Home | Magazine | Madhurima | Nikhil Bellarykar's translation of Ravindranath Tagore's story

चित्रकार

निखिल बेल्लारीकर | Update - Nov 06, 2018, 01:09 PM IST

अत्यंत सामान्य पैसा, अनेक रूपांत माणसाला नादी लावणारा पैसा.

 • Nikhil Bellarykar's translation of Ravindranath Tagore's story

  ट्रिक पास करून गोविंद कलकत्त्याला आला. त्याला विधवा आईचा थोडा आधार होता, परंतु सर्वांत मोठा आधार होता दृढनिश्चयाचा. पूर्ण जीवन पैशाला वाहायचा त्याने निश्चय केला होता. त्याच्या ध्यानीमनीस्वप्नी एकच निदिध्यास होता. त्याला नाव कमवायची ओढ नव्हती - पैसा मात्र हवा होता. अत्यंत सामान्य पैसा, अनेक रूपांत माणसाला नादी लावणारा पैसा.


  अनेक टक्केटोणपे खात गोविंद अखेर मार्गी लागला - बडासाहेब मॅकडुगालच्या दिमतीस. सर्वजण त्याला मॅकदुलाल म्हणत. गोविंदचा वडील भाऊ मुकुंद वकिली पेशा करत असतानाच एकाएकी वारला. मागे बायको, चार वर्षांचा मुलगा चुनीलाल, एक घर, काही पैसाअडका असा सरंजाम होता. काहीएक कर्जही होते. त्यामुळे काटकसरीने दिवस काढावे लागत.


  मुकुंदच्या मृत्युपत्राप्रमाणे त्याच्या पश्चात कुटुंबाची जबाबदारी गोविंदवर पडली. त्याने आपला पुतण्या चुनीलालच्या लहानपणापासूनच त्याला ‘पैसा कमव’ हा मूलमंत्र द्यायला सुरुवात केली.
  चुनीलालच्या शिक्षणातला एकमेव अडसर म्हणजे त्याची आई सत्यवती. काही न बोलताही तिच्या कृतीतून ते स्पष्ट दिसे. त्याला लहानपणापासूनच शिल्पकलेची आवड होती. फुले, फळे, पाने, खाद्यपदार्थ, इ. घेऊन, कागद कापून, माती, मैदा, जामफळ, बोरे, ताड, इ.चे रस टाकून विविध अभूतपूर्व शिल्पे तो रचीत असे. त्याला यामुळे दु:खही भोगावे लागे, कारण यासारख्या अनावश्यक गोष्टींमध्ये त्याचा उत्साह उतू जाई, परंतु अभ्यासादि आवश्यक गोष्टींमध्ये त्याला बिलकूल रस नसे. कला हा शब्द ऐकल्यावर मुकुंदाचे मन रोमांचित होई परंतु आपल्या बायकोच्या हातीही कला असेल हे त्याच्या गावीच नव्हते.

  आपली बायको ‘अनावश्यक’ गोष्टींत वेळ घालवते हे पाहून त्याला हसू येई, अर्थात ते प्रेमभरे हसू होते. पण यावरून नातलगांनी काही बोललेले त्याला अजिबात खपत नसे. मुकुंदच्या व्यक्तिमत्त्वात एक अंतर्विरोध होता - वकिलीत कुशल असूनही संसाराबद्दल उदासीनताच होती. लागेल तितका पैसा त्याला वकिलीतून मिळूनही त्यात अडकून न पडल्यामुळे त्याचे मन मुक्त होते. तो स्वभावाने एकदम सरळ होता. स्वार्थाकरिता इतरांवर त्याने कधीही दबाव आणला नाही. कधी कधी कोर्टातून परत येताना वाटेत रंग, रंगीत रेशीम, रंगीत पेन्सिली, इ. सामान सत्यवतीच्या नकळत आणायचा. सत्यवतीने काढलेले चित्र हाती घेऊन त्याची प्रशंसा करायचा. एकदा सत्यवतीने काढलेले एका माणसाचे चित्र उलटे धरून त्याचे दोन्ही पाय म्हणजे पक्ष्याचे डोके असे मानून म्हणाला, “सतू, याला बांधून ठेवला पाहिजे - बगळा कसा विचित्र आहे!”
  मुकुंदच्या बालिश कल्पनांतून मुकुंदइतकाच आनंद सत्यवतीलाही मिळे. अख्ख्या बंगालात अन्य कुठल्याही कुटुंबात इतके स्वातंत्र्य व प्रेम आपल्याला मिळणार नाही, हे सत्यवतीला माहीत होते.

  त्यामुळे जेव्हा जेव्हा मुकुंद मजेने अशी काही अतिशयोक्ती करायचा तेव्हा तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागत. अशा दुर्लभ भाग्याला सत्यवती पुढे अंतरली. मरणाआधी मुकुंदला स्पष्टच कळून चुकले होते की, यापुढे कुटुंबाची धुरा व्यवहारचतुर माणसाच्या हाती असावी. त्यामुळे सर्व सूत्रे गोविंदच्या हाती गेली. पहिल्या दिवसापासूनच गोविंदने स्पष्ट केले की, पैसा सर्वोच्च आहे. त्याच्या या उपदेशामागची खोलवर रुतलेली तुच्छता जाणवून सत्यवतीला लाजेने मेल्याहून मेल्यासारखे झाले.


  तरी या ना त्या प्रकारे पैशाची आराधना चालूच होती. सत्यवतीला जाणवत होतं की, यापायी आपल्या मुलाचं माणूसपण हरवतंय, परंतु सहन करण्याखेरीज अन्य उपाय नव्हता. कारण संवेदनशील आणि भावोत्कट मनावर आघात करून त्याला विद्रूप करणं सामान्य स्वभावाच्या माणसाला सहज शक्य असतं. इतके दिवस सत्यवतीला सर्व काही न मागता मिळत होतं. तिला पदर पसरायची गरज नव्हती.

  पण शिल्पकलेसाठीच्या वस्तू खरेदीच्या यादीत टाकल्या तर लाजेने जणू मरणच ओढवेलसे वाटे, कारण संसाराकरिता या अत्यंत अनावश्यक गोष्टी. त्यामुळे ती जेवणाखाण्याच्या खर्चात काटकसर करून शिल्पकलेसाठीच्या वस्तू आणत असे. लोकनिंदेच्या भयापोटी नव्हे तर अरसिकांची नजर पडेल या भीतीने ती बंद दाराआडच शिल्पे रचीत बसे. तिच्या शिल्परचनेचा एकमेव प्रेक्षक आणि समीक्षक चुनीलालच होता. त्याला लवकरच त्याची चटक लागली. नाकातोंडापासून शाळेसाठीच्या वह्यांची पाने, स्वत:चा अंगरखा, इ. सर्व ठिकाणी रंगाचे डाग दिसू लागले ते पार कुंपणाच्या भिंतीपर्यंत. साहजिकच काकाकडून त्याची चांगलीच धुलाई झाली.
  काकाच्या वाढत्या दडपशाहीसोबतच आईचा यातील छुपा सहभागही वाढत गेला.

  बडा साहेब आपल्या कामासाठी काही दिवस गोविंदला सोबत घेऊन जायचा ती मायलेकांसाठी पर्वणी असायची. दोघेही आनंदाने शिल्पं तयार करायचे. मांजर, कुत्रा, पक्षी- एक ना दोन! एक प्राणी दुसऱ्यापासून वेगळा ओळखू न आला तरी सृजनाचा आनंद मोठा! पण ही कलाकुसर जपून ठेवणे शक्यच नव्हते. गोविंद घरी येण्याअगोदर साफसफाई करणे भाग होते. मायलेकांच्या या सृष्टिनिर्मितीच्या खेळात फक्त ब्रह्मा आणि रुद्रच होते - विष्णू नव्हताच. शिल्परचनेचे वेड सत्यवतीच्या माहेरी पूर्वापार होते. रंगलाल हा तिचा भाचा एक (खिल्ली) प्रसिद्ध चित्रकार होता. रंगलाल एकदा सत्यवतीकडे आला. आत शिरला तर पाय ठेवायला जागाच नाही! त्याला सगळे समजून चुकले. तो म्हणाला, “शाबास रे पठ्ठे! तुम्ही आजवर काढलेली चित्रं, शिल्पं मला दाखवा.”
  कुठून दाखवायची? ती चित्रं केव्हाच मातीत मिसळून गेली. रंगलाल म्हणाला, “ते काही नाही. इथून पुढे चित्रं काढाल ती सर्व मला द्यायची. मी ती जपून ठेवीन.”

  गोविंद अजून परत आला नव्हता. पाऊस पडत होता. घड्याळाचे काटे पुढे सरकत होते. चुनीलाल नावाड्याचे चित्र काढत होता. जणू आ वासून नदीच्या लाटा मगरींचा समूह आणि नाव गिळताहेत, वरून ढगही छानपैकी दुलई पांघरताहेत असे वाटत होते. मगरीही साध्यासुध्या नव्हत्या. आणि ढगांनाही ‘धूमज्योति:सलिलमरुतां’ची उपमा देणे ही अतिशयोक्ती वाटली असती. खरं सांगायचं तर अशी होडी नदीत नेली असता कुठल्याही इन्शुरन्स कंपनीने त्याची जबाबदारी घेतली नसती. पण वरती आकाशातला चित्रकार मनसोक्त चित्र काढत होता आणि खाली बसून हा पोरही तितक्याच मन:पूतपणे देखावा चितारीत होता. तंद्री लागल्यामुळे दरवाजा उघडा राहिल्याचे भान कुणालाही नव्हते. गोविंद घरी आला आणि ओरडला, “काय चाल्लंय रे?”
  त्याचा आवाज ऐकून चुनीलालच्या छातीत धस्स झालं, घशाला कोरड पडली.

  काढलेलं चित्र आपल्या शर्टात लपवायचा व्यर्थ प्रयत्न करताना गोविंदने त्याला पाहिलं. चित्र पाहून त्याला नीटच लक्षात आलं की, इतिहासातल्या तारखा वगैरे विसरून चुनीलालचे काय धंदे चालले होते ते. चित्र हिसकून गोविंदने त्याचे तुकडे तुकडे करून फाडून टाकले आणि फेकून दिले. चुनीलाल स्फुंदून स्फुंदून रडू लागला. तो एकादशीचा दिवस होता. सत्यवती बहुतेकदा हा दिवस जवळच्या देवळातच घालवायची. पण चुनीलालच्या रडण्याचा आवाज ऐकून आली. पाहते तर टेबलावर चित्राचे तुकडे पडलेले, त्यांवर आडवा पडून रडणारा चुनीलाल आणि त्याला शिव्यांची लाखोली वाहणारा गोविंद.


  इतके दिवस सत्यवतीने गोविंदला कशाहीबद्दल एका अक्षरानेही जाब विचारला नव्हता. नवऱ्यानेच त्याला अधिकार दिल्याने ती आपल्या व मुलाच्या भवितव्यासाठी म्हणून आजवर सगळे सहन करीत आली. आज मात्र तिने अश्रू आवरीत, संताप सावरीत त्याला प्रतिप्रश्न केला, “तुम्ही त्याचं चित्र का फाडलं?”
  गोविंद म्हणाला, “तो अभ्यासबिभ्यास काहीही करत नाही. काय होणार त्याचं पुढं?”
  सत्यवती म्हणाली, “तो रस्त्यावरचा भिकारी झाला तरी चालेल, तुमच्यासारखा आजिबात व्हायला नको. देवानं त्याला जे दिलंय तेच त्याच्यासाठी पैशापेक्षा भारी आहे. ते तसेच राहू दे हा माझा त्याला आशीर्वाद आहे.”
  गोविंद म्हणाला, “मी माझी जबाबदारी सोडू शकत नाही. मी उद्याच त्याला एका बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवतोय, नाहीतर तुम्ही त्याची वाट लावाल.”
  गोविंद ऑफिसात गेला. पाऊस थांबला, रस्ता पाण्यात बुडून गेला.
  सत्यवती चुनीलालचा हात धरून म्हणाली, “चल बाबा, चल.”
  “कुठे चलायचं, आई?” चुनीलाल विचारू लागला.
  “अगोदर इथून निघू.”
  दोघे रंगलालच्या घरी गेले. सत्यवती म्हणाली, “बाबा, तुम्ही घ्या याचा भार. याला वाचवा पैशाच्या साधनेपासून. याला जीवनदायिनी कला शिकवा.”

  -निखिल बेल्लारीकर

Trending