आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्फेशन कॉल!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माणसाला व्यक्त व्हायला जागाच उरली नाही की माणसाचं मन हेलकावे खायला लागतं.. शरीरापेक्षा मनाचं नातं खूप वेगळं असतं. मनाची तार जुळली की ती साखरेच्या पाकासारखी वाटते अन् तीच तार ताणली की झटक्याने कधीही तुटू शकते.

 

रात्रीचे दहा वाजले होते. आजही प्राजक्ताला ऑफिसवरून यायला उशीर झाला होता. विचारातच तिनं गाडीला किक मारली आणि ती कधी ऑफिसवरून निघाली आणि घर आलं हे तिलाच कळलं नाही. गाडीवर बसल्यानंतर मनात सततचे विचार, कल्लोळ, गोंधळ.  डोळ्यांवर समोरच्या गाड्यांचा तीव्र प्रकाशही तिच्या मनात निर्माण झालेला अंधकार दूर करू शकत नव्हता. तिला व्यक्त व्हायचं होतं... मनमोकळं रडायचं होतं... 


तिने फ्लॅटचा दरवाजा उघडला. आत अंधार होता. तिच्या लक्षात नव्हतं आज सिद्धार्थ तिची मुलगी अन्वाला घेऊन तिच्या आईकडे गेलाय. सिद्धार्थ नाही म्हणजे आज स्वयंपाकाच्या उषा मावशीही आल्यापावली परतल्या असतील. भूक तर लागली होती. पण मनातील द्वंद्वामुळे तिला घरी काही खायला मिळणार नाही हे लक्षातच नव्हतं. तिच्या डोळ्यात अचानक थेंब दाटले. रिकाम्या पोटात आग असेल तर मनावरची काजळी अधिक गडद होते. पापण्यांचे ओझे जड होते आणि मनावर शिडकावा करण्यासाठी नकळत थेंब ओघळू लागतात. 


का कुणास ठाऊक तिला आज शॉवर घेण्याची इच्छा होत होती. ती तशीच बाथरूमकडे वळली. जाताना तिने स्वत:चेच उघडे शरीर न्याहाळले. तिला जुने दिवस आठवले. तसे अचानक तिचे अंग शहारले. ती एकदम सावरली. तिने शॉवर सुरू केला. तिच्या ओल्या केसांतून पाणी निथळताना शरीर हलकं होत असल्याची जाणीव तिला होत होती. 


तिला समजतच नव्हतं आज असं काय झालंय? ती इतकी का हताश झालीय. उलट आज तर ऑफिसमध्ये ती  तासभर रोहित सोबत होती. रोहितचा विचार मनात आल्या आल्या तिला पुन्हा रडू कोसळलं. रोहित तिचा चांगला मित्र.  विचार करता करताच तसाच ओल्या अंगावर तिने टॉवेल गुंडाळला... बेडवर पडली.. रोहितचा विचार मनात आल्यावर तिने टॉवेलची गाठ थोडी सैल केली. तिला आपल्या या वागण्याचा धक्का बसला. तर्क-वितर्क आणि अर्थांचं वादळ तिच्या मनात पुन्हा घोंगावायला लागलं. तिने दीर्घ श्वास घेतला. पुन्हा टॉवेल घट्ट गुंडाळला. लक्ष दुसरीकडे लागावं म्हणून तिने मोबाइल उचलला. नेट ऑन केल्या केल्या वाजलेल्या मेसेज टोनने घरातील शांततेचा भंग झाला. 


सिद्धार्थचेही मेसेज होते त्यात. त्याचा मिस कॉलही होता. रोहितविषयी आलेल्या विचारांमुळे सिद्धार्थला फोन करताना तिला अपराधीपणाचं वाटलं. तिने त्याच्या मिस कॉलला उत्तर दिले नाही.  सिद्धार्थ नुकताच एका नव्या कंपनीत जॉइन झाला होता. त्याच्या जॉब प्रोफाइलविषयी दोघांचं फारसं बोलणंही झालं नव्हतं. न राहावल्याने तिने अखेर सिद्धार्थचा एक मेसेज वाचला. Welcome to Confession, a social art project by Jon jacobs. Simply call the number below and press 1 to confess, or 2 to hear someone’s confession. 
असा काहीसा तो इंग्रजीत मेसेज होता. सिद्धार्थचा मेसेज वाचल्याने ती जरा अस्वस्थ झाली होती. रात्रीचे १२ वाजले होते. आज सारखा रोहितचाच का  विचार येतोय?  तिला समजेना. आपल्या मनातील द्वंद्व कसं दूर करावं? कुणाशी आपण हे बोलावं. अशी कोण व्यक्ती असेल की तिच्याशी बोलल्यानंतर आपले मन हलके होईल? या विचारात ती गढून गेली. तितक्यात तिला सिद्धार्थने पाठवलेला मेसेज आठवला. त्यातल्या ओळी तिने पुन्हा वाचल्या. आपण या नंबरवर फोन करत जर कन्फेस केलं तर? पण कशाचं कन्फेस? सिद्धार्थऐवजी रोहितचा विचार केला म्हणून का रोहित आवडायला लागलाय हे सांगण्यासाठी कॉल करायचा? बस आता मनाला अधिक ताण न देता तिने कॉल जोडायचं ठरवलं अन् कॉल जोडला.  


समोरून आवाज आला.. हॅलो… आवाज तिला जरा ओळखीचा वाटला… यानंंतर तिने न थांबता भडाभडा बोलायला सुरुवात केली. 
मी प्राजक्ता. मला काही कन्फेस करायचंय.. माझं आणि सिद्धार्थचं लव्ह मॅरेज. आमच्या लग्नाला १२ वर्षं झालीत. आमच्यात कसलेही वाद किंवा मतभेद नाहीत. आमचा मोठा प्रॉब्लेम म्हणजे आम्ही एकमेकांना वेळ देऊ शकत नाहीत. मी ऑफिसवरून घरी आले की माझा नवरा कामावर गेलेला असतो. तो घरी परतला की सकाळी मी कामावर गेलेली असते. आमचं असं बोलणं किंंवा नवरा-बायको म्हणून फारसं एकत्र येणं होतच नाही. महिन्यातून एखाद्या वेळेसच आमचा ‘तसा’ संबंध येतो. आता मला माझ्या ऑफिसमध्ये काम करणारा एक मित्र आवडायला लागलाय. त्याच्याविषयी माझ्या मनामध्ये "तसले' विचार येताहेत. 


मी काय करू? मला हेच कन्फेस करायचे होते की माझ्या मनात अपराधी भावना येतेय. मी दोघांना फसवतेय, असं मला वाटतंय. हे सांगताना तिला रडू कोसळलं. बोलणं सुरू असतानाच ती भानावर आली. आपण एकटेच बोलतोय, समोरची व्यक्ती कोण? त्याला माझी भाषा समजतेय का? हा विचार तिच्या मनाला स्पर्शून गेला.  ती पुटपुटली.. मी फोन ठेवते… तसा समोरून आवाज आला. थांबा…मराठीतील आवाज ऐकून पुन्हा ती दचकली. कोण? समोरून आवाज आला.. ते महत्त्वाचं नाही. तुमच्या शंकेचं निरसन होणं गरजेचं आहे. 


समोरच्याचं संभाषण सुरू झालं…. माणसाला व्यक्त व्हायला जागाच उरली नाही की माणसाचं मन हेलकावे खायला लागतं.. शरीरापेक्षा मनाचं नातं खूप वेगळं असतं. मनाची तार जुळली की ती साखरेच्या पाकासारखी वाटते अन् तीच तार ताणली की झटक्याने कधीही तुटू शकते. तुमचं तुमच्या नवऱ्यावर प्रेम आहेच, पण सहवासाने तुम्हाला रोहितही आवडतोय. त्याचं आवडणं मुळीच चुकीचं नाही. सिद्धार्थ कदाचित तुम्हाला वेळ देऊ शकत नसेलही; पण म्हणून त्याचं तुमच्यावरचं प्रेम कमी झालंय असंही नाही अन् रोहित कदाचित तुमच्यातील मैत्रीवर प्रेम करत असेल. पण म्हणून तुमच्या दोघांविषयीच्या भावनांमुळे तुम्ही अपराधी ठरत नाहीत... इतकंच बोलून समोरच्याने फोन ठेवला.  


शांतपणे एकूण घेणारी प्राजक्ता एकदम भानावर आली. पुन्हा आवाज तिला ओळखीचा वाटला.  तिने पुन्हा सिद्धार्थचा जुना मेसेज वाचला. त्यात लिहिले होते, प्राजू, मी अन्वाला तुझ्या आईकडे सोडतोय, मला ऑफिसमध्ये जावं लागतंय. तुला खूप फोन केले. मेसेज वाचला की फोन कर. ओट्यावर तुझ्यासाठी खिचडी करून ठेवली आहे. माझ्या नव्या जॉबविषयी तुला कल्पना द्यायची राहिली होती. मी एका कॉल सेंटरवर काम करतोय. थीम चांगली, वेगळी आणि चॅलेंजिंग असल्याने मी हा जॉब स्वीकारलाय. त्याचे थोडक्यात स्वरूप समजावे म्हणून खालचा मेसेज वाच. बाकी आल्यावर बोलूच. खाली मेसेज होता…
Welcome to Confession, a social art project by Jon jacobs. Simply call the number below and press 1 to confess, or 2 to hear someone’s confession. Call number below.

 

नितीन फलटणकर
p.nitin@dbcorp.in

लेखकाचा संपर्क : ९४०३०२९३००
 

बातम्या आणखी आहेत...