आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधुळे - शासनाला खोटी कागदपत्रे सादर करुन एमबीबीएसचे शिक्षण व शिष्यवृत्तीचा लाभ उपटणाऱ्या नऊ डॉक्टरांकडून एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाने एक कोटी दोन लाख रुपये वसूल केले. पोलिसांकडून याप्रकरणी अजूनही संबंधित डॉक्टरांना अटक झालेली नाही. तसेच या प्रकरणी काही शासकीय कार्यालयामधील अधिकाऱ्यांचीही चौकशी केली जाऊ शकते.
साक्री रोडवर असलेल्या अण्णासाहेब चुडामण पाटील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेताना जातीची खोटी कागदपत्रे सादर केली. आदिवासी असल्याचे भासवून त्या प्रवर्गातून एमबीबीएस़ला प्रवेश घेण्यात आला.
एवढेच नव्हे तर आदिवासींना मिळणारी शिष्यवृत्तीही लाटण्यात आली. सन २०११ पासून ते सन २०१७ पर्यंत या पध्दतीने नऊ जणांनी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करून डॉक्टर पदवी मिळवली. या काळात एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाला संशय आल्यामुळे त्यांच्याकडून कागदपत्रांची तपासणी व फेरतपासणी सुरु झाली होती. त्यातून हा संपूर्ण प्रकार समोर आला. प्रकल्प कार्यालय केवळ एवढ्यावरच थांबले नाही, तर पुढाकार घेत पोलिसांना याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
गेल्या महिन्यात याप्रकरणी नऊ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसरीकडे याच प्रकल्प कार्यालयाने संबंधित नऊ डॉक्टरांकडून एक कोटी दोन लाख रुपये वसूल केले. तर पोलिसांचा तपास सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणात शासनाची फसवणूक केल्याबद्दल अधिकाऱ्यांनाही अटक केली जाऊ शकते. तत्कालीन लिपिक, अधिकाऱ्यांची चौकशीही होऊ शकते. प्रसंगी काहीजणांना अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अशी झाली शिष्यवृत्तीच्या रकमेची वसुली
गुन्हा दाखल असलेले अन्सारी सम्मक फारुख यांच्याकडून सुमारे १० लाख ७० हजार ३९० रुपये वसुली केली आहे. तर फारुखी शाखीर हाशिम व पावसकर सल्मान मुबारीक यांच्याकडून प्रत्येकी १३ लाख एक हजार ५५, खान दानिश अब्दुल रशिद व खान मोहंमद अनस इफ्तेखारुल हसन यांच्याकडून प्रत्येकी १० लाख ५१ हजार ५०५, शेख मुबाशिरा मोहंमद इक्बाला १३ लाख ४७ हजार ६४१, शेख सदफ मोहंमद १० लाख ६२ हजार ६७०, प्रशांती भूमाह उप्पा चार लाख ७ हजार ४५५ रुपये तर शुभम मुनींद्र मिश्रा आठ लाख ९० हजार २४६ रुपये एवढी वसुली झाली आहे.
अामच्याकडेच तपास पाहिजे
नेहमी पोलिस स्टेशन व हद्दीचा वाद पुढे करणाऱ्या पोलिसांनी मात्र या क्रिम व मलईदार गुन्ह्याच्या तपासात गुन्हा आमच्याच हद्दीत घडला. तपास आम्हीच करणार, अशी भूमिका घेतली. त्यामुळे चाळीसगाव रोड व आझादनगर पोलिसांनी आम्हीच तपास करणार, असा व्होराही दिला. घटनेच्या वेळी पोलिस ठाण्याचे विभाजन झाले नव्हते. प्रकल्प कार्यालय आझादनगर पोलिस ठाण्यात यायचे, अशी भूमिका आझादनगर पोलिसांनी घेतली. तर गुन्हा दाखल करतांना प्रकल्प कार्यालय चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्यामुळे त्यांनीही तसा पवित्रा घेतल्याची चर्चा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.