आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यवसाय कौशल्याने वाढला निर्लेप उद्योगाचा विस्तार; उद्योजक राम भोगले यांचे प्रतिपादन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- लहान वयातच आई-वडिलांकडून जीवनकौशल्याचे धडे मिळत गेले. वयाच्या पंधराव्या वर्षी व्यवहारज्ञान आत्मसात झाले. वडिलांबरोबर कारखान्यात काम करत असतानाच या व्यवसायाविषयीची आत्मीयता निर्माण होत गेली. जीवनकौशल्य व व्यवहारज्ञानाचे बाळकडू लहान वयातच आई-वडिलांकडून तसेच कुुटुंबियांकडून मिळत गेल्याने पुढे निर्लेपचा विस्तार वेगाने वाढत गेला, असे सांगत उद्योजक राम भोगले यांनी निर्लेपच्या यशाचा प्रेरणादायी प्रवास उलगडला. 


सिनर्जी फाउंडेशनतर्फे येथील रावसाहेब थोरात सभागृहात गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अपर्णा क्षेमकल्याणी यांनी राम भोगले यांची मुलाखत घेतली. या वेळी भोगले यांनी निर्लेपची कथा या विषयावर उद्योजकतेचा प्रवास उलगडून सांगितला. यावेळी सिनर्जी फाउंडेशनचे चेअरमन संदीप नाटकर, अॅड. जयंत जायभावे, सुदीप अणावकर, आनंद निकेतनच्या संचालिका विनोदिनी काळगी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी भोगले यांच्या हस्ते डॉ. गोसावी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी विनोदिनी काळगी यांचाही मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. 


यावेळी राम भोगले यांनी बालपणीच्या अाठवणी उलगडून सांगितल्या. ते म्हणाले की, वडील इंजिनिअर व आई गृहिणी होती. मोठे कुटुंब असल्याने लहान वयातच जीवनकौशल्य व व्यवहारज्ञान आत्मसात करण्याची संधी मिळत गेली. वडिलांबरोबर तेव्हा कारखान्यात काम करण्याची संधी मिळत गेल्याने या व्यवसायाविषयी आत्मीयता निर्माण होत गेली. लहानपणी स्वभावात रागीटपणा जास्त होता. परंतु, आजीकडून मिळालेल्या एका सल्ल्यानंतर रागावर नियंत्रण मिळवून स्वभावामध्ये नम्रपणा आल्याचेही त्यांनी नमूद केले. १९६५ मधील युद्धाच्या काळात आपल्याकडे स्टेनलेस स्टील तयार होत नव्हते. तेव्हा वडिलांनी वर्षभर विविध प्रयोग करून १९६७ मध्ये बाजारात निर्लेपची गुढी उभारल्याचेही भोगले यांनी सांगितले. शिक्षणातून सर्वांगीण प्रगती होत असल्याचे यावेळी डॉ. गोसावी यांनी सांगितले. प्रा. स्नेहा रत्नपारखी यांनी सूत्रसंचालन केले. तर अॅड. जयंत जायभावे यांनी आभार मानले. 


निर्लेप नावामागील प्रसंग 
आपल्या उद्योगाला निर्लेप हे नाव कसे ठेवण्यात आले याचाही प्रसंग उलगडून सांगताना राम भोगले म्हणाले की, आमचे मोठे कुटुंब असल्याने वडिलांवर आजीची अधिक माया होती. वडिलांना जेव्हा काहीतरी गोड पदार्थ खायला देत, तेव्हा प्रत्येक वेळी ते त्यातील काही भाग सर्व भावंडांना वाटून देत आणि उरलेला स्वत: खायचे. अशा वेळी आजी वडिलांना म्हणायची की, त, फार निर्लेप आहेस. निर्लेप अर्थात नि:संग. यावरूनच मग उद्योगालाही निर्लेप नाव ठेवण्यात आल्याचेही भोगले यांनी यावेळी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...