आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'या' गावात धूलिवंदनाला काढतात जावयाची गर्दभस्वारी, अशी मिरवणूक काढण्याची नव्वद वर्षांची परंपरा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विडा गावात जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्याची नव्वद वर्षांची परंपरा
  • मस्साजाेग येथे जावयाला पकडले, केजहून किरायाने आणले गाढव

संतोष गालफाडे 

केज - धूलिवंदनाच्या दिवशी विडा गावात जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्याची नव्वद वर्षांची परंपरा आहे. यंदा मस्साजोग येथील जावयाला पकडून जीपमधून मिरवणुकीसाठी विडा येथे आणण्यात आले. गावात गाढव नसल्याने केज येथे दोन हजार रुपये खर्चून किरायाने गाढव आणण्यात आले.  ढोल-ताशांच्या गजरात जावयाची मिरवणूक काढली.  मिरवणुकीचा समारोप झाल्यांनतर सासुरवाडीकडून जावयाला आहेर भेट देऊन मानसन्मान करण्यात आला.  बाबासाहेब पवार यांचे मस्साजोग येथील जावई दत्तात्रय गायकवाड हे यंदाचे या मिरवणुकीचे मानकरी ठरले. केज तालुक्यातील विडा गावात धूलिवंदनाच्या दिवशी जावयाची गाढवावरून मिरवणूक काढून धुळवड साजरी करण्याची ९० वर्षांपासून परंपरा आहे. धुळवड जवळ आली की या गावातील एक-एक जावई पसार व्हायला लागतात.  मंगळवारी  धूलिवंदनाचा दिवस उजाडला होता. पथके जावयांना शोधण्यासाठी निघाली. एका पथकाला बाबासाहेब पवार यांचे मस्साजोग येथील जावई दत्तात्रय गायकवाड हे गावात असल्याची माहिती मिळाली. गायकवाड सकाळी सात वाजता घरातून  मस्साजोग बसस्थानकावर मटण खरेदीसाठी आले, तोच धूलिवंदन उत्सव समितीचे शहाजी गुटे, उपसरपंच बी. आर. देशमुख, लहू घोरपडे, सूरज पटाईत, अविनाश सिरसाट, गोविंद देशमुख यांनी त्यांना  गावातच पकडले. त्यांना जीपमध्ये टाकून  मस्साजोगहून थेट विड्याला आणले. यंदाही गाढव  केज शहरातील एका वीटभट्टीवरून दोन हजार रुपये भाडे मोजून आयात करावे लागले. मिरवणुकीची तयारी होईपर्यंत त्यांना गावात  फिरवले.   गाढव हजर झाल्यावर गायकवाड यांना थाटात गाढवावर बसवून ग्रामपंचायतीच्या कार्यालयापासून मिरवणूक काढण्यात आली. हनुमान मंदिरावर उत्सव समितीच्या वतीने सरपंच भैरवनाथ काळे, पंचायत समिती सदस्य पिंटू ठोंबरे यांच्या हस्ते  गायकवाड यांचा आहेर देऊन सन्मान करण्यात आला. अशी झाली प्रथा रूढ 

विडा येथील निझामकालीन ठाकूर स्व. आनंदराव देशमुख यांनी ९० वर्षापूर्वी आपल्या जावई बापूंची थट्टामस्करीतून गाढवावरून मिरवणूक काढली होती. तेथून पुढे प्रत्येक वर्षी गावातील सर्व जाती - धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन प्रत्येक वर्षी एकोप्याने जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्याची प्रथा रूढ झाली आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...