आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरुपम यांना काँग्रेसकडून 'कारणे दाखवा' नोटीस!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेस पक्ष सोडण्याची व प्रचारापासून दूर राहण्याची घाेषणा करणारे मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांच्या कृतीची काँग्रेसने गंभीर दखल घेतली आहे. निरुपम यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार असून त्यांच्यावर कारवाईही होईल, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली.

निरुपम यांच्या टि‌्वटसंदर्भात दिल्लीहून आज प्रदेश काँग्रेसकडे विचारणा करण्यात आली. तसेच त्यांनी पक्षाच्या विराेधात केलेल्या वक्तव्याच्या बातम्यांची कात्रणेही मागवण्यात आली आहेत. त्याची खातरजमा केल्यानंतर पक्षाकडून निरुपम यांना कारणे दाखवा नाेटीस बजावली जाणार अाहे. काही मतदारसंघात पक्षाच्या इच्छूकांनी बंडखाेरी केली अाहे. त्यांनी साेमवारी अर्ज मागे न घेतल्यास त्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे. वर्सोवामध्ये आपल्या समर्थकास विधानसभा तिकीट द्यावे, अशी शिफारस निरुपम यांनी केली होती. मात्र ती मान्य न केल्याने निरुपम यांनी काँग्रेस सोडण्याची वेळ जवळ आली आहे, असे टि‌्वट केले होते. दरम्यान, निरुपम यांच्या पक्षविराेधी भूमिकेबद्दल राज्य प्रभारी मल्लिकार्जून खरगे यांना विचारले असता, 'मोठ्या लोकांविषयी मी काय बोलणार' असा टाेला त्यांनी लगावला. संजय निरुपम यांना शिवसेनेने राज्यसभेवर पाठवले होते. मात्र रिलायन्सविरोधी भूमिकेमुळे बाळासाहेबांनी त्यांची पक्षातून हाकालट्टी केली. नंतर २००५ मध्ये निरुपम काँग्रेसमध्ये आले. आता पुन्हा ते शिवसेनेत जाण्यास इच्छुक आहेत.

राहुल गांधी विदेशात गेल्याच्या अफवाच
सोनिया, राहुल आणि प्रियंका गांधी प्रचारासाठी राज्यात येणार आहेत. आम्ही राज्याच्या सहा विभागात त्यांच्या दोन, दोन सभा नियाेजित केल्या आहेत. आम्ही सभांची ठिकाणे आणि तारखा निश्चित केली आहेत. ११ तारखेनंतर आमचे हे तिन्ही स्टार प्रचारक प्रचारात उतरतील, अशी माहिती मल्लिकार्जून खरगे यांनी दिली. दरम्यान, राहुल गांधी देशाबाहेर गेल्याच्या बातम्या चुकीच्या असून विराेधक अफवा पसरवत अाहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 

बातम्या आणखी आहेत...