आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेवला । लोकसभा सार्वजनिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू असताना येवला तहसील कार्यालयाच्या आवारात परवानगी न घेता मंडप टाकून उपोषण सुरू केल्याने तालुक्यातील मुरमी येथील नऊ जणांवर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा येवला शहर पोलिस ठाण्यात दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, रितसर पत्र देऊन ग्रामस्थ उपोषणाला बसलेले असताना गुन्हा दाखल करून त्यांच्यावर अन्यायच झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने हा गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी माजी सभापती संभाजी पवार यांनी केली आहे.
मुरमी ग्रामपंचायतीच्या कामामध्ये एक कोटीपेक्षा जास्त रकमेचा भ्रष्टाचार झाला आहे. या कामाची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा १८ मार्चपासून तहसीलसमोर उपोषणाला बसण्याचा इशारा ६ मार्चला निवेदनाद्वारे दिला हाेता. त्यानुसार सोमवारी नऊ ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले. अधिकाऱ्यांनी याकडे पाठ फिरवल्याने रात्री उशिरा माजी सभापती संभाजी पवार यांनी मध्यस्थी करत उपोषण मिटवले. मात्र, रात्री उशिरा आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात अाला. प्रांताधिकारी राजेंद्र पाटील व तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्या सूचनेनुसार आचारसंहिता प्रमुख विजय रोडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आचारसंहिता सुरू असताना तहसीलच्या आवारात परवानगी न घेता उपोषण सुरू केल्याने आचारसंहितेचा भंग केला. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला.
माहिती दिल्यानंतरही केले उपोषण
ग्रामस्थांची तक्रार गटविकास अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली असल्याने त्यांच्याकडे दाद मागा असे पत्र देऊन उपोषण करू नका, असेही आवाहन केले हाेते. जिल्हा परिषद याबाबत कारवाई करेल. त्यामुळे घाई करू नका असे आवाहन करत आचारसंहिता असल्याने गुन्हा दाखल होऊ शकतो अशीही माहिती दिली हाेती. त्यानंतरही तहसील आवारात उपाेषण सुरू केल्याने गुन्हा दखल करावा लागला.
रोहिदास वारुळे, तहसीलदार
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.