आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिळदार मिशांच्या अवतारात नीरव माेदी लंडनमध्ये माेकाट, महिना साडेपंधरा लाख किराया देऊन वास्तव्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन  - पंजाब नॅशनल बँकेचे (पीएनबी)  १३७०० कोटी रुपये हडप करून पळालेला नीरव मोदी लंडनच्या रस्त्यांवर मुक्तपणे फिरताना दिसला आहे. इंग्लंडमधील द टेलिग्राफ या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार नीरव मोदीने सोहो येथे व्यावसायिक कार्यालय थाटले आहे. तेथून तो ब्रँड बदलून हिऱ्यांचा व्यवसाय चालवतो आहे. नव्या ब्रँडच्या नावाचा खुलासा अद्याप झालेला नाही.


जानेवारी २०१८ मध्ये तो दुबईमार्गे इंग्लंडमध्ये गेला होता. जुलैमध्ये इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. तत्पूर्वी मेमध्येच त्याने नवा व्यवसाय सुरू केला होता. नीरवकडे तेथे राष्ट्रीय विमा क्रमांकही आहे. हा क्रमांक इंग्लंडच्या डायरेक्टर फॉर वर्क अँड पेन्शनने जारी केला आहे. यामुळे त्याला इंग्लंडमध्ये ऑनलाइन बँक खाते चालवणे सोयीस्कर झाले आहे. नीरवचा व्हिडिओ आल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले, नीरव मोदी आणि त्यांचे भाऊ पंतप्रधान मोदी यांच्यात साम्य आहे. दोघांनीही भारताची लूट केली आहे. दोघांनाही शिक्षा व्हायला हवी. 


मल्ल्याला तीन वेळा भेटल्याची माहिती     
फरार मद्य व्यावसायिक विजय मल्ल्याची नीरवने लंडनमध्ये तीन वेळा भेट घेतल्याचा दावा सरकारी सूत्रांनी केला. प्रत्यार्पण प्रक्रियेतून वाचण्यासाठी नीरवने मल्ल्याची भेट घेतल्याची शक्यता आहे. यासाठी त्याने इंग्लंडमध्ये आश्रय मागितला आहे. भारतात जिवाला धोका असल्याचे वक्तव्य नीरवने केले होते.


वार्ताहराचे नीरवला 8 प्रश्न, सर्वांचे उत्तर - नो कॉमेंट्स 
वार्ताहराने नीरवला रस्त्यावरच अडवले व प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. नीरव टॅक्सीच्या शोधात इकडे-तिकडे फिरकत राहिला. प्रत्येक प्रश्नावर त्याचे नो कॉमेंट्स असे उत्तर  होते. त्याला हे ८ प्रश्न विचारण्यात आले.   
- तुम्ही इंग्लंडमध्ये राजकीय आश्रयासाठी अर्ज केला आहे काय?  
- तुमच्याकडे भरपूर पैसा आणि लोक आहेत काय?   
- सध्या तुम्ही कोठे आहात याची माहिती कोणाला हवी आहे?   
- इंग्लंडमध्ये किती दिवस राहण्याचा विचार आहे?  
- सरकारी सूत्रांच्या मते, तुम्ही राजकीय आश्रयासाठी अर्ज केला आहे. सूत्रांच्या मते, तुमच्या विरोधात प्रत्यार्पणाचा खटला चालणार आहे, यावर तुमचे मत काय ?  
- तुमच्या मित्राबाबत (नाव वगळले) काय सांगाल? तो आपला सहकारी आहे.  
- आमच्या माहितीप्रमाणे तुम्ही ब्रँडचे नाव बदलून (नाव वगळले) व्यवसाय करत आहात.  
इतक्यात टॅक्सी आली आणि नीरव निघून गेला.


इंग्लंड सरकार : प्रत्यार्पण प्रकरण कोर्टात
नीरवचा व्हिडिओ आल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सांगितले की, इंग्लंडहून नीरवच्या भारतात प्रत्यार्पणाची मागणी जुलैमध्येच केली होती. भारताचा यासंदर्भातील अर्ज वेस्टमिन्स्टर कोर्टात पाठवण्यात आल्याचाे इंग्लंडच्या गृहमंत्री कार्यालयाने म्हटले आहे. लवकरच खटला सुरु होईल  

बातम्या आणखी आहेत...