आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितेश राणेंकडे आक्रमकपणा आहे, संयम आमच्या 'शाळेत' शिकवू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायगड : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष अखेर मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपत विलीन झाला. राणेंचे पुत्र नितेश यांनी यापूर्वीच भाजपत प्रवेश केला हाेता, आता राणे व दुसरे पुत्र माजी खासदार नीलेश यांनीही अधिकृतपणे भाजपप्रवेश केला.

'नारायण राणे यांच्या नेतृत्वाचा भाजपला व सरकार चालवताना फायदा हाेईल. आक्रमकता हा नितेश यांचा स्थायीभाव आहे, कारण ते राणेंच्या शाळेत तयार झाले आहेत. आता ते आमच्या शाळेत आले आहेत. आम्हाला त्यांची आक्रमकता कमी करायची नाही, परंतु आमच्या शाळेतला संयमही त्यांच्यात टाकायचा आहे. आक्रमकता आणि संयम हे दोन्ही गुणधर्म नारायण राणेंकडे आहेत. त्यातील एकच गुणधर्म नितेश यांच्याकडे आलाय, दुसरा आम्ही देऊ,' अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी नितेश यांना राजकारणात यापुढे संयम राखण्याचा उपदेश केला. नितेश हे कणकवलीतून भाजपचे उमेदवार आहेत. त्यांच्याविराेधात शिवसेनेनेही पूर्वाश्रमीचे राणेंचेच समर्थक सतीश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मतदारसंघात दाेन्ही पक्षांत वैमनस्य कायम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कणकवलीच्या सभेत शिवसेनेवर टीका करणे टाळले. मात्र, नितेश यांना ७०% मते मिळतील, असा दावा करत शिवसेना पराभूत हाेईल, असे भाकितही वर्तवले. 'आपला विजय निश्चित आहे. मात्र, अनेक लोक आपल्याला चिथावणी देण्याचा प्रयत्न करतील. पण, त्याकडे दुर्लक्ष करा. प्रेमाने आणि शांततेने लढा. जिंकणाऱ्या लोकांनी वाघासारखं राहायचं असतं,' असा सल्लाही त्यांनी राणेंना दिला. दरम्यान, अाता उद्धव ठाकरेही कणकवलीत सावंत यांच्या प्रचारार्थ सभा घेणार असून ते राणेंवर काय टीका करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले अाहे.

मुख्यमंत्र्यांची आश्वासने
सिंधुदुर्गमधील प्रस्तावित सी-वर्ल्ड प्रकल्प २ वर्षांत मार्गी लावणार. चिपी विमानतळावरून विमान वाहतूक सुरू करणार. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाला आणखी गती देणार. पुढचं सरकार येताच सिंधुदुर्गमध्ये मंत्रिमंडळ बैठक घेणार.

या क्षणाची वाट पाहत होतो : राणे
भाजपत पक्ष विलीन केल्यानंतर बाेलताना नारायण राणे म्हणाले, 'अनेक दिवसांपासून या क्षणाची वाट पाहत होतो. मला आता स्वत:साठी काही मिळवायचं नाही. मधल्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याची प्रगती थांबली होती. भाजपच्या काळात मात्र विकासाला गती मिळाली. सिंधुदुर्गाला एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्न करू.
 

बातम्या आणखी आहेत...