Home | Magazine | Madhurima | nitesh shinde write about Dr. Rajul Vasa

रुग्णांच्या आशेचा किरण

नितेश शिंदे | Update - Aug 07, 2018, 07:15 AM IST

सेरेब्रल पाल्सी, अर्धांगवायू, अपघातातील मेंदू इजा यांसारख्या गंभीर आणि उपचार अशक्यप्राय वाटणाऱ्या आजारांवर विशेष तंत्रज्

 • nitesh shinde write about Dr. Rajul Vasa

  सेरेब्रल पाल्सी, अर्धांगवायू, अपघातातील मेंदू इजा यांसारख्या गंभीर आणि उपचार अशक्यप्राय वाटणाऱ्या आजारांवर विशेष तंत्रज्ञान वापरून रुग्णाच्या आयुष्यात स्वावलंबनाचा किरण घेऊन येणाऱ्या व त्याच्या कुटुंबीयांचं जगणंही सुसह्य करणाऱ्या डॉ. राजुल वासा यांच्या कार्याबद्दल...


  नाशिकच्या ‘राजुल वासा उपचार केंद्रा’ला येत्या १५ ऑगस्टला तीन वर्षं पूर्ण होतील तेव्हा तो दिवस काही कार्यकर्त्यांच्या कृतार्थतेचा आणि जगभरातील पाचशेहून अधिक मेंदूच्या आजारांनी बाधित रुग्ण व त्यांचे पालक यांच्या कृतज्ञतेचा असेल. हे केंद्र मेंदूच्या आजारांनी बाधित रुग्णांच्या आयुष्यातील परावलंबन दूर करण्याच्या डॉ. वासा यांच्या ध्यासातून सुरू झाले. नगरसेवक सलीम शेख यांनी पूर्णवेळ केंद्रासाठी सातपूर भागातील जागा उपलब्ध करून दिली. तेथून वासा यांच्या कार्याचा विस्तारच होत गेला. डॉ. राजुल वासा यांनी मुख्यत: सेरेब्रल पाल्सी (सीपी), अर्धांगवायू आणि अपघातातील मेंदू इजेच्या रुग्णांचे पुनर्वसन तेथे यशस्वीपणे सुरू केले आहे. रुग्णांमध्ये आणि पालकांमध्ये त्या नव्या क्रांतिकारी व प्रभावी उपचारपद्धतीमुळे नवा विश्वास निर्माण झाला आणि त्यांची रोगमुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. वासा यांच्यामुळे आपण आयुष्यभरासाठी पराधीन राहणार नाही, असा विश्वास रुग्णांना मिळाला.


  मेंदूची बाधा झालेल्या रोग्यांसाठी (सेरेब्रल पाल्सी, पक्षाघात आणि अपघाती मेंदू इजा) इलाज उपलब्ध नाही. इलाज आहेत ते रोग्याला त्याचे दु:ख व गैरसोय दूर करण्यासाठी विविध साधने वापरून आराम देण्याचे. पण त्या उपचारांच्या शेवटी रुग्णाच्या नशिबी येते अधिक दुःख, हाल आणि पराधीनता! त्या उपायांमुळे असे मेंदूला इजा झालेला व त्यामुळे त्रस्त कोणी रोगी रोगमुक्त होईल असे कोणताही डॉक्टर हमखास सांगत नाही, परंतु डाॅ. राजुल वासा म्हणतात, ‘तुम्ही स्वतः कष्ट घेतलेत तर तुम्ही बरे व्हाल.’ राजुल वासा रोग्याच्या मेंदूचा विकास गुरुत्वाकर्षणाचे तंत्र वापरून घडवून आणतात. त्यामुळे रोग्याच्या अवयवांतील स्नायू व त्यांचे चलनवलन यांमधील संबंध पुनर्स्थापित होतात आणि अर्धांगवायूमुळे निकामी झालेले अवयव पुन्हा चालू लागतात. ते तंत्र त्यांनी पंचवीस वर्षांपूर्वी शोधून काढले आणि ती एक क्रांती ठरली. ‘सीपी’ बालक नॉर्मल होऊ शकते हे कधी कोणी ऐकले नव्हते. ते वासा यांच्या मुख्यत: व्यायामप्रकारांच्या उपचारातून घडू लागले. तो डॉक्टरांना, वैद्यक क्षेत्रातील मंडळींना आरंभी चमत्कार वाटला, परंतु वासा यांचे रोगी एकापाठोपाठ एक पूर्णत: बरे होत गेल्यामुळे बाधित लोकांमध्ये मात्र उत्सुकता निर्माण झाली.


  डाॅ. राजुल वासा यांचे निरीक्षण असे आहे की, माणसाच्या मेंदूला इजा झाली की, ती दुरुस्त करण्यासाठी मेंदू कोणा तज्ज्ञाची वाट पाहत थांबत नाही. मेंदू स्वतःचे उपचार स्वतः करू लागतो. शरीराच्या अर्ध्या बाजूचे अवयव निकामी झाले आहेत; हे पाहताच त्या पाठीमागील गुरुत्वाकर्षणाचे बल तपासले जाते आणि बाकीचा मेंदू ते अवयव स्थगित करून टाकतो व पुढील संभाव्य नुकसान टाळतो. म्हणजे अवयव गोठतात ते बाधेचा धोका वाढू नये म्हणून. मेंदूचे जे न्यूरॉन्स मृत झाल्याने हे घडते, त्यांचे काम बाकी न्यूरॉन्स करतात, असे आजपर्यंत मेंदुविकार शास्त्रात शिकवले जाते. पण ती समजूत चुकीची आहे. मेंदूच्या लवचिकतेमुळे (प्लॅस्टिसिटी) त्याला स्वत:ला दुरुस्त होण्यास अवसर मिळतो, ही समजूतदेखील तशीच चुकीची आहे. मेंदूची लवचिकता आणि स्वीकारार्हता या दोन्ही गोष्टी रोग्याच्या उपचारपद्धतीत हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे पक्षाघाताचा रोगी कायम त्याच अवस्थेत राहण्याचा धोका असतो.


  डाॅ. राजुल वासा यांचे रुग्ण जगभर आहेत. विशेषत: उत्तर युरोपमध्ये गेली काही वर्षं त्या नियमित जाऊन रुग्णांवर उपचार करतात. आता तर ‘वासा कन्सेप्ट केंद्रे’ फिनलंड, स्वीडन आणि फ्रान्स या देशांमध्येही सुरू झाली आहेत. फिनलंड सरकारची त्यास मान्यता आहे. वासा त्यांची उपचार पद्धत शिकवण्यास स्वीडनच्या ‘उपसाला विद्यापीठा’त जातात. तेथे त्यावर संशोधनही चालू आहे. ‘वासा कन्सेप्ट’वर फिनलंड आणि स्वीडन या दोन देशांच्या विद्यापीठांत पाच थिसिस लिहिले गेले आहेत आणि अजून तीन लिहिले जात आहेत. डाॅ. वासा त्या उपचारपद्धतीची शास्त्रीयता व्यवस्थित समजावून सांगतात. त्यांचे त्या विषयावर शास्त्रीय प्रबंध युरोपातील सायन्स जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. फ्रेंच प्रा. ख्रिस्तियन बेयार्ट, ‘उपसाला विद्यापीठा’च्या (स्वीडन) प्राध्यापक गुणिला फ्रिकबर्ग आणि फिनलंडच्या डॉ. मारी टीमकानन हे त्यांचे रिसर्च पार्टनर आहेत.


  खरा चमत्कार गतवर्षी नाशिकला घडला.फिनलंड, स्वीडन आणि रशिया या देशांतील रोगी नाशिकला व मुंबईला येऊन त्यांपूर्वी वासा यांच्याकडे उपचार घेत होते, पण गेल्या वर्षी फिनलंडचे दहा डॉक्टर ‘वासा उपचारपद्धती’चे प्रशिक्षण घेण्यासाठी नाशिकला येऊन आठ दिवस राहिले होते. ते वारे उलटे होते! वैज्ञानिक ज्ञानाचा प्रभाव वाढल्यानंतर गेली दोनशे वर्षं सर्व तऱ्हेच्या ज्ञानसंशोधनासाठी भारतीयांचे तोंड पाश्चिमात्य देशांकडे असते, परंतु या वेळी प्रथमच असे घडले की, युरोपातील डॉक्टर आधुनिक ज्ञानसंशोधनासाठी भारतात, तेसुद्धा नाशिकसारख्या प्राचीन भारतीय विद्याक्षेत्री एका भारतीय ‘गुरू’च्या दारी आले! त्यामधील दोन डॉक्टरांची परत जाताना मुंबईच्या ‘राजुल वासा उपचार केंद्रा’त मुलाखत झाली. ती भावस्पर्शी होती. ती मंडळी नाशिक केंद्रात मिळालेल्या ज्ञानकौशल्याने भारावलेली होती.


  नाशिकच्या उपचार केंद्रात ‘सीपी’ रोगाने बाधित आलोक हा सोळा वर्षांचा मुलगा आहे. त्याच्या पालकांनी आलोकवर अकरा वर्षं विविध रूढ उपचार केले, पण काही प्रगतीची लक्षणे दिसली नाहीत. मात्र, येथील उपचार केंद्रात (नाशिक) आलोकला आणल्यानंतर पालकांना त्यांच्या मुलातील गेल्या तीन वर्षांतील सुधारणा थक्क करणारी वाटली. ते म्हणाले की, तो आता लसूण सोलून दाखवतो. त्याच्या हातांची हालचाल सोडाच, त्याच्या बोटांची हालचालदेखील इतकी सूक्ष्म नाजूक होऊ लागली आहे! आलोकला वस्तू पकडणेदेखील कठीण होते, कारण त्याच्या सर्व अवयवांत Spasticity होती. त्यामुळे सर्व स्नायू कडक झाले होते. पण ते सुधारले गेले! ‘वासा कन्सेप्ट’चे तसे अनेक चमत्कार त्या केंद्रात पाहण्यास मिळतात. केंद्रात रुग्णाच्या पालकांना आणि नातेवाइकांना उपचार करण्यास सक्षम बनवले जाते. त्यामुळे रुग्ण पुनर्वसनासाठी कोणावरही अवलंबून राहत नाही.


  वासा यांच्याकडे उपचार नियमावली अत्यंत बारकाईची आहे. त्यासाठी ‘प्रोटोकॉल’ आहे, अर्ज भरावा लागतो. डाॅ. वासा उपचार विनामूल्य करतात, कारण त्यांचे असे ठाम मत आहे की, कुठलाही रुग्ण त्याच्या आर्थिक दुर्बलतेमुळे उपचारास मुकू नये. त्या पेशंटने व्यायाम कसून व सहा ते आठ तास करायला पाहिजे याबद्दल मात्र आग्रही असतात. डाॅ. वासा यांच्यामध्ये व्यवहारदक्षता, कर्तव्यकठोरता आणि आध्यात्मिकता यांचे मनोरम मिश्रण आहे. त्यामुळेच तर त्यांनी त्यांचे उद्दिष्ट जगातील मेंदूच्या इजेने बाधित अपंग व्यक्तींना परावलंबनातून मुक्त करणे असे उदात्त व महान ठरवले आहे. ते ध्येय ‘राजुल वासा फाउंडेशन’च्या सर्व साहित्यातून व्यक्त होते. म्हणूनच नाशिकच्या उपचार केंद्रावर लिहिले आहे, ‘एम्पॉवरिंग सेंटर’ – रुग्णांना सक्षम करणारे केंद्र! राजुल वासा त्यांचे ते ध्येय घेऊन त्यांच्या उपचार पद्धतीचा प्रसार निष्ठेने जगभर करत आहेत.


  डाॅ. राजुल वासा यांचे शिक्षण मुंबईतील जी. एस. वैद्यकीय महाविद्यालयात झाले. त्या पदव्युत्तर शिक्षणासाठी स्वित्झर्लंडला गेल्या. तेथे शिकत असताना त्यांना जाणीव झाली की, मेंदूच्या इजेने बाधित रुग्णांच्या आजारावर उपचार असे काही नाहीतच. म्हणून त्यांनी न्यूरोरिहॅबिलिटेशनमध्ये संशोधन सुरू केले अाणि अाता त्या चमत्कार वाटावा अशा उत्तरापर्यंत येऊन पोहोचल्या.


  त्यांचे मुंबई केंद्र दादर येथे ‘नवनीत जैन हेल्थ सेंटर’मध्ये प्रत्येक रविवारी विनामूल्य चालते. त्यांनी नाशिक आणि पुणे येथील पूर्णवेळ केंद्रांसारखी दहा मोफत केंद्रे भारतात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
  (लेखक ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’चे उपसंपादक अाहेत.)


  वाचक डाॅ. वासा यांच्याशी या ईमेलवर वा संस्थळावर संपर्क साधू शकतात.
  ईमेल rajul@brainstrokes.com
  संस्थळ www.vasaconceptfor cerebralpalsy.com
  www.brainstrokes.com
  www.rvfindia.org


  - नितेश शिंदे, मुंबई
  info@thinkmaharashtra.com

 • nitesh shinde write about Dr. Rajul Vasa
 • nitesh shinde write about Dr. Rajul Vasa

Trending