आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदारकीचा राजीनामा दिलेल्या गावित आज सेनेत जाणार; उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - इगतपुरी (जि. नाशिक) येथील काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांनी मंगळवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा दिला. या वेळी त्यांच्यासाेबत उद्याेगमंत्री सुभाष देसाई व शिवसेनेचे इतर नेते उपस्थित हाेते. बुधवारी गावित पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणूकही त्या शिवसेनेकडूनच लढवणार आहेत. नंदुरबारमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांच्या निर्मला या कन्या आहेत. गेली अनेक वर्षांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या गावित कुटुंबातील महिलेने आता शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, साताऱ्यातील खासदार तथा राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उदयनराजे भाेसलेही आता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वीच साताऱ्यातील राष्ट्रवादीचे आमदार व उदयनराजेंचे भाऊ शिवेंद्रसिंह राजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच याच जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते तथा विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकरही भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. या दाेन्ही नेत्यांचे उदयनराजेंशी अजिबात पटत नाही. आता थेट उदयनराजेच भाजपात येणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने या दाेन्ही नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी शिवेंद्रराजे यांनी ‘वर्षा’वर जाऊन मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याचेही वृत्त आहे.

निमित्त पूरग्रस्तांना मदतीचे
खासदार उदयनराजे भाेसले यांच्यासह शिष्टमंडळाने मंगळवारी मुख्यमंत्र्यांची मुंबईत भेट घेऊन एक निवेदन दिले. पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त लाेकांना तातडीने मदतीचे वाटप करावे व त्यांच्या पुनर्वसनाच्या कामाला गती मिळावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. मात्र याच प्रसंगावरुन राजे भाजपात येणार असल्याची चर्चा सुरू झाली. 

बातम्या आणखी आहेत...