आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लातूरमध्ये लोकसभेच्या तोंडावर निलंगेकर-देशमुखांची जुगलबंदी; ऑफिसर्स क्लब इमारतीच्या उद्घाटनाला एका व्यासपीठावर  

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- लोकसभा निवडणुका अगदी तोंडावर आल्यामुळे सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष असलेला काँग्रेस हे दोन्ही पक्ष आपापल्या व्यूहरचनेत व्यस्त आहेत. राजकीय वातावरण गरम होत असतानाच लातूरमध्ये सोमवारी संभाजी निलंगेकर आणि अमित देशमुख एका बिगर राजकीय कार्यक्रमात एकत्र आले. साहजिकच यावेळी झालेल्या भाषणात त्यांच्यातली जुगलबंदी रंगत गेली. दिवसभर समजा माध्यमांतही ते चर्चेत राहिले. निमित्त होते लातूर आॅफिसर्स क्लबच्या इमारतीच्या भूमिपूजनाचे. 

 

भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाचे जिल्ह्यातील प्रमुख नेते म्हणून लातूरमध्ये सध्या पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि आमदार अमित देशमुख यांच्याकडे पाहिले जाते. लातूर भाजपची धुरा सध्या निलंगेकरांच्या तर काँग्रेसची धुरा देशमुखांच्या खांद्यावर आहे. लातूर लोकसभा मतदारसंघात दोन्ही पक्षाचे उमेदवार ठरले नसले तरी ही निवडणूक देशमुखविरुद्ध निलंगेकर अशीच होणार आहे. निवडणूक जाहीर होताच प्रचारसभांमधून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या लातूर ऑफिसर्स क्लबच्या इमारतीच्या भूमिपूजनानिमित्त संभाजी पाटील निलंगेकर आणि अमित देशमुख हे दोन्ही नेते एकाच मंचावर आले. जिल्हाधिकाऱ्यांचे प्रास्ताविक सुरू असतानाही या मंचावरील सोफ्यावर हे दोन्ही नेते एकमेकांसोबत हास्यविनोदात रमले होते. त्यामुळे कोण काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. प्रास्ताविकात कोणी काय सूचना केल्या हे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले. पालकमंत्री निलंगेकरांनी इमारतीच्या बाह्य बाजूला निलंगा परिसरात आढळणारा केंगल हा दगड वापरावा यामुळे इमारतीच्या सौंदर्यात भर पडेल असे सांगितल्याचा उल्लेख जिल्हाधिकाऱ्यांनी केला होता. तो धागा पकडत आमदार अमित देशमुख यांनी आपल्या भाषणात लातूरच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी निलंग्याहून येत असलेल्या दगडांचे आपण मनापासून स्वागत करतो, असे वक्तव्य केले. एखाद्या सरकारी कार्यक्रमाला आपल्याला पहिल्यांदाच आवर्जून बोलावल्याचा उल्लेख देशमुखांनी केला. गेल्या काही महिन्यांपासून लातूरच्या राजकारणात होत असलेल्या बदलांमुळे आपल्याला बोलावणे आले असावे असे ते म्हणाले. त्यांचा सगळा रोख मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांच्या वाढत चाललेल्या प्रस्थामुळे अस्वस्थ असलेल्या निलंगेकरांकडे होता. मात्र देशमुखांनी पवारांचा प्रत्यक्ष उल्लेख केला नाही. परंतु कुणी काहीही बोलत असलं तरी निलंगेकर-देशमुखांचे काय संबंध आहेत हे आमचं आम्हालाच माहीत, असे सूचक वक्तव्यही अमित देशमुखांनी केले. 

 

लोकसभेचा सामना या दोघांतच 
दरम्यान, लातूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी काँग्रेसने अमित देशमुख यांच्यावर तर भाजपने संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर सोपवली आहे. उमेदवार कुणीही असला या तरी या मतदारसंघातून उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी या दोघांवरच असणार आहे. त्यामुळे काही दिवसांत सुरू होणाऱ्या राजकीय रणधुमाळीत हे दोन्ही नेते एकमेकांवर टीका-टिप्पणी करीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसणार आहेत. 

 

इमारत गढी, वाड्यासारखी बनवा : निलंगेकर 
क्लबच्या इमारतीची बाह्य बाजू जाणीवपूर्वक ब्रिटिशकालीन इमारतीसारखी ठेवल्याचे दिसत आहे. मात्र आपण आपलं सोडून इतरांच्या मागे पळत राहतो. या इमारतीची बाह्य बाजू आपल्याकडील वाड्यांसारखी बनवता आली तर पाहावे अशी सूचना पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली. लगेचच ते म्हणाले की पुन्हा कोणी म्हणेल की बघा हे वाड्यासारखी म्हणाले. देशमुखांच्या गढीसारखी बनवली तरी आमची हरकत नाही, असे म्हणत त्यांनी हास्यविनोद घडवून आणला. लातूरच्या विकासासाठी आम्ही एकच आहोत. शिवराज पाटील चाकूरकर, शिवाजीराव पाटील निलंगेकर,दिवंगत विलासराव देशमुख यांनी चालवलेल्या विकासाचा वारसा आम्ही पुढे नेऊ, असे म्हणत त्यांनी आपले भाषण राजकीय टिप्पण्णीपासून दूर ठेवण्याची काळजी घेतली. 
 

बातम्या आणखी आहेत...