आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निखिल दुबेचा सुवर्ण 'पंच'; चिन्मयने पटकावला दुहेरी मुकुटचा बहुमान; यजमानांचे वर्चस्व कायम 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या शिलेदारांची सुवर्णमय घोडदौड सुरू आहे. शनिवारी टेनिसमध्ये प्रेरणा विचारे, बॉक्सिंगमध्ये निखिल दुबे यांनी खात्यात सुवर्णपदकांची भर घातली. तसेच टेबलटेनिसपटू चिन्मयने दुहेरी मुकुटाचा बहुमान पटकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे टीमच्या नावे दाेन पदकांची नाेंद झाली. या कामगिरीमुळे महाराष्ट्राच्या खात्यात ८२ सुवर्णांसह तब्बल २१७ पदके जमा झाली आहेत. यामुळे खेलो इंडियात महाराष्ट्रच अव्वल ठरला आहे. गेल्या ११ दिवसांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेचा समारोप आज रविवारी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहेे. 

 

पुणे येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये महाराष्ट्राने पहिल्या दिवसापासून पदकांची लयलूट केली आहे. याच कामगिरीमध्ये सातत्य ठेवत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी शनिवारीदेखील महाराष्ट्राच्या खात्यात सुवर्णपदकांची अधिक भर टाकली. टेनिसमध्ये मुंबईच्या प्रेरणा विचारेने गुजरातच्या खेळाडूंचा पराभव करत सुवर्ण पटकावले. मात्र टेनिसमध्ये महाराष्ट्राच्या ध्रुव सुनीशला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. तसेच २१ वर्षांखालील गटात बॉक्सिंगमध्ये ७५ किलो वजनी गटात निखिल दुबेने हरियाणाच्या खेळाडूला मात देत महाराष्ट्राच्या सुवर्णपदकामध्ये भर घातली. याबरोबरच या कामगिरीमुळे शनिवारपर्यंत सुवर्ण ८२, रौप्य ६०, तर ७५ कांस्य अशी एकूण २१७ पदके महाराष्ट्राच्या खात्यात जमा झाली आहेत. स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंचाच बोलबाला राहिला आहे. 

 

तिरंदाजी, टेनिस स्पर्धेचे आज रंगणार अंतिम सामने 
खेलो इंडिया स्पर्धेच्या अंतिम दिवशी तिरंदाजी तसेच टेनिसचे अंतिम सामने रंगणार आहेेत. अंतिम फेरीतही महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या समावेश असल्याने महाराष्ट्राच्या खात्यात आणखी सुवर्णपदकांची भर पडणार आहे. यात युवांच्या कामगिरीवर सर्वांची नजर असेल. 

 

निखिलचा हरियाणाच्या नितीनकुमारला ठोसा 
बाॅक्सर निखिल दुबेने शनिवारी खेलाे इंडिया यूथ गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावले. ताे २१ वर्षांखालील ७५ किलो वजनी गटात चॅम्पियन ठरला. त्याने हरियाणाच्या नितीनला पराभूत करून सुवर्णपदकाची कमाई केली. नितीनकुमारने कनिष्ठ गटात आशियाई व जागतिक चषक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळेच या लढतीत त्याचे पारडे जड मानले जात होते. मात्र, निखिलने खेळाच्या जोरावरच ४-१ अशी विजयश्री खेचून आणली. करिअर करण्यास प्रारंभ केला तेव्हाच आॅलिम्पिक क्रीडा स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले आहे. हे ध्येय लवकरच मी साकार करीन, असा आत्मविश्वास महाराष्ट्राचा सुवर्णपदक विजेता बाॅक्सर निखिल दुबे याने व्यक्त केला. निखिल हा मुंबई येथील खेळाडू असून त्याला आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटचे प्रशिक्षक व्ही.के.शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले आहे. निखिल याचे वडील अंगरक्षक म्हणून नोकरी करतात. पाच भावंडांमध्ये फक्त निखिल यालाच खेळाची आवड असून त्याच्या करिअरकरिता घरच्यांचे संपूर्ण सहकार्य मिळते. गतवर्षी राष्ट्रीय स्पर्धांमुळे त्याला दहावीची परीक्षा देता आली नव्हती. यंदा मात्र तो ही परीक्षा देणार आहे. त्याने आतापर्यंत राज्य व अखिल भारतीय स्तरावर अनेक पदके मिळवली आहेत. 

 

बॅडमिंटन चॅम्पियन आजींची प्रेरणा', जिंकले सुवर्ण 
राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियन असलेल्या आजी शुभा विचारे यांच्या पावलावर पाऊल टाकत टेनिस काेर्टमध्ये उतरलेल्या प्रेरणा विचारेने आपल्या चमकदार खेळीमुळे खेलाे इंडिया स्पर्धेत दोन सुवर्ण पटकावले. या चमकदार कामगिरीमुळे टेनिसमध्येही महाराष्ट्राच्या खेळाडूंचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. 

 

पुण्यातील शिवछत्रपती क्रीडानगरी येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत शनिवार, १९ रोजी सर्वांचे लक्ष लागून असलेल्या सतरा वर्षांखालील टेनिसच्या अंतिम सामन्यात अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात मुंबईच्या प्रेरणा विचारेने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. विशेष म्हणजे शुक्रवारी प्रेरणाने गार्गी पवार हिच्यासेाबत दुहेरीत सुवर्णपदक प्राप्त केले होते. या सुवर्ण कामगिरीची पुनरावृत्ती प्रेरणाने एकेरीमध्येदेखील करत महाराष्ट्राच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदकाची भर घातली. मुंबईच्या एनएम महाविद्यालयात ११ वीमध्ये शिक्षण घेत असलेल्या प्रेरणाला लहानपणापासूनच टेनिसची आवड निर्माण झाली होती. याचमुळे वयाच्या सातव्या वर्षी तिने हातात रॅॅकेट घेतले. रोज सकाळी व सायंकाळी दोन तास असा सराव करत तिने टेनिसमध्ये कौशल्य प्राप्त केले. याच कौशल्याच्या जोरावर तिने एटीपी रँकिंगमध्ये तिसरे स्थान गाठले होते. 

 

टेबल टेनिसमध्ये यजमान महाराष्ट्राला दोन सुवर्ण, एक रौप्य 
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी टेबल टेनिसमध्ये दोन सुवर्ण व एक रौप्य शनिवारी मिळवे. चिन्मय सोमयाने आज देव श्रॉफसाेबत दुहेरीचे सुवर्ण जिंकले. त्यांनी अंतिम सामन्यात पश्चिम बंगालच्या मैनिक रॉय व सौम्यदीपचा ११-८, ११-७, ११-४ ने पराभव केला. मुलींच्या १७ वर्षाखालील दुहेरीत दिया चितळे व स्वस्तिकाने रिशा गोगोई व गार्गी गोस्वामी यांचा ११-४, ११-६, ११-० असा पराभव केला. महाराष्ट्राच्या सिद्धेश पांडे व रिगानने राैप्यपदक पटकावले. त्यांना फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. 

 

समारोप आज; केंद्रीय मंत्री जावडेकर यांची उपस्थिती 
खेलो इंडिया यूथ गेम्सचा समारोप सोहळा रविवारी शिवछत्रपती क्रीडानगरीत दुपारी १२ वाजता होणार आहे. यश मिळवलेल्या संघ आणि खेळाडूंना सर्वसाधारण विजेतेपद व इतर पारितोषिके समारोप सोहळ्यात प्रदान करण्यात येणार असून कार्यक्रमाला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित राहणार आहेत. बॅडमिंटन हॉलमध्ये सोहळ्याला राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे, पालकमंत्री गिरीश बापट यांसह राज्यातील विविध खात्यांचे मंत्रीसह मान्यवर उपस्थित असतील. 

 

बातम्या आणखी आहेत...