आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील ४२ लाख शिक्षकांना दिले जाणार ‘निष्ठा’चे प्रशिक्षण, शालेय शिक्षणातील गुणवत्ता वाढवणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगेश शेवाळकर हिंगोली - केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयातर्फे देशातील ४२ लाख शिक्षकांना निष्ठाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. शालेय शिक्षणातील गुणवत्ता वाढवणे हा या प्रशिक्षणाचा उद्देश असणार आहे. त्यासाठी त्रिपुरा राज्यातील प्रशिक्षणानंतर संपूर्ण भारतात हे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  देशात जिल्हा परिषदेच्या शाळांमधून शालेय गुणवत्ता वाढीवर भर दिला जात आहे. या शाळांमधून विद्यार्थी यांना अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी केंद्राच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने निष्ठा (नॅशनल इनिसेटिव्ह फॉर स्कूल हेड‌्स अँड टिचर्स होलिस्टिक अॅडव्हान्समेंट) हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात शाळांतील विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती, क्षमता आधारित अध्ययन आणि मूल्यांकन, विद्यार्थी केंद्रित अध्यापनशास्त्र, शाळा सुरक्षितता व सुरक्षा, अध्ययन अध्यापनात माहिती तंत्रज्ञानाचा वापर, आरोग्य व योगा, ग्रंथालय, पर्यावरण विषयक जाणीव जागृती यासह इतर विषयांवर प्रशिक्षण असणार आहे. देशातील त्रिपुरा राज्यात प्रायोगिक तत्त्वावर राबवलेल्या या उपक्रमात गुणवत्ता वाढीसाठी फायदा झाला. त्यामुळे देशात हा उपक्रम राबविला जाणार आहे. यामधे देशातील  इयत्ता पहिली ते आठवी वर्गाला शिकवणाऱ्या ४२ लाख शिक्षकांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी ३३ हजार शिक्षकांना राज्यस्तरावर प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर जिल्हास्तरावर प्रशिक्षण होणार आहे. त्यानंतर प्रत्येक तालुक्यात १५० शिक्षकांची बॅच तयार करून त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.  त्यातून माहिती तंत्रज्ञानातील अत्याधुनिक साधनांचा वापर करून गाव पातळीवर शिक्षण मिळणार असल्याने राज्यातील जिल्हा परिषद शाळांतील शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे.

सर्व माहिती ऑनलाइन
राज्यात दिले जाणारे प्रशिक्षण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्रामार्फत दिले जाणार आहे. या प्रशिक्षणासाठी उपस्थित शिक्षकांची माहिती केंद्र शासनाला ऑनलाइन कळवावी लागणार आहे.
प्रा. गणेश शिंदे, अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्र