Magazine / मी, बायको अन् वर्ल्डकप

 नुकत्याच झालेल्या भारत-पाक मॅचदरम्यानचा एका नवरोबाचा हा अनुभव...

नितीन फलटणकर

Jun 25,2019 12:14:00 AM IST

राजकारण, अर्थकारण या विषयांप्रमाणे क्रिकेट हासुद्धा महिलांच्या दृष्टीनं वाळीत टाकण्याचा विषय असं समजत असाल तर थोडं थांबा...महिलांना क्रिकेट आवडतं आणि त्यातलं कळतंसुद्धा... नुकत्याच झालेल्या भारत-पाक मॅचदरम्यानचा एका नवरोबाचा हा अनुभव...

30 मे ला क्रिकेटमधल्या महायुद्धाला प्रारंभ झाला अन् साऱ्या पुरुषांचे धाबे दणाणले. क्रिकेट म्हटलं की घरातही युद्ध सुरू होतं. तासन् तास टीव्हीसमोर बसलेला बाप, त्याच्या संगतीला कधी पॉपकॉर्न, भेळभत्ता, तर कधी पाणीपुरीचे मेनूकार्ड घेऊन गोंधळ घालणारी बच्चेकंपनी (मेनू मॅचमधील परिस्थितीनुसार बदलतातही). या साऱ्या गोंधळात एका वस्तूला अन्यन्यसाधारण महत्त्व प्राप्त होतं. वस्तू तशी छोटीशीच, एरवी बेड, टेबल, खिडकीच्या कोपऱ्यात निपचित पडलेली, पण वर्ल्डकप सुरू झाला की या वस्तूची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. ही वस्तू म्हणजे टीव्हीचे रिमोट. ज्या दिवशी मॅच त्या दिवशी ही वस्तू आपोआप न सांगताच घरातील कर्तृत्ववान पुरुषाकडे (अर्थातच असे फक्त त्याला स्वत:लाच वाटत असते) पर्यायाने क्रिकेटवेड्याकडे आपोआप येते. मग सुरू होते खरे युद्ध… संध्याकाळी सात वाजले की ‘जिवलगा’ परका वाटू लागतो. रिमोटसाठी ‘जीव झाला येडा पिसा’ वाटायला लागतं. रिमोट म्हणजे महिलेला ‘माझ्या नवऱ्याची बायको’ वाटते. मग ती रिमोटकडे आळवणी करते ‘साथ दे तू मला’. एखादा सामना पाहताना चुकून रिमोट दिला किंवा बॉसचा फोन रिसीव्ह करण्याच्या निमित्तानं रिमोट बायकोच्या हातात आलाच तर त्यांना, ‘सुखांच्या सरींनी मन बावरे’ वाटते.


१६ जून २०१९ हा वर्ल्डकपच्या भारत-पाक सामन्याचा दिवस. सामना दुपारी, पण रिमोट आणि रिमोटच्या मालकिणीचं आम्हा बापलेकांना सकाळपासूनच जाम टेन्शन आलेलं. रवी शास्त्री आणि बीसीसीआयने पाकिस्तानला परास्त करण्यासाठी जितकी रणनीती आखली त्यापेक्षा किती तरी जास्त मी आणि माझ्या चिरंजिवांनी रिमोट आमच्याकडे राखण्यासाठी आखली होती. रविवार असल्याने बॉसच्या फोनची शक्यता नव्हती. निसर्गाच्या हाकेला उत्तर देण्याची वेळ आलीच तर मुलाकडे रिमोट सोपवून जायचं इथपर्यंत नियोजन केलेलं.
नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यानंतर यश मिळतंच याची प्रचिती या दिवशी मला आली. सामना दुपारी ३ वाजता सुरू झाला. संध्याकाळी सात वाजेपर्यंत एकही मालिका सुरू होणार नव्हती. मी व चिरंजीव तसे जणू मँचेस्टरमध्येच सामना पाहायला बसलोत अशा आविर्भावात होतो. पाकिस्तानने टॉस जिंकला. भारताला बॅटिंग दिली, तशी बायको आतून ओरडली, आज धवन नाही ना? मग रोहितसोबत कोण ओपनिंग करतोय? कोण हा राहुल? बायकोला क्रिकेटमध्ये इंटरेस्ट आहे हे ऐकल्यावर पहिला धक्का बसला. त्या धक्क्यात तोंडून शब्द बाहेर पडले, ‘नया है वह’. पोराच्या हातात पॉपकॉर्न, माझ्या हातात कॉफीचा कप देत बायको शेजारच्या खुर्चीवर बसली. क्रिकेटच्या नावाने खडे फोडणाऱ्या मॅडम आज माझ्या शेजारी बसून सामना पाहत होत्या.


सामना रंगत गेला. तसतसं सौंचं क्रिकेटमधील नॉलेजही बाहेर येत गेलं. रोहितने शतक ठोकण्यापूर्वीच आमच्या सौंनी केलेली त्याच्या शतकाची भविष्यवाणी खरी ठरली. के. एल. राहुल बॉल खूप वेस्ट घालवतोय. त्याने ५ ओव्हर खाल्ल्या, असे सांगत काय ते एकदा फिफ्टी उरक आणि जा पॅव्हेलियनमध्ये, असा सल्ला तिनं आमच्या दिवाणखान्यातूनच त्याला दिला. फिफ्टी झाल्या झाल्या तो बादही झाला. इतके दिवस क्रिकेटपासून दूर असणारी माझी बायको, पण तिला यात किती रस आहे, यातली आकडेवारी तिला कशी तोंडपाठ आहे याची प्रचिती मला येत होती. सामना पुढे सरकत होता. तसे तिने यापूर्वीच्या वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानसोबत खेळलेले ६ सामने, त्यात ५ जिंकले, आताचा हा सातवा सामना. प्रत्येक सामन्यात कशी उत्कंठा वाढत असे, या सामन्यात टशनच नाही इत्यादी इत्यादी डायलॉग म्हणून झाले होते. एकीकडे वसीम अक्रम - संजय मांजरेकरची कॉमेंट्री सुरू होती, तर दुसरीकडे आमच्या सौंची जोरदार बॅटिंग सुरू होती.


मी आणि चिरंजीव काही कॉमेंट्स करण्यापूर्वीच ती मॅचची समरी सांगत होती. बायकोला क्रिकेटमध्ये इतका रस आहे, माहिती आहे हे मला लग्नाच्या ११ वर्षांनंतर समजलं. सामना चांगलाच रंगात आला होता. रोहितचे शतक झाले. विराटही जोमात खेळत होता. रोहित आऊट झाला, त्यापाठोपाठ हार्दिक पांड्या, धोनीही आल्या पावली परतले. आता घरात वातावरण बदलले होते. मी व चिरंजीव टेन्शनमध्ये आलेले पाहिल्यानंतर बायकोने आणखी एक भविष्यवाणी केली. पावसाने सामना पालटणार. आपणच जिंकणार. या भविष्यवाणीचा सोर्सही बायकोने सांगितला मँचेस्टरला ६३% पावसाची शक्यता आज तिथल्या हवामान खात्याने वर्तवली आहे म्हणे. याचा अर्थ सामन्याविषयी तिलाही सकाळपासूनच कुतूहल होते, मात्र तिने ते दाखवले नव्हते. पाकिस्तानचे खेळाडू फॉर्मात असताना ऐन पावसाला सुरुवात झाली. सामना थांबला. टीव्ही बंद करत सौ म्हणाल्या ‘डकवर्थ लुइस’ नियम लावल्यास सामना आपणच जिंकणार. पाऊस इतका वाढला होता की आता सामना होणार नाही, असे वाटत होते. चिरंजीवांना झोपण्याची गळ घालून आम्हीही झोपण्याची तयारी केली. बायको मात्र काही केल्या सामना सोडायच्या मूडमध्ये नव्हती. सतत टीव्ही लावून ती सामना सुरू झाला का ते पाहत होती. अन् अखेरीस सामना सुरू झाला. आपण जिंकलो. मी बायकोला प्रश्न केला, का गं तुला क्रिकेट इतकं आवडतं तर तू का पाहत नाहीस सामने? का कधी एन्जॉय नाही करत? ती आपसूकच बोलून गेली. मग तुम्हाला पॉपकॉर्न, भेळभत्ता, वडे कोण देणार?
खरंच, कधी कधी रिमोट बायकोकडेही असलेला बरं असतं...

X
COMMENT