आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माढ्यातून रणजितसिंह निंबाळकर तर रावेर काँग्रेसकडे; पुण्यात प्रवीण गायकवाड यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- रावेरमधून भाजप उमेदवार रक्षा खडसे यांच्याविरोधात काँग्रेस लढणार की राष्ट्रवादी याबाबत 
सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. ही जागा काँग्रेकाँसला देण्यास राष्ट्रवादी राजी झाली. माजी खासदार डाॅ. उल्हास पाटील यांचे नाव या जागेसाठी आघाडीवर आहे. 


माढा मतदारसंघात काँग्रेसमधून आयात केलेले रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी अखेर भाजपने जाहीर केली. त्यांचा सामना राष्ट्रवादीचे संजय शिंदेंशी होईल. तर मुंबई उत्तरमधून भाजपच्या गोपाळ शेट्टींविरोधात काँग्रेसने अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांचे तिकीट जाहीर केले. पुण्याच्या जागेवर काँग्रेस अखेर संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांचेच नाव निश्चित केले आहे. दरम्यान, शनिवारी आपण काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे गायकवाड यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

 

शहांच्या अर्जासाठी उद्धव ठाकरे जाणार
सत्तेत एकत्र असूनही भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा ‘अफझल खान’ असा हेटाळणीपूर्वक उल्लेख करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात युती जाहीर होताच शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतिसुमने उधळण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी गुजरातमधील गांधीनगर मतदारसंघातून अमित शहांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासही उद्धव ठाकरे जाणार आहेत. स्वत: शहांनी त्यांना निमंत्रण दिले आहे. 

 

सर्वाधिक ३६ उमेदवार बीड मतदारसंघात
निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १० मतदारसंघांत  एकूण २७८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी अखेरच्या दिवशी शुक्रवारी ९९ उमेदवारांनी माघार घेतली.  त्यामुळे आता १७९ उमेदवारच रिंगणात उरले आहेत. उमेदवारांची संख्या : बीड ३६, परभणी १७, हिंगोली २८, उस्मानाबाद १४, लातूर १०, नांदेड १४, सोलापूर १३, बुलडाणा १२, अकोला ११, अमरावती २४. या टप्प्यासाठी १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

 

काँग्रेसच्या समन्वय समितीची आज मुंबईत महत्त्वाची बैठक
काँग्रेस लढवत असलेल्या एकेका मतदारसंघाची जबाबदारी दोन ज्येष्ठ नेत्यांवर टाकण्यात येणार आहे. शनिवारी मुंबईत होणाऱ्या समन्वय समितीच्या बैठकीत या जबाबदारीचे वाटप होईल. महाराष्ट्राच्या निवड समितीचे सचिव वेणुगोपाल आणि केंद्रीय निवडणूक समितीचे सचिव मधुसूदन मेस्त्री, तसेच राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे उपस्थित राहतील. 

 

शरद पवारांच्या आग्रहामुुळे गायकवाडांचे नाव फायनल

काँग्रेसला पुण्यात तगडा उमेदवार सापडत नव्हता. दुसरीकडे संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड हे पक्षात येण्यास इच्छूक असूनही काँग्रेसचे काही नेते त्यांना तिकिट देण्यास अनुकूल नव्हते. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेत्यांशी चर्चा करुन गायकवाड यांच्यासाठी शब्द टाकला. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात काँग्रेसने त्यांचे नाव निश्चित केल्याचे समजते.

 

शिवसेनेच्या विरोधामुळे भाजपने अद्याप ईशान्य मुंबईत किरीट सोमय्यांची उमेदवारी जाहीर केली नाही. वाद न मिटल्यास ही जागा रिपाइंने आठवलेंसाठी मागितली.काँग्रेसमध्ये एका गटाच्या विरोधामुळे सांगलीच्या जागेचा आघाडीने निर्णय घेतलेला नाही.नगरमध्ये भाजपचे तिकीट कापलेले खासदार दिलीप गांधी यांची उमेदवार सुजय विखेंनी भेट घेऊन केली मनधरणी.


(राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे  हिंगोलीत शिवसेनेचे शिवाजी जाधव यांचे बंड शांत. अपक्ष म्हणून दाखल केलेली उमेदवारी मागे घेतली.)

बातम्या आणखी आहेत...