आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Nirmala Jadhav Dilip Chavan Madhurima Article About Divyamarathi Ratragini Campaign

अंधाराची मज तमा नाही...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निर्मला जाधव / दिलीप चव्हाण   

अंधार आणि अंधाराचे सोबती असणाऱ्या शोषणाच्या व्यवस्थांविरुद्ध प्रतीकात्मक चाल करून सरसावलेल्या रातरागिणींची देखील मस्करी आणि विनोदरूपी पाडाव करण्याचेही प्रयत्न केले जातील. कारण ‘विनोद’ हेदेखील पितृसत्ताक व्यवस्थेचे स्त्रियांविरोधात अतिशय गांभीर्याने वापरले जाणारे अमोघ शस्त्र आहे, पण ना सुरक्षा कवच, ना सौंदर्यजाल, ना अंधारभयाला जुमानता हा भगिनीभाव, हा परिवर्तनाचा कारवाँ रस्तोरस्ती असाच बुलंद होत जावो हीच सदिच्छा.
२२  डिसेंबर या वर्षातील सगळ्यात मोठ्या रात्री महाराष्ट्रातील बावीसपेक्षा अधिक शहरांतील हजारो स्त्रिया दै. दिव्य मराठी आयोजित ‘रातरागिणी नाइट वॉक’ मध्ये रस्त्यावर संचारल्या आणि जणू काही अंधाराला पळता भुई थोडी झाली. अलीकडे हैदराबाद येथे सत्तावीस वर्षीय डॉक्टर महिलेवर रात्रीच्या वेळी बलात्कार करून पेट्रोल टाकून जाळण्याच्या घटनेने मनाचा थरकाप उडून सार्वजनिक ठिकाणी विशेषत: रात्रीच्या वेळी बाहेर पडण्याचं स्त्रियांचं अवसानच जणू या घटनेनं हिरावून घेतलं. वास्तविक अशा घटना आपल्या समाजाला नवीन नाहीत. मात्र सातत्याने घडणाऱ्या या घटनांपरत्वे एक अनामी दहशत स्त्रियांना एक-एक पाऊल मागे ढकलून भीतीच्या कोंदणात बंदिस्त करतात.गुन्हेगारांना शिक्षा होणारी सक्षम यंत्रणा उभारणीसोबत गरज आहे प्रश्नाच्या कारणीभूत घटकांच्या लिंगभावी आकलनाची आणि दीर्घकालीन सकारात्मक प्रयत्नांची. दै. दिव्य मराठी आयोजित ‘नाइट वॉक’कडे या सकारात्मक प्रयत्नांचाच एक भाग म्हणून बघायला हवे. भारत हा पितृसत्ताक समाज आहे. पितृसत्ताक ही अतिशय चलाख समाजव्यवस्था असून ती कायम शोषणाच्या इतर सत्ताव्यवस्थांशी हात मिळवणी करून आपली अधिसत्ता कायम राखत असते. जातिव्यवस्था, भांडवलशाही, धर्मसंस्था इ. अनेक शोषणव्यवस्थांच्या भागीदारीत ती कार्यरत असते. त्यामुळे स्थल-कालानुरूप ती स्वत:ला कायम बदलत आणि उद्यावत करत राहते.स्त्रीवादी भूगोल शास्त्रज्ञाने हे अधोरेखित केले आहे की, शहराच्या सार्वजनिक अवकाशातील अनेक क्षेत्रे  लिंगभावाधारित असून स्त्रियांच्या मुक्त वावराला नियंत्रित करणारे व वगळणारे देखील असते. इतकेच नाही तर स्त्रियांच्या सार्वजनिक क्षेत्रातील संचाराला भयभीत करणारेही असते. चौकातील चहाच्या टपऱ्या, दारू-जुगाराची अड्डे इ. ठिकाणे सार्वजनिक अवकाशातील सत्ताक्षेत्राप्रमाणे कार्यान्वित होतात. सार्वजनिक अवकाशातील सर्वच ठिकाणी सर्वच स्त्रियांना समान उपलब्धता प्राप्त होत नाही. यामध्ये लिंगासोबतच जात, वर्ग, भाषा, धर्म, शारीरिक सबलत्व इ. अनेक घटक प्रभावी ठरतात. सार्वजनिक क्षेत्रातील स्त्रीच्या वावराला पोशाख, काळ, वेळ, उद्देश, उपयुक्तता आदींच्या फुटपट्ट्यांवरती जोखले जाते आणि लैंगिक हिंसाचाराच्या घटनांची मुळे चोराच्या उलट्या बोंबाप्रमाणे वरील घटकांच्या स्त्रियांच्या उल्लंघनात शोधले जाते. तंव्हा लैंगिक हिंसाचार हा जितका पितृसत्ताक आहे, तितकीच सुरक्षितता हीदेखील पितृसत्ताक असते. हिंसाचार आणि बलात्कारापासून स्त्रियांचा बचाव करायचा म्हणजे यास कारणीभूत पुरुषी मानसिकता आणि पुरुषांचे उद‌्बोधन करण्याचे सोडून स्त्रिया आणि मुलींवरतीच अधिकाधिक निर्बंध लादले जातात. वेळेचे निर्बंध आणि सुरक्षेसंबंधी नियमातील तफावतीमुळे साहजिकच Men will be men, मुले हे खोडकरच असतात, मुलींवरती लैंगिक शेरेबाजी करणे, छेड काढणे यासारख्या गोष्टी होतच राहणार, म्हणून मुलींना अधिकाधिक सुरक्षेच्या कोंदणात बंदिस्त करणे व दुसरीकडे नियम आणि निर्बंधमुक्त मुलांचा आणि मुलांच्या वसतिगृहाचा पुरस्कार करणे हे ‘सुरक्षा’ नावाच्या यंत्रणेची पितृसत्ताकताच अधोरेखित करते आणि मुलींच्या व स्त्रियांच्या ‘सुरक्षे’मागील पितृसत्ताकधारणा, कायदा, पोलिस, न्यायालये, कुटुंब, शिक्षणसंस्था, प्रसारमाध्यमे, संस्कृती इ. मधून काटेकोरपणे जपली जाताना दिसते.सुरक्षेच्या याच उलट्या पितृसत्ताक मानसिकतेला धुडकावत हजारो रातरागिणी बाहेर पडल्या आणि बिनधास्तपणे मध्यरात्र सरेतेवर रस्त्यावर ऊर्जेने विहार करत राहिल्या. रस्त्यांवरचा वावर हा आमचा अधिकार आहे. रस्त्यावर लाइट्स, सीसीटीव्ही कॅमेरे, पोलिस गस्त, वाहतूक सुविधा, आपत्कालीन मदतीसाठीचे डिजिटल अ‍ॅप्स, इ. पुरविणे हे राज्याचे कर्तव्य आहे. एकीकडे ‘एन्काउंटर’ आणि दुसरीकडे ‘सातच्या आत घरात’ या चलाखीने प्रश्न सुटणार नाही आणि म्हणून पितृसत्ताक व्यवस्थेने निषिद्ध केलेली भगिनीभावाची भावना उरात बाळगून हजारो स्त्रियांचा लोंढा प्रतीकात्मकपणे अंधार आणि या अंधाराचे सोबती असणाऱ्या सर्व शोषणव्यवस्थांना खुले आव्हान देण्यासाठी दै. दिव्य मराठी आयोजित ‘नाइट वॉक’च्या माध्यमातून रस्त्यावर सरसावल्या होत्या. तथाकथित ‘सुखी संसार’ आणि ‘गृहिणी’ पणाच्या कुटुंब नावाच्या खाजगी क्षेत्रातील स्वत:च्या कठपुतळीपणाची जाणीव होऊन ‘अ डॉल्स हाऊस’ या नॉर्वेतील हेन्रीक इब्सेनच्या नाटकातील ‘नोरा’ ही नायिका स्वत:च्या अस्तित्वाच्या शोधात घराबाहेर पाऊल ठेवते. ‘नोरा’च्या या घराबाहेर पडण्याने संबंध युरोप हादरला होता आणि जगभरातील अनेक साहित्यिक नाटककारांपासून महाराष्ट्रातील अत्रे, रांगणेकरांपर्यंत अनेकांनी आपल्या बुद्धीची शकले लढवून सार्वजनिक अवकाशातील असुरक्षित नोराची अनेक प्रारूपे स्वत:च्या सोयीनुसार सादर केली. ‘सौंदर्य हेच स्त्रियांचे सामर्थ्य आणि सामर्थ्य हेच पुरुषाचे सौंदर्य’ व ‘स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते’ असे पितृसत्ताक गौरवाचे दाखले देत ‘घराबाहेर’ पडलेल्या निर्मलाला घरात घेऊन येतात. अशा प्रकारे घराबाहेर ‘स्वत्वाचा’ शोध घेणाऱ्या नोरा-निर्मलाला पितृसत्ताक व्यवस्थेतर्फे हजारो-लाखो मार्गांनी ‘सुरक्षित’ घरात परतण्यासाठीचे सर्वतोपरी प्रयत्न आजही केले जाताना दिसतात. पण ‘घर’ नावाची जागा खरंच किती ‘सुरक्षित’ आहे याची फोलता हेन्रिक इब्सेनने त्याच्याच पुढच्या ‘An enemy of the people’ या नाटकामधून जगाला दाखवून दिली होती. ‘जे जे खाजगी ते ते राजकीय’ म्हणत जहाल स्त्रीवाद्यांनीदेखील कुटुंब नावाच्या खाजगी-सुरक्षित जगातील राजकारण-सत्ताकारण उघड केले आणि खाजगी आणि सार्वजनिक या दुहीतील पितृसत्तेचे हितसंबंध त्यांनी उलगडले होते. विवाह, मातृत्व, सौंदर्य, प्रजनन ही सार्वजनिक अवकाश आणि सार्वजनिक क्षेत्रातील सत्ताकेंद्रापासून स्त्रियांना दूर ठेवणारी पितृसत्ताक यंत्रणा म्हणून कसे काम करतात ते स्पष्ट केले. तसेच कृतीच्या पातळीवर पितृसत्तेच्या या यंत्रणेला धक्के देण्याचे कामही जहाल स्त्रियांनी केलेले आहेत. पितृसत्तेचे लाभार्थी आव्हानाचे स्वर काढणाऱ्या स्त्रियांना घरे तोडणाऱ्या, मातृत्व नाकारणाऱ्या पुरुषी... वगैरेची सवंग टीका करून त्याचे गांभीर्य अव्हेरायला तत्पर असतात.अंधार आणि अंधाराचे सोबती असणाऱ्या शोषणाच्या व्यवस्थांविरुद्ध प्रतीकात्मक चाल करून सरसावलेल्या रातरागिणींची देखील मस्करी आणि विनोदरूपी पाडाव करण्याचेही प्रयत्न केले जातील. कारण ‘विनोद’ हेदेखील पितृसत्ताक व्यवस्थेचे स्त्रियांविरोधात अतिशय गांभीर्याने वापरले जाणारे अमोघ शस्त्र आहे, पण ना सुरक्षा कवच, ना सौंदर्यजाल, ना अंधारभयाला जुमानता हा भगिनीभाव, हा परिवर्तनाचा कारवाँ रस्तोरस्ती असाच बुलंद होत जावो हीच सदिच्छा.