आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वल्गना अमित शहांकडून स्वागताच्या; मुहूर्त लाभला जिल्हाध्यक्षांकडून

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विवेक ताम्हणकर

रायगड - साेलापूरमध्ये भाजप अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत मी स्वत:, माझी मुले नितेश आणि नीलेश भाजपत प्रवेश करणार आहाेत. आमचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षही भाजपत विलीन हाेईल, अशा वल्गना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केल्या हाेत्या. मात्र अद्यापपर्यंत ना अमित शहांना वेळ मिळाला ना मुख्यमंत्र्यांना. अखेर उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी नितेश राणे यांच्यावर कणकवलीच्या भाजप कार्यालयात जाऊन जिल्हाध्यक्ष प्रमाेद जठार यांच्या हस्ते भाजपत प्रवेश घेण्याची वेळ आली. या वेळी ना नारायण राणे उपस्थित हाेते ना नीलेश राणे. दरम्यान, आता कणकवली मतदारसंघातून नितेश हे शुक्रवारी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करतील. 

खरे तर आपला भाजप प्रवेश मुंबईत दणक्यात करण्याचे नारायण राणेंचे नियाेजन हाेते, मात्र भाजपकडून त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. त्यातच शिवसेनेकडूनही तीव्र विराेध हाेता हाेता. राणेंचे एकेकाळी समर्थक असलेल्या कालिदास कोळंबकरांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भाजप प्रवेशाचे भाग्य लाभले, तर दुसऱ्या बाजूला राणेंच्या मुलाला मात्र जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत भाजपमध्ये सदस्य नाेंदणी करावी लागली. यातूनच राणेंचे राजकीय वजन किती कमी झालेय याची प्रचिती येते. काही दिवसांपूर्वी प्रमोद जठार यांनी राणे पक्षात आल्यानंतर त्यांना भाजपच्या मुशीत घडवू असे सांगितले होते. भाजपचे हे राणेंना घडवण्याचे काम त्यांच्या प्रवेशाच्या दिवसापासूनच सुरू झाल्याचे जाणकार सांगतात. 
 

नितेशविराेधात पारकरांचा अर्ज
जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी नुकतीच राणेंची साथ साेडली. मालवणमध्ये शिवसेनेविराेधात लढणार आहेत. तर भाजपचे संदेश पारकर यांनी पक्ष साेडून नितेश विराेधात अपक्ष अर्ज दाखल केला आहे.
 

नाणारला आता विरोध नाही : नितेश राणे 
नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला नितेश राणेंनी मोठा विरोध केला होता. प्रकल्पग्रस्तांचे आंदोलनही उभारले होते. भाजप प्रवेशानंतर मात्र त्यांनी भूमिका बदलली. ‘नाणारबाबत भाजपची जी भूमिका आहे तीच आपली असेल,’ असे सांगून आता विराेध मावळला असल्याचे त्यांनी संकेत दिले. त्यामुळे देवगडमधील प्रकल्पग्रस्तांचा राेष राणेंना पत्करावा लागला.
 

पक्ष कार्यकर्ते संभ्रमात
नारायण राणेंना भाजपने खासदारकी दिली. आता राणेंचा मुलगा भाजपत गेला आहे. दुसरा मुलगा नीलेश मात्र अजूनही स्वाभिमानी पक्षात आहे. पक्ष भाजपत विलीन न  झाल्याने कार्यकर्त्यांचे भवितव्य काय? असा प्रश्न राणे समर्थक विचारत आहेत.

बातम्या आणखी आहेत...