आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरेबियन मर्डर मिस्ट्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सौदी पत्रकार जमाल खाशोगी खूनप्रकरणामुळे सौदी अरेबियाचे राजघराणे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ‘सुधारणावादी’ सौदी राजपुत्राच्या इशाऱ्यावरूनच तुर्कीच्या भूमीत खाशोगी यांची खांडोळी करण्यात आल्याचा जाणकारांचा दाट वहीम आहे. खाशोगी जिवंत आहेत, असे भासवण्यासाठी त्यांची डमी शहरभर फिरवण्यात आल्याचेही समोर आले आहे. ही संधी साधून ट्रम्प, एर्दोगान यांसारखे हुकुमशाही मनोवृत्तीचे राष्ट्राध्यक्ष सौदी अरेबियाला खिंडीत गाठण्याच्या प्रयत्नात आहेत. जेम्स बाँडचा सिनेमा फिका पडावा, असा थरार निर्माण करणाऱ्या खाशोगी खूनप्रकरणाशी निगडित घडामोडींचा हा वेध...

 

माल खाशोगी, सौदी नागरिक आणि ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या दैनिकाचे एक लेखक. त्यांचा इस्तंबूलमधल्या सौदी वकिलातीत गूढरीत्या खून झाला. लवकरच हॉलीवूडमधे याविषयी एक सनसनाटी सिनेमा निघायला हरकत नाही, असा हा ऐवज आहे.२ ऑक्टोबर २०१८ रोजी दुपारी सव्वा वाजता जमाल खाशोगी इस्तंबूलमधल्या सौदी वकिलातीत दाखल झाले. नव्यानं लग्न करत होते, त्याची कागदपत्रे पक्की करण्यासाठी. प्रेयसी, होणाऱ्या पत्नी हॉटेलवर थांबल्या होत्या. खाशोगी परतलेच नाहीत.

 

तुर्की पोलिस आणि सरकारनं सादर केलेल्या पुराव्यांनुसार खाशोगी वकिलातीत गेले. त्या आधी आणि काही वेळानंतर पोहोचलेल्या मिळून १८ सौदी अधिकाऱ्यांना खाशोगी सामोरे गेले. ही माणसं सौदी गुप्तचर, इंटेलिजन्स इत्यादी खात्यांतली होती आणि सौदी राजपुत्र महंमद बिन सलमान यांच्या नजीकच्या वर्तुळातली होती. ही माणसं सौदीच्या सरकारी विमानानं आली होती आणि विमान धावपट्टीच्या बाजूलाच उभं करण्यात आलं होतं, नेहमी होणारी तपासणी टाळून ही माणसं थेट बाहेर पडली आणि वकिलातीत दाखल झाली. राजपुत्राच्या आसपास सतत वावरणारे राजपुत्रांचे एक सहकारी कतानी यांनी स्काइपवरून खाशोगींची उलट तपासणी घेतली.

म्हणजे, खाशोगीला तासलं. खाशोगींनी तितक्याच स्पष्टपणे उत्तरं दिली. सौदी राजकारण, राजपुत्राचं राजकारण हा विषय होता. स्काइपवर बोलत असतानाच एका क्षणी कतानी यांनी तिथे हजर असलेल्या इतर इंटेलिजन्स अधिकाऱ्यांना सांगितलंं ‘या कुत्र्याचं मुंडकं माझ्याकडे पाठवा.’ इंटेलिजन्सच्या लोकांनी खाशोगीला मारलं. त्याचे तुकडे केले. सुटकेसमधे भरले. काही वेळानं एक खाशोगीच्याच ठेवणीचा माणूस (बॉडी डबल) खाशोगीचे कपडे घालून बाहेर पडला नि फिरत फिरत एका मशिदीत गेला. तिथे वावरला. एका टॉयलेटमधे गेला. तिथून बाहेर पडताना त्याने कपडे बदलले होते. त्या माणसाचा वावर जागोजागी सीसीटीव्हीमध्ये नोंदला गेला होता. ते चित्रण सौदी सरकारनं माध्यमांना दिले आणि जाहीर केलं की दुपारी खाशोगी वकिलातीबाहेर पडले, नंतर ते नाहीसे झाले. थोडक्यात, वकिलातीतून बाहेर पडल्यानंतर जे घडलं, त्याच्याशी आमचा छदाम संबंध नाही. पण, तुर्की पोलिसांकडे असलेलं चित्रण सांगत होतं की, खाशोगी वकिलातीबाहेर पडलेच नाहीत, पाठच्या दारानं एक माणूस बाहेर पडला, दोन कार जंगलाच्या दिशेनं गेल्या.

 

सुरुवातीला महंमद बिन सलमान या सौदी राजपुत्रानं जाहीर केलं की, गैरप्रकार घडलाच नाही, खाशोगी वकिलातीच्या बाहेर पडल्यानंतर नाहीसे झाले. नंतर याच राजपुत्रानं खाशोगींचा मृत्यू वकिलातीतच झाला, असं जाहीर केलं. यानंतर आणखी एकदा जाहीर केलं की वकिलातीत बाचाबाची झाली, मारामारी झाली आणि त्यात खाशोगी मारले गेले. मारामारी म्हणजे, गुद्दे मारणं वगैरे. सरतेशेवटी सौदी अरेबिया सरकारनं जाहीर केलं की, जे काही घडलं ते अनपेक्षित होतं, ती चूक होती. सरकारनं वकिलातीत त्या प्रसंगी हजर असलेल्या काही अधिकाऱ्यांना नोकरीतून काढून टाकलं.


जमाल खाशोगी पत्रकार होते. जन्मानं सौदी होते, त्यांना अमेरिकेत कायम वास्तव्याचा परवाना मिळाला होता. ते अमेरिकेत जाऊन-येऊन असत, ‘वॉशिंगटन पोस्ट’ या दैनिकात ते लिहीत असत. अरब जगातील स्वातंत्र्याच्या चळवळीचं (अरब स्प्रिंग) समर्थन करत. आखातातल्या अनेक वर्तमानपत्रांमधे त्यांचे लेख प्रसिद्ध होत असत. इतकंच नव्हे, तर राजपुत्र महंमद सलमान यांच्याच पुढाकारानं निघालेल्या एका वाहिनीचे ते प्रमुखही होते. बराच काळ ते राजपुत्राच्या जवळच्या वर्तुळातही होते. परंतु अलीकडले काही महिने त्यांचे आणि राजपुत्रांचे तीव्र स्वरूपाचे मतभेद झाले होते. अर्थात, एका विरोधी पत्रकाराला राजपुत्रानं मारून टाकलं, इतका सरळ हा मामला नाहीये. जगातल्या अत्यंत श्रीमंत देशाचा राजपुत्र म्हणजे राजाचं विखारी महत्त्वाकांक्षेपायी वागणं असा मुद्दा त्यात गुंतलेला आहे.

 

सलमान या राजाच्या अनेक मुलांपैकी महंमद हा एक मुलगा. त्यानं आपल्या इतर भावांना तुरुंगात टाकलं, त्यांच्यावर भ्रष्टाचार आणि देशद्रोहाचे आरोप लावले, त्यांची संपत्ती जप्त केली. लोकशाही नसलेल्या सौदी अरेबियात असं घडणं नवं नव्हतं. परंतु सलमान यांनी सत्ता हाती घेतली आणि मध्यपूर्व, आखाती प्रदेश आणि सगळ्या जगाचंच राजकारण बदलायला घेतलं. लेबनॉन या देशाच्या पंतप्रधानाला चक्क अटक केली, काही तास अडकवून ठेवलं आणि दम दिला. कतार या देशावर आर्थिक बहिष्कार टाकला. येमेनवर युद्ध लादलं आणि सुमारे १५ हजार नागरिक मारले. जगाच्या डोळ्यांदेखत खाशोगींचा खून हे प्रतीक होतं, राजपुत्राच्या एकूण खुनशी व्यक्तिमत्त्वाचं प्रातिनिधिक रूप होतं. खाशोगी जोवर राजपुत्र महंमद यांचं कौतुक करत होता, तोपर्यंत त्याच्यावर सवलती, फायदे, मदतीचा वर्षाव होता.मतभेद झाल्यावर खाशोगी यांची जहन्नममधे रवानगी. असा खुनशी देशप्रमुख असेल तर अशा देशाशी संबंध ठेवणं धोक्याचं आहे, असा निष्कर्ष जगातल्या अनेक देशांनी काढला.

 

युरोपातल्या देशांनी मागणी केली की खाशोगींच्या खुनाची चौकशी आंतरराष्ट्रीय न्यायालयातून व्हायला हवी. खाशोगी खुनाच्या आसपास घडलेल्या घटना कशा आहेत पाहा. खाशोगी खुनाचं प्रकरण तुर्की सरकारनं लावून धरलं. तुर्की राष्ट्रपती एर्दोगान यांनी जाहीरपणे आणि तुर्की संसदेत निवेदनं करून राजपुत्र महंमद यांच्यावर ठपका ठेवला, त्यांच्यावर कारवाई करण्याची तसंच सौदी अरेबियाला वाळीत टाकण्याची मागणी केली. गंमत अशी की एर्दोगान यांच्या तुर्कस्तानमधे काही हजार पत्रकार आणि लेखक सध्या तुरुंगात आहेत. एर्दोगान विरोधाचा आवाज सहन करत नाहीत. पत्रकारांनी त्यांच्या धोरणाला विरोध केला की त्यांच्यावर ते देशद्रोहाचा आरोप करतात, न्यायालयाची वाट बंद करतात. पत्रकार आणि लोकशाहीची ही तुर्की पद्धत. अरब देशातल्या राजकारणात राजपुत्र आणि एर्दोगान यांच्यात स्पर्धा आहे, त्यातून तुर्कीचं वागणं आकारलंय. सगळेच एका माळेचे मणी.


खाशोगींचा खून झाल्यावर प्रेसिडेंट ट्रम्प सुरुवातीला म्हणाले की हा खूनबिन नाहीये, खाशोगी नाहीसेच झाले असणार, माझा राजपुत्रावर विश्वास आहे. जसजशी माहिती बाहेर येऊ लागली, तसतसे ट्रम्प साशंक झाले. खुनाच्या आरोपात तथ्य आहे,असं म्हणू लागले. नंतर म्हणू लागले की सौदी अरेबियावर काही तरी कारवाई केली पाहिजे. पण खाशोगी खुनाबद्दल बोलत असतानाच एकीकडे ट्रम्प त्यांच्याच पक्षाच्या मोंटानामधल्या काँग्रेसमननं पत्रकाराला केलेल्या मारहाणीचं कौतुक करत होते. काँग्रेसमन ग्यानफोर्ट यांनी गार्डियन दैनिकाच्या पत्रकाराचा गळा कसा धरला आणि त्याला जमिनीवर कसं पाडलं, याचं हावभावासहीत वर्णन ट्रम्पनी केलं.

जो जो पत्रकारांना हाणतो, तो तो माझा माणूस असतो, ग्यानफोर्ट हा माझा माणूस आहे, मला त्याचं कौतुक आहे, असं ट्रम्प जाहीर सभेत बोलले. ट्रम्पनी एकूणातच माध्यमांविरोधात युद्ध पुकारलं आहे.आपल्या पत्रकार परिषदेत ते सीएनएन व इतर काही टीकाकारांना आमंत्रण देत नाहीत, आले तर त्यांच्या प्रश्नाना उत्तरं देत नाहीत, जाहीरपणे त्यांची निंदानालस्ती करतात. महंमद सलमान यांनी आपल्या भावांना तुरुंगात घातल्यानंतर ट्रम्प सौदीत गेले आणि सौदीला १२० अब्ज डॉलरची शस्त्रं विकण्याचा करार करून परतले. तो करार शिल्लक राहील, राजपुत्रांशी संबंध टिकवू असं ट्रम्प म्हणतात. शस्त्रास्त्र विक्री हा अमेरिकेचा पूर्वापार धंदा आहे. ट्रम्प लौकिकाप्रमाणे धंद्याला जागले आहेत.

 

खाशोगी प्रकरण घडत असतानाच रियाधमध्ये एक परिषद राजपुत्रांनी भरवली होती. सौदी अरेबियातील संभाव्य गुंतवणूक असा विषय होता. जगभरचे गुंतवणूकदार, कंपन्या तिथे हजर राहणार होत्या. या परिषदेचं वर्णन ‘वाळवंटातली दावोस’असं केलं जात होतं. खाशोगींचा खून झाल्यावर लोक म्हणू लागले की सौदी अरेबिया हा देश असा एका माणसाच्या मर्जीनुसार, माफियासारखा चालणार असेल, तर तिथे पैसे गुंतवण्यात अर्थ नाही. ‘सिमेन्स’चे प्रतिनिधी, अमेरिकेचे अर्थमंत्री, नाणे निधीच्या प्रमुख लगार्द यांनी परिषदेतून अंग काढून घेतलं. पण रशिया, पाकिस्तान या देशांचे प्रतिनिधी मात्र परिषदेला हजर झाले. यातल्या रशियामध्ये विरोधी पक्षाची माणसं, विरोध करणारे पत्रकार वरचेवर गायब होत असतात, तुरुंगात रवाना होत असतात.

 

पाकिस्तानचं तर विचारूच नका. दहशतवाद, लष्कर आणि सरकार यांचं तिथे उघड उघड संगनमतच आहे.अशा पाकिस्तानला राजपुत्र महंमद यांनी तीन अब्ज डॉलरचं कर्ज आणि तीन अब्ज डॉलर किमतीचं तेल उधार देऊ केलं आहे. कर्ज आणि लांबवलेली परतफेड या शब्दांचा खरा अर्थ असतो की ती देणगीच आहे. महंमद सलमान, ट्रम्प, इम्रान खान, पुतीन. ही हडेलहप्पींची हातमिळवणी. जमाल खाशोगी हा या हडेलहप्पी प्रवृत्तीचा बळी.

 

- निळू दामले

damlenilkanth@gmail.com
 

बातम्या आणखी आहेत...