आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मातोश्री’तलं चाफ्याचं झाड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डाॅ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, महाराष्ट्र राज्य

उद्धवजी मुख्यमंत्री झाले. ‘मातोश्री’तल्या त्यांच्या जीवनाबद्दल, ठाकरे कुटुंबीयांबद्दल, रश्मीवहिनींबद्दल सर्वांनाच कुतूहल आहे. त्यांच्यासोबतच्या सहवासाच्या आठवणी सांगताहेत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेे... 
 
खरंतर १९९८ पासून माझा ‘मातोश्री’शी संबंध आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी माझा तेव्हापासून संवाद सुरू झाला. शिवसेनेतला माझा प्रवेशच मुळात उद्धवजी यांच्या पुढाकाराने झाला होता. उद्धवजी अन् रश्मीवहिनी यांच्याशी माझी सातत्याने गाठभेट होई. त्यांच्याशी सविस्तर बोलणं होत असे. मला आठवतंय, पुणे जिल्ह्यात शिवसेनेचे तत्कालीन खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी एक कार्यक्रम घेतला होता. तो बचत गटांच्या महिलांचा मेळावा होता. त्याला उद्धवजी आणि रश्मीवहिनी दोघे उपस्थित होते. तेव्हा हजारो महिला पाहून वहिनींना खूप आनंद झाला होता. त्यानंतर हळूहळू रश्मीवहिनींचा संघटनेतील वावर वाढला. मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहातला कार्यक्रम असो किंवा शिवतीर्थावरची मोठी सभा असो, तेथे रश्मीवहिनी यांची उपस्थिती हमखास दिसायला लागली. 

रश्मीवहिनी या उत्तम गृहिणी आहेत. तशाच त्या आदर्श सूनही आहेत. वहिनींनी बाळासाहेबांच्या आजारपणात त्यांची जी काळजी घेतली, त्याला तोड नाही.  मातोश्रीवर सतत लोकांचा राबता असतो. येथे येणारे नेते, कार्यकर्ते तसेच नातेवाइकांकडे होणारे लग्नसमारंभ, कुटुंबातील सुखदु:खाचे प्रसंग या सगळ्यांची जबाबदारी वहिनींनी सातत्याने पेलली आहे. 

मुलं आदित्य अन् तेजस या दोघांवरती त्यांनी संस्कार केलेत. त्याबरोबरच संघटनेतील पुढारी, आमदार, खासदार यांच्या मुलांचीसुद्धा वहिनी आस्थेने चौकशी करत असतात. माझे दिवंगत बाबा दिवाकर गोऱ्हे आणि माझी मावशी डाॅ. शकुंतला भावे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होते. तो कार्यक्रम पुण्यात ठेवला होता.  त्याला उद्धवजी  आणि रश्मीवहिनी खास घरी आले होते. 

बाबांना  बाहेर कुठे हाॅलच्या पायऱ्या चढणे शक्य नव्हते. म्हणून घरी कार्यक्रम घेतला. त्याला दोघे आले होते. माझे बाबा काठी वापरायचे. टेबलाशी बसलेल्या बाबांची अचानक काठी पडली. वहिनी जवळ होत्या. त्या पटकन उठल्या आणि बाबांच्या हातात त्यांनी काठी दिली. हा प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही.

‘माताेश्री’ येथे मी जाते, तेव्हा त्यांच्याशी अनेक विषयांवर गप्पागोष्टी होतात. घरातल्या सुखदु:खाच्या गोष्टी होतात. त्याबरोबरच पक्षात काय चाललंय याचीसुद्धा वहिनींना उत्सुकता असते. कोणत्या जिल्ह्यात काय चाललंय याविषयी  त्या नेहमी माहिती घेत असतात. अलीकडे झालेल्या अनेक निवडणुकांत आम्ही सभांत व कार्यक्रमांतही  भेटत असतो.

मा.उद्धवसाहेब व आदित्य  सातत्याने राज्यात कोठे ना कोठे प्रवास करत असतात. त्यांच्या प्रवासाची तयारी करण्याची जबाबदारी वहिनींची असते. याखेरीज चि.तेजसला जंगल व वन्यप्राणी,पशुपक्षी यांची आवड आहे.

या सर्वांच्या  दौऱ्याहून परतल्यावर तिकडे काय झालं, काय नाही याची त्या माहिती घेतात. तिकडे पाठवायची कागदपत्रे वेळेवर पोचली की नाहीत, हे त्यासुद्धा त्या जातीने पाहत असतात. याखेरीज चंदुमामा वैद्य, संजुआत्या करंदीकर व अन्य ठाकरे कुटुंबीय हे गणगोत व माहेरचा पाटणकर परिवार या सर्वाच्या प्रेमाला रश्मीवहिनी सांभाळतात. मा.उद्धवजींचे अनेक मित्र व त्यांचा पाहुणचारही त्या अगत्याने करतात. शिवसेनेची महिला आघाडी आणि वहिनी यांचे खास नाते आहे. महिला आघाडीच्या कार्यक्रमांना त्या नियमाने उपस्थिती लावतात. 

दादर येथील शिवसेना भवनाच्या तिसऱ्या मजल्यावर देवीची मूर्ती आहे. या मूर्तीची रोज पूजा होते. देवीमातेला रोज प्रसाद ठेवला जातो. पुष्पे अर्पण केली जातात. नवरात्र उत्सवात म्हणजे ललिता पंचमीला सेना भवनात हळदी-कुंकवाचा समारंभ असतो. त्याला वहिनी दरवर्षी न चुकता उपस्थिती लावतात. आरती होते. महिला देवीला आळवून प्रार्थना करतात.  तसेच होमसुद्धा केला जातो. 

घरगुती कार्यक्रमाबरोबरच जेव्हा जेव्हा उद्धव यांच्यावर आव्हानात्मक परिस्थिती ओढवली, तेव्हा तेव्हा रश्मीवहिनींनी उद्धवजींना ठामपणे साथ दिलेली आहे. सुंदर व बुद्धिमान असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांना सार्वजनिक कार्यक्रमाची अनेक निमंत्रणे येत असतात. पण, त्यातील दोन टक्के निमंत्रणेसुद्धा त्या स्वीकारू शकत नाहीत. कारण त्यांच्यावर घरातील जबाबदारी आहे. 

आता तर त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे आमदार झाले आहेत. आदित्य आता पक्षात अधिक सक्रिय झाले आहेत. त्यामुळे वहिनींवरची जबाबदारी वाढली आहे. अशा वेळेला या सर्व परिस्थितीवर घरातून लक्ष ठेवण्याची वहिनींची भूमिका आहे. 

वहिनींचे वाचन चांगले आहे. बातम्या त्या नियमाने पाहतात. अनेक मॅगझिन्स त्यांनी वाचलेली असतात. त्यांच्याशी जेव्हा अनेक विषयांवर चर्चा होते. तेव्हा त्या जे संदर्भ देतात, त्यावरून त्या बरेच वाचतात, हे समजते. त्यांचे नातेवाईक बातम्या आणि वृत्तवाहिन्यांवरील कार्यक्रम पाहून त्यांना माहिती देत असतात. 


रश्मीवहिनी या चांगल्या सून आहेत. आदर्श पत्नी आहेत. आदित्य यांच्यावर त्यांनी जे संस्कार केलेत, तेसुद्धा संवेदनशीलतेचे संस्कार आहेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणुन उद्धवजी जे काम करत आहेत, त्यातून महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांशी उद्धवजी यांचे नाते दृढ व्हावे, अशी रश्मीवहिनींची भूमिका असेल.


हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व माँसाहेब मीनाताई यांच्या मार्गदर्शनावर चालणारी अत्यंत सत्शील, सुसंस्कारी, मानवतापूर्ण, संवेदनशील अशी दोघांची जोडी आहे. रश्मीवहिनी व उद्धवजी यांच्या रूपाने महाराष्ट्राला एक प्रेमाचं चाफ्याचं झाड मिळालं आहे, असं मला वाटतं. आई तुळजाभवानी व आई जगदंबा यांचे उभयतांना खूप आशीर्वाद आहेत. या दोघांच्या कामांतून महाराष्ट्राला सौख्य आणि विकास प्राप्त होईल, अशी मला खात्री आहे.

बातम्या आणखी आहेत...