. 'दिव्य मराठी'च्या 'चला मौन सोडू, चला बोलू' अभियानांतर्गत 'नाइट वॉक' उपक्रम रविवारच्या रात्री राबवला गेला. या उपक्रमाला औरंगाबाद शहरासह बीड, जालना, उस्मानाबाद आणि नांदेड या शहरांत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उस्मानाबाद शहरात महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. महिलांनी प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र येत शहरातून रात्री १० ते १ वाजेपर्यंत नाइट वॉक केला. यामध्ये विविध महिला संघटना, विद्यार्थिनी, लहान मुलीही सहभागी झाल्या होत्या. उपक्रमात सुमारे साडेचार हजार महिला सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे उस्मानाबादेत हा नवा इतिहास घडला आहे. दरम्यान, या आकडेवारीला पोलिस विभागानेही दुजोरा दिला आहे. औरंगाबाद शहरात तर नाइट वॉकला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

नांदेडमध्येही अनामिक भीतीला तिलांजली

नांदेड : 'दिव्य मराठी'च्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील स्त्रीमुक्ती संघटनेच्या वतीने रविवारी रात्री नाइट वाॅकचे आयोजन करण्यात आले. अंधारावर मात करीत ५० पेक्षा अधिक महिलांनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले पुतळ्यापासून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत रॅली काढली.
सातच्या आत घरात या बालपणापासून मनावर रुजवलेल्या संस्कारामुळे महिलांच्या मनात अंधाराविषयी एक अनामिक भीती असते. ही भीतीच त्यांच्यावर येणाऱ्या आपत्तीचे मूळ कारण असते. ही अनामिक भीती मनातून निघून जावी, स्त्री दास्याच्या जोखडातून महिलांची मुक्तता व्हावी या उद्देशाने नांदेडसह २३ जिल्ह्यांत नाइट वाॅकचे आयोजन केले. त्याला सुप्रिया गायकवाड, अॅड. अस्मिता वाघमारे, डाॅ. शिल्पा धुमाळ आदी स्त्रीमुक्ती संघटनांनी प्रतिसाद देत नाइट वाॅकचे आयोजन केले. केवळ काही तासांच्या एका निमंत्रावरण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा शहरात फारसा गाजावाजाही करण्यात आला नाही. तरीसुद्धा मध्यरात्रीच्या सुमाराला ५० पेक्षा अधिक महिलांनी या नाइटमध्ये सहभाग नोंदवला. स्त्री मुक्तीच्या दिशेने हे टाकलेले पहिले पाऊल ठरले.

महिलांनी मध्यरात्रीच्या सुमाराला घराबाहेर पडून नाइट वाॅक करण्याचे शहराच्या इतिहासात अशी घटना प्रथमच घडली. याबाबत बोलताना सुप्रिया गायकवाड म्हणाल्या, समाजात जी पुरुष प्रधान संस्कृती आहे त्यामुळे स्त्रीवर बंधने लादण्यात आली. आधुनिक काळात स्त्री शिक्षित झाली आहे. तिला कोणतेही बंधने लादलेली चालत नाहीत. राज्यघटनेने लिखित स्वरूपात जे अधिकार दिले ते डावलून अलिखित नियमात महिलांना जखडून ठेवण्याच्या परंपरा आहेत. त्या झिडकारण्याची गरज आहे. त्या दृष्टीने हा नाइट वाॅक महत्वाचा आहे. सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून या नाइट वाॅकची सुरुवात करण्यात आली. याचे कारण स्त्री शिक्षणाचा पाया त्यांनी रचला. त्यासाठी त्यांना अतोनात छळ सहन करावा लागला. त्यांच्यामुळेच स्त्री आज शिक्षित होऊ शकली. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या नाइट वाॅकची सांगता करण्यात आली. याचे कारण महिला मुक्तीमध्ये बाबासाहेबांचे मोठे योगदान झाले. स्त्री कशी मुक्त होऊ शकेल ही संकल्पना त्यांनी मांडली. त्यांनीच राज्यघटनेत महिलांना समान अधिकार दिले. आंबेडकर पुतळ्याजवळ महिलांनी स्त्री मुक्तीची गाणी गाऊन या अभियानाची सांगता केली. विशेष म्हणजे महात्मा फुले पुतळा ते डाॅ. आंबेडकर पुतळा दरम्यान महिलांचा नाइट वाॅक महिलांनीच पूर्ण केला. त्यावेळी त्यांच्यासोबत एकही पुरुष नव्हता.

जालन्यातील रातरागिणींनी मौन सोडले

रविवारच्या रात्री शहरातील हजारो महिला 'माैन साेडू, चला बाेलू' म्हणत या नाइट वाॅकमध्ये सहभागी झाल्या हाेत्या. सर्वच स्तरातील महिलांनी या नाइट वॉकमध्ये सहभागी होऊन आपले मौन सोडले. रात्र ही वैरी नसून अंधारावर मात करत जगण्याची प्रेरणा अधिक सक्षम करणारी असल्याचा संदेश देत हा नाइट वाॅकचा साेेहळा ऐतिहासिक बनवला. एरवी शुकशुकाट असणारा मामा चौक ते शिवाजी पुतळा मार्ग रविवारी रात्री महिला शक्तीच्या तेजाने उजाळून निघाला.

अमेरिकेतून आवर्जून आल्या दोन दिवस अगोदर

जालन्यात शिकलेल्या परंतु सध्या अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे स्थायिक असलेल्या गीता तरुण मेहरा यांना रातरागिणीचा कार्यक्रम होत असल्याची माहिती मिळाली. त्यांना जालन्यात यायचेच होते, परंतु दोन दिवस अगोदर आवर्जून या कार्यक्रमासाठी लवकर आल्या. या कार्यक्रमात त्यांनी अमेरिका व भारत देशातील महिलांबाबत असलेल्यांवर मार्गदर्शन केले. भारतात महिलांना असलेले स्वातंत्र्य व अमेरिकेत महिलांना असलेले स्वातंत्र्य व त्या ठिकाणच्या महिलांच्या अत्याचाराच्या घटनांबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी आता जालना सुध्दा चांगल्यापैकी बदलला असल्याचे सांगितले. डॉ. निधी विनीत साहनी यांनीही मार्गदर्शन केले.

उस्मानाबादेत सामान्य कुटुंबातील महिलेने केली ज्वाला प्रज्वलित

उस्मानाबादच्या जिजाऊ चौकातून रात्री १० वाजता नाइट वाॅकला सुरुवात झाली. या वेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मंुडे, उपविभागीय पोलिस अधिकारी मोतीराम राठोड, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील, नगरसेविका प्रेमाताई पाटील, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, डॉ.स्मिता शहापूरकर आदींची उपस्थिती होती. या वेळी सर्वात पुढे महिलांचे ढोल-ताशा पथक, त्यानंतर लाठ्या-काठ्यांचे प्रात्यक्षिक, तायक्वांदोच्या मुली, संबळ-आराध गीत गाणाऱ्या महिला होत्या. शहरातील विविध शाळा-महािवद्यालयातील विद्यार्थिनी, परिचारिका, डॉक्टर्स महिला, वकील महिला, शिक्षिका, अंगणवाडी सेविका, उद्योजिका, सामाजिक क्षेत्रातील महिला, गृहिणी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. जिजाऊ चौक ते लेडीज क्लब, संत गाडगेबाबा चौक, डॉ.बाबासाहेब अांबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत नाइट वाॅक गेल्यानंतर या मार्गावरून परत जिजाऊ चौकात या उपक्रमाचा समारोप झाला.

बीड शहरासह माजलगावातही निघाली रॅली

बीड : रविवारी (दि. २२) रोजी रात्री आठ वाजता माजलगाव शहरात तर साडेनऊ वाजता बीड शहरात रातरागिनींची मशाल रॅली काढण्यात आली. या रॅलीत दोन हजार रातरागिणींनी सहभागी होऊन अंधारावर मात करत येत्या वर्षात प्रकाशमय वाटचाल करू, असाच संदेश दिला. माजलगाव शहरातही महिला व विद्यार्थिनींनी मशाली हाती घेत दोन किलोमीटर अंतर कापत अंधारावर मात केली. बीडच्या सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स भागातील क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळा परिसरात तायक्वांदोच्या मुलींनी चित्तथरारक कवायती सादर केल्या. पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, प्रभारी जिल्हाधिकारी अजित कुंभार पोलिस उपअधीक्षक भास्कर सावंत यांचे स्वागत दिव्य मराठीच्या वतीने करण्यात आले.

पुरुष संघटेकडून पितृसत्तेविरोधी पोस्टर प्रदर्शन

सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याजवळ मैत्री मंचाच्या वतीने 'समतेच्या वाटेनं ..पैंजण खणकावीत यावं ... तू यावं .. तू यावं, बंधन तोडीत यावं' हे गीत सादर करण्यात आले. तर पितृसत्ता विरोधी पुरुष संघटनेच्या वतीने बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील शिवसृष्टी येथे महिला सक्षमीकरणावर जनजागृती करण्यासाठी पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.