आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंचन घोटाळ्यात नऊ प्रकरणांची चौकशी बंद, अजित पवारांचा या प्रकरणांशी संबंध नाही : एसीबी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर : महाराष्ट्रात हाय व्होल्टेज राजकीय नाट्य सुरू असताना सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बहुचर्चित सिंचन घोटाळ्यातील ९ प्रकरणांची चौकशी बंद करण्यात येत असल्याचा आदेश काढला. यामुळे तत्कालीन जलसंपदामंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लीन चिट मिळाल्याची चर्चा सुरू होत एकच खळबळ उडाली. विदर्भ पाटबंधारे महामंडळांतर्गत अमरावती विभागातील ९ प्रकरणांची चौकशी बंद करण्यात (नस्तीबंद) येत आहे. मात्र आवश्यकता भासल्यास पुन्हा चौकशी सुरू करण्यात येईल, अशीही मेखही या आदेशात मारण्यात आली आहे.

दरम्यान, वाद होताच एसीबीचे अपर महासंचालक विपिनकुमार सिंह यांच्यावर या प्रकरणांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंध नसल्याचा खुलासा करण्याची पाळी आली. आम्ही सिंचनाशी संबंधित ३ हजार निविदांचा तपास करत आहोत. बंद केलेल्या या नियमित चौकशा असून सध्या सुरू असलेला सर्व तपास पूर्वीप्रमाणेच सुरू राहील, असे एसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले. आघाडीच्या सत्ताकाळातील कथित ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यात तत्कालीन जलसंपदामंत्री म्हणून अजित पवार यांच्यावर आरोप आहेत. त्यांची चौकशी सुरूच आहे.

या नऊ प्रकरणांची चौकशी झाली बंद


गोडेगाव लघु पाटबंधारे योजना (जि.वाशीम, ता. मानोरा) पाचपहूर लघु पाटबंधारे योजना (जि. यवतमाळ ता. झरीजामणी) कोहन लघु प्रकल्प (ता. नेर) बेंबळा प्रकल्पाशी संबंधित ३ प्रकरणे सपन नदी प्रकल्प पंढरी नदी प्रकल्प (जि. अमरावती) खडकपूर्णा प्रकल्प (जि. बुलडाणा)

फौजदारी अनियमितता आढळली नाही : एसीबी


एसीबीने सांगितले, या ९ प्रकरणांत फौजदारी अनियमितता कुठलीही आढळून आली नसल्याने ४-५ महिन्यांपूर्वीच ती चौकशी बंद करण्याचा प्रस्ताव अमरावती एसीबीने दिला. विदर्भ पाटबंधारे महामंडळातील ४५ प्रकल्पांशी संबंंधित २,६५४ निविदांची चौकशी एसीबी करत होती. २१२ निविदांची खुली चौकशी पूर्ण झाली. २४ प्रकरणांत एफआयआर, तर ५ प्रकरणांत दोषारोप दाखल आहेत. मात्र, ४५ निविदांच्या चौकशीत अनियमितता आढळून न आल्याने ती प्रकरणे बंद केली. या प्रकरणात अजित पवारांचा संबंध नाही.

इतर प्रकरणांची चौकशी पूर्वीप्रमाणे सुरूच राहणार


चौकशी बंद झालेली प्रकरणे 'रुटीन' स्वरूपाची असून इतर प्रकरणांची चौकशी पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे. त्याचप्रमाणे नस्तीबंदची असलेली प्रकरणे सशर्त बंद केली जात आहेत. त्याबाबत एखादी माहिती पुढे आली अथवा न्यायालयाचे आदेश आल्यास ती पुन्हा एकदा चौकशीसाठी खुली केली जाऊ शकतात, असेही एसीबीच्या महासंचालकांनी स्पष्ट केले आहे.
 

बातम्या आणखी आहेत...