आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाेवर-रुबेला लसीपासून नऊ हजार मुस्लिम मुले वंचित; गैरसमजामुळे पालकांची पाठ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी गाेवर-रुबेला लसीबाबत गैरसमजामुळे मुस्लिम समाजाची शहरातील ९ हजार ७८९ मुले लसीकरणापासून वंचित राहत असल्याची धक्कादायक बाब महापालिकेच्या आढावा बैठकीत उघडकीस आली आहे. महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी तातडीने मुस्लिम धर्मगुरू, समाजसेवकांसह शाळा प्रशासनाच्या प्रतिनिधींची सोमवारी (दि. १४) दुपारी ३ वाजता बैठक बोलविली आहे. 

 

दरवर्षी ५० हजार बालकांचा गोवरमुळे मृत्यू, तर रुबेलामुळे ४० हजार बालकांना व्यंगत्व येत असल्याची बाब लक्षात घेत केंद्र शासनाने लसीकरण माेहीम हाती घेतली आहे. २७ नाेव्हेंबरपासून या माेहिमेअंतर्गत ९ महिने ते १५ वर्षांदरम्यानच्या सर्व बालकांना मिझल रुबेला लसीचे एक इंजेक्शन देण्यात येत असून शहरात ४ लाख ९० हजार २१८ बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे; मात्र या माेहिमेत प्रमुख अडचण रुबेलाबाबतच्या गैरसमजाची आहे. अज्ञानातून त्याची धास्ती घेतली गेली आहे. मात्र, वैद्यकीय अधिकारी त्याची खातरजमा करूनच बालकांना घरी पाठवत आहेत. 

 

महापालिका आयुक्त गमे यांनी वैद्यकीय अधीक्षक डाॅ. राहुल गायकवाड यांच्याकडून आढावा घेतल्यानंतर उर्दू माध्यमाच्या १६ शाळांमधील १६ हजार ८४ विद्यार्थ्यांपैकी जेमतेम ६२९५ बालकांचे लसीकरण झाले आहे. पालकांच्या विरोधामुळे अद्यापही ९ हजार ७८९ बालकांचे लसीकरण होऊ शकलेले नाही. 

 

दहा दिवसांत सव्वा लाख लसीकरणाचे आव्हान 
गोवर-रुबेला लसीकरण मोहीम २० जानेवारीला संपणार आहे. दहा दिवसांत तब्बल एक लाख २० हजार बालकांना लसीकरणाचे आव्हान आहे. आतापर्यंत ३ लाख ७० हजार ११५ बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे. मोहिमेचे ७५.५० टक्के उद्दिष्ट आतापर्यंत साध्य होऊ शकले आहे. शाळेव्यतिरिक्त घरी असणाऱ्या तीन वर्ष वयाेगटातील मुलांचे सर्वेक्षण केले जाणार अाहे. 

 

९६८ बालकांनी नाकारली लस 
वडाळागाव परिसरातील लिली व्हाईट व संजयनगर भागातील दावूल फलां मदरशातील ९३८ बालकांनी लस नाकारली आहे. या शाळांमधील अनुक्रमे ७६६ व १७२ विद्यार्थी लसीकरणापासून वंचित राहिले आहेत. 

 

या शाळांचा सन्मान 
१०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण केलेल्या महापालिका क्षेत्रातील डॉन बाॅस्को, धनलक्ष्मी, मनपा शाळा क्रमांक ८६ व ८७ (पाथर्डी), मनपा शाळा क्रमांक २४ (विश्वासनगर), मातोश्री भोर हायस्कूल (सातपूर), मनपा शाळा क्रमांक २८ (सातपूर), अभिनव बालविकास मंदिर, बिटको गर्ल्स हायस्कूल, सेंट्रल स्कूल आर्टिलरी सेंटर, मराठा हायस्कूल या शाळांच्या मुख्याध्यापकांचा पालिका आयुक्त गमे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. 
 

बातम्या आणखी आहेत...