आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातील अनेक नेते पैशासाठी राजकारणात : नीला विखे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जानेवारीच्या अखेरीस देशातील एका राजकीय घराण्याचा वारसा सांगणाऱ्या प्रियंका गांधी यांचा सक्रिय राजकारण प्रवेश काँग्रेसजनांसाठी आश्वासक बातमी ठरली. यानंतर काही दिवसांनी महाराष्ट्रातील एका राजकीय घराण्याचा वारसा सांगणाऱ्या ३२ वर्षीय नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या पंतप्रधानांच्या सल्लागार म्हणून नियुक्ती झाल्याची सुखद वार्ता आली. शिक्षणतज्ज्ञ अशोक विखे पाटील हे नीला यांचे पिता आहेत.  नीला स्वीडनच्या पंतप्रधान कार्यालयात फायनान्स इन्चार्ज आहेत. जागतिक महिला दिनानिमित्त नीला यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात भारतातील अनेक नेते केवळ पैशासाठी राजकारणात असल्याचे स्पष्ट मत नोंदवले.


प्रश्न : तुमचे बालपण,  शिक्षण आणि करिअरबाबत काय सांगाल?
उत्तर :
वयाच्या सहा वर्षांपर्यंत मी भारतात, नगरला वाढले. सातव्या वर्षापासून स्वीडनमध्ये शिक्षणास सुरुवात केली. अहमदनगरच्या  प्राथमिकपूर्व शिक्षणात लिहिण्या-वाचण्याचे प्राथमिक धडे घेतले. गणिताचे बेसिक तिथेच शिकले. आम्ही घरी स्वीडिश, इंग्रजी, हिंदी, मराठी बोलत असू. मराठी, हिंदीचे भाषाकौशल्य आता मी विसरले आहे. भारतात घालवलेल्या सुटीत मिळवलेले भाषाज्ञान पुन्हा शिकावे लागेल. यानंतर माझे पूर्ण शिक्षण स्वीडन आणि स्पेनमध्ये झाले.  फायनान्स अँड अकाउंटिंगमध्ये एमबीए केल्यानंतर पुण्यात अल्फा लाव्हलमध्ये नोकरी केली.मोठ्या ४ अकाउंटिंग फर्ममध्ये सीए म्हण्ून काम केल्यानंतर दीड वर्षाने मी स्वीडनला परतले. पदवी शिक्षणाच्या काळातील सुट्यांत मी भारतात बजाज ऑटोसह विविध स्वयंसेवी संस्थांसोबत काम केले.


प्रश्न : तुम्ही सुरुवातीला सिटी कौन्सिलर म्हणूनही निवडून आला आहात?  निवडणूकविषयी व कौन्सिलर म्हणून काम करतानाचे अनुभव कसे राहिले?
उत्तर :
मी २०११ पासून स्टाॅकहोममध्ये राहते. वयाच्या १५ व्या वर्षापासून ग्रीन पार्टीची सक्रिय सदस्य आहे. पक्ष संघटनेत विविध स्तरांवर काम केलेले आहेे.  २०१८ मध्ये स्टाॅकहोम सिटी कौन्सिलसाठी निवडून आले. ही निवडणूक मला कलाटणी देणारी ठरली. या निवडणुकीत लोकांनी दिलेल्या पाठिंब्याबाबत मला खूप आनंद झाला. बाहेरचे पालक असणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण येथे २५ टक्के आहे. मात्र, याचा निवडून आलेल्या व्यक्तीवर परिणाम होत नाही. महिला वा तरुणी  राजकारणात प्रवेश करत असेल तर अनेक जण खाली खेचण्याचा किंवा दिशाभूल करण्याचा  प्रयत्न करत असतात. मात्र, देशात महत्त्वपूर्ण योगदान देण्याची क्षमता माझ्यात आहे, असे मला वाटते. स्थलांतरित नागरिकाची मुलगी म्हणून मी नको आहे, असे ज्यांना वाटते त्यांच्यापेक्षा माझ्यात नक्कीच जास्त क्षमता आहे. एक स्वीडिश महिला म्हणून माझा देश कसा चालावा याबाबत मत व्यक्त करण्याचा मला पूर्ण हक्क आहे. 


प्रश्न :  पाश्चिमात्य देशांत पर्यावरण हा निवडणुकीचा मुद्दा ठरतो. स्वीडनमध्ये पर्यावरणासारख्या विषयाला वाहून घेतलेल्या ग्रीन पार्टीची कार्यकर्ती म्हणून भारतातील पक्ष व नेते या मुद्द्याकडे कसे पाहतात, असे तुम्हाला वाटते?
उत्तर : कर्ब वायूचे  उत्सर्जन धोकादायक आहे याची जाणीव हवी.उत्सर्जनात घट आणण्यासाठी आपल्याकडे आता प्रगत तंत्रज्ञान आहे. भविष्यातील भारताच्या विकासप्रक्रियेत या तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे. मात्र, भारतातील बरेच राजकारणी पैशाच्या खेळात अथवा प्रतिष्ठेसाठी या क्षेत्रात येतात असे वाटते. याशिवाय लोकांचा पाठिंबा मिळवणाऱ्यांकडे अन्य विषय असावेत. वातावरण बदलाचा समाजावर परिणाम होण्याआधी त्याविरोधात वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. हा विषय व राजकीय नेत्याचा दृष्टिकोन  याचा ताळमेळ बसत नाही. राजकीय नेते बदल घडवण्यासाठी निवडून यावेत. मात्र, लोकांनाच अशा मुद्द्यांचे महत्त्व कळत नसेल तर बदल घडवणारा निवडून येणे कठीण आहे.


प्रश्न :  भारतातील महाराष्ट्र राज्याचा विचार केल्यास येथील शालेय अभ्यासक्रमात १९९९-२००० मध्ये  पर्यावरण विषयाचा समावेश झाला आहे. दुसरीकडे १६ वर्षीय स्वीडिश कार्यकर्ती ग्रिटा थुनबर्ग तिथे ग्लोबल वॉर्मिंगच्या मुद्द्यावर शाळा बंद करते, जनजागृती करते या विरोधाभासाकडे कसे पाहाल?
उत्तर : ग्रीन पार्टीची १९८१ मध्ये  स्थापना  झाली आणि १९८८ मध्ये पक्षाने स्वीडनच्या संसदेत प्रवेश केला. १९८६ मध्ये चर्नाेबलचा आण्विक अपघात, ८० च्या दशकात विषारी पदार्थामुळे िसल व माशांच्या मोठ्या प्रमाणातील मृत्यूमुळे येथे पर्यावरणाबाबत जनजागृती झाली. त्यामुळे याला राजकीय विषयात महत्त्वाचे स्थान मिळाले.  भारताला सर्व मुलांना समान संधी, शिक्षण, आर्थिक समानता स्त्री भ्रूणहत्या रोखण्याच्या कामास आणखी अवधी लागेल असे वाटते. साक्षरतेतून स्वच्छ समुद्र, वातावरण बदलासारख्या महत्त्वाच्या विषयाकडे पाहिले जाते. ग्रिटा थुनबर्गचे म्हणाल तर जागतिक नेत्यासमोर वातावरण बदलाचा अजेंडा ठेवून तिने चांगले काम केले आहे. केवळ दैनंदिन  पोटापाण्याच्या  प्रश्नापेक्षा सर्वंाचे भविष्य ग्लोबल वॉर्मिंगवर अवलंबून आहे,असे  तिचे म्हणणे ऐकून घेतले जाईल.

बातम्या आणखी आहेत...