आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक झालेले नऊ भारतीय यूएईत अडकले; सोशल मीडियावरून मिळाले होते नोकऱ्यांचे प्रस्ताव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई - सोशल मीडियाद्वारे बनावट नोकऱ्यांचे प्रस्ताव मिळालेले नऊ भारतीय नागरिक युनायटेड अरब अमिरातीत (यूएई)अडकून पडले आहेत, असे वृत्त ‘खलीज टाइम्स’ने रविवारी दिले. हे सर्व जण केरळमधील असून ते सध्या अल एेन आणि अजमन येथे अडकून पडले आहेत. या सर्वांची शफिक नावाच्या एजंटशी व्हाॅट्सअॅपवर ओळख झाली होती. त्यांनी यूएईच्या व्हिजिट व्हिसासाठी त्याला ७० हजार रुपये दिले होते, असे या वृत्तात म्हटले आहे.
केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील फाझिल हा युवक त्यापैकी एक. त्याने सांगितले की, ‘यूएईत १५ दिवसांत नोकरी मिळवून देतो असे आश्वासन देणारा व्हाॅट्सअॅप मेसेज केरळमध्ये खूप शेअर झाला होता. मलाही असा फाॅरवर्डेड मेसेज मिळाला. अनेक जण त्यात रस दाखवत असल्याने मलाही तो खरा वाटला. मी एका एजंटशी बोललो. त्याने मला अल एेन येथील सुपरमार्केटमध्ये नोकरी देण्याचे आश्वासन दिले. तुला दरमहा २२,४९६ रुपये वेतन मिळेल तसेच राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था मोफत होईल, असे त्याने मला सांगितले. त्यावर विश्वास ठेवून मी माझ्या आईचे दागिने गहाण ठेवले आणि पैसे जमा करून त्याला दिले. आता मी नोकरीशिवाय घरी परतू शकत नाही.’


मोहंमद रफिक (३०) हा कोझिकोडे येथील दुसरा युवक. त्याने सांगितले की, ‘नोकरीसाठी मी मित्रांकडून आणि कुटुंबीयांकडून ७० हजार रुपये उसने घेतले. माझ्यासह नऊ जणांनी एजंटला रक्कम दिली. एजंटने आमच्या नऊ जणांचा स्वतंत्र व्हाॅट्सअॅप ग्रुप स्थापन केला. आम्ही परस्परांच्या संपर्कात होतो. तुम्हाला सर्वांना एकत्रित यूएईला जायचे आहे, असे एजंटने आम्हाला सांगितले. १५ जुलैला आम्ही अबुधाबी येथे गेलो. शमशीर नावाचा स्थानिक एजंट आम्हाला विमानतळावर भेटला. त्याने आमची दोन गटांत विभागणी केली. चार जणांना अजमान येथे तर पाच जणांना अल एेन येथे नेण्यात आले. आम्ही जेव्हा नोकरीबाबत विचारणा केली तेव्हा त्याने सांगितले की, सुपरमार्केटचे अधिकारी तुरुंगात आहेत. त्यामुळे आता आम्हाला तुमच्यासाठी नवीन नोकरी शोधावी लागेल. आपली फसवणूक झाल्याचे आमच्या लगेचच लक्षात आले.’


अबुधाबीतील भारतीय दूतावास या सर्वांना आता मदत करत आहे. त्यांना परत मायदेशी पाठवण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दूतावासाने दिले आहे. 

 

भारतीय दूतावासाने दिला होता सावधगिरी बाळगण्याचा इशारा
भारताच्या दुबईतील दूतावासाने अलीकडेच याबाबत सावधगिरीचा इशाराही दिला होता. यूएईत भारतीयांना नोकऱ्या देण्याचे आमिष बनावट जाहिरातींमधून दाखवले जात आहे. अशा आमिषाला बळी पडू नका. असा प्रस्ताव आल्यास आधी दूतावासाकडे विचारणा करा, असेही दूतावासाने कळवले होते. त्यानंतर ही घटना घडली आहे.

बातम्या आणखी आहेत...