आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिव्हल: शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती उद्या उलगडणार वेद आणि विज्ञानाचा संबंध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- वेद आणि विज्ञानाचा नेमका काय संबंध आहे, गणित सर्व ब्रह्मांडाच्या मुळाशी कसे आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे गोवर्धनमठ, पुरी पीठाचे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती शुक्रवारी (२३ नोव्हेंबर) उलगडणार आहेत. दिव्य मराठी आयोजित दिव्य मराठी फेस्टिव्हलमध्ये सकाळी ११ वाजता होणाऱ्या त्यांच्या व्याख्यानात अनेक मुद्द्यांवर ते सखोल मार्गदर्शन करणार आहेत.


सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या परिसरातील पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ साहित्यनगरीत दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिव्हल २३ ते २५ नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. त्यातील पहिल्या सत्राचे उदघाटन शंकराचार्यांच्या व्याख्यानाने होईल. बिहार आणि दिल्लीत प्राथमिक शिक्षण झालेले शंकराचार्य शालेय जीवनात कुस्ती, कबड्डीपटू होते. शिवाय ते फुटबॉलही उत्तम खेळत होते. काशी, वृंदावन, हृषीकेश आदी ठिकाणी त्यांनी वेदांचा सखोल अभ्यास केला. १८ एप्रिल १९७४ रोजी त्यांनी संन्यास स्वीकारला. ९ फेब्रुवारी १९९२ रोजी ते गोवर्धनपीठाचे १४५ वे शंकराचार्य म्हणून स्थापित झाले.

 

त्यानंतर त्यांनी १५० पेक्षा अधिक ग्रंथ लिहिले. त्यात प्रामुख्याने शून्य आणि एक आकड्याशी संबंधित १२ ग्रंथांचा समावेश आहे. त्यांचा गणित सूत्रम नावाचा ग्रंथ अतिशय महत्त्वाचा मानला जातो. गर्भित स्वस्तिक गणित या त्यांच्या पुस्तकाचा गौरव ऑक्सफोर्ड, केंब्रिज विद्यापीठात झाला आहे. आतापर्यंत ११० पेक्षा अधिक देशांतील गणितज्ञांनी त्यांचा विविध मुद्द्यांवर सल्ला घेतला आहे. एवढेच नव्हे तर जागतिक बँकेला भेडसावणाऱ्या काही प्रश्नांविषयी त्यांनी ९ मे १९९९ रोजी दिल्ली येथील एका कार्यक्रमात मार्गदर्शन केले आहे. जेएनयू दिल्ली, आयआयएम अहमदाबाद, भाभा अणुविज्ञान केंद्र, सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशन अशा अनेक नामवंत संस्थांमध्ये त्यांची व्याख्याने झाली आहेत. यांत्रिक युगातही वैदिक परंपरेतील कृषी, वाणिज्य, जलसंसाधन, भोजन, वस्त्र, शिक्षण, आरोग्य, विवाह आदी क्षेत्रांत दडलेले विज्ञानाचे सूत्र अत्यंत महत्त्वाचे आहे, असे शंकराचार्य ठामपणे सांगतात. त्यामुळे त्यांच्या व्याख्यानाचा लाभ मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

(शंकराचार्यांचे व्याख्यान सर्वांसाठी खुले आहे. पासेस दिव्य मराठी कार्यालयात २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत उपलब्ध आहेत. कार्यक्रमस्थळीही पासेसची व्यवस्था आहे.)


पीयूष मिश्रांचे धारदार शब्द, स्वरांची रविवारी अपूर्व पर्वणी
हिंदी चित्रपटसृष्टी आणि काव्य जगतातील एक अफलातून व्यक्तिमत्त्व असलेल्या पीयूष मिश्रांच्या धारदार शब्द, स्वरांची अपूर्व पर्वणी रविवारी (२५ नोव्हेंबर) सायंकाळी ७ वाजता दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये रसिकांना मिळणार आहे. एखाद्या वल्लीसारखे जीवन जगलेले मिश्रा आज मान्यवर अभिनेते म्हणूनही गणले जातात. पण त्यांच्यातील कवी त्यापेक्षा अधिक ताकदीचा आहे. गँग्ज ऑफ वासेपूर चित्रपटातील 'इक बगल में चाँद होगा', गुलाल चित्रपटातील 'आरंभ है प्रचंड, बोल मस्तकों के झुंड' तसेच सरफरोशी की तमन्ना, वो काम क्या काम है, ही गीते प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यातील एक-एक शब्द कानावर पडताना अंगावर रोमांच उभे राहतात. रविवारी ते यासह त्यांची अनेक गीते खड्या आवाजात सादर करणार आहेत.


(पीयूष मिश्रा, साबरी ब्रदर्स यांच्या कार्यक्रमाचे पासेस दिव्य मराठी कार्यालयात सकाळी ११ ते ५ या वेळेत उपलब्ध आहेत.)


साबरी ब्रदर्स : खड्या आवाजातील तुफानी कव्वालींचे शहेनशहा
कव्वाली म्हणजे इस्लाममधील सुफी पंथाने भारतीय संगीताला दिलेली अपूर्व देणगी आहे. कव्वालीतून मांडले जाणारे शब्द जणूकाही भक्ती, प्रेम आणि शक्तीचा सागरच असतो. देशातील महान कव्वाल म्हणून परिचित असलेल्या साबरी ब्रदर्सची कव्वाली ऐकताना या सागराच्या लाटा किती तुफानी आहेत, हे लक्षात येते. दिव्य मराठीच्या लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता या तुफानाचा आनंद रसिकांना घेता येणार आहे. सामाजिक एकोपा, शांतता, प्रेमाचा संदेश देणाऱ्या एकापेक्षा एक सरस कव्वाल्या ते सादर करतील. या दुर्मिळ संधीचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे

बातम्या आणखी आहेत...