आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनता मला मताधिक्याने निवडून देईल - भाजप नेते नितीन गडकरी यांना विश्वास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर  - मी जनतेचा उमेदवार असून जनताच मला निवडून आणेन, असा विश्वास भाजप उमेदवार नितीन गडकरी यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. मला जनतेचे प्रचंड प्रेम मिळाले. अर्ज भरतानाच इतकी मोठी उपस्थिती पाहून मी भारावून गेलो आहे. जनतेचा प्रचंड प्रतिसाद, प्रेम, सदिच्छा व शुभेच्छा हीच माझी सर्वात मोठी ताकद आहे, असे गडकरी म्हणाले.    

 

नितीन गडकरी राज्यात विक्रमी मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. गडकरी राज्यात न भूतो न भविष्यति असा विजय प्राप्त करतील, तर देशात मोदींच्या नेतृत्वात परत सत्तेवर येऊ. राज्यात ४५ पेक्षा जास्त जागा जिंकू, असे फडणवीस म्हणाले.  तत्पूर्वी संविधान चौकात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गडकरींच्या रॅलीला प्रारंभ झाला. एका खुल्या जीपमध्ये नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुलेखा कुंभारे, शिवसेना नेते डाॅ. दीपक सावंत यांच्यासह भाजपचे सर्व आमदार आरूढ झाले होते. दोन ते तीन हजार कार्यकर्त्यांची रॅली आकाशवाणी चौकात आल्यानंतर कार्यकर्ते चौकातच थांबले. नेत्यांनी जीपने जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन अर्ज भरला. अर्ज भरून परत येईपर्यंत कार्यकर्ते आकाशवाणी चौकात जल्लोष करत होते.

 

या वेळी माध्यमांशी बोलताना सेना उमेदवार कृपाल तुमाने यांनी आपण केलेल्या विकासकामांच्या भरवशावर निवडणूक लढवत असल्याचे सांगितले. मोदींनी केलेल्या विकासकामांचा फायदा मला होणार आहे. गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त मतांनी निवडून येईन, असा विश्वास तुमाने यांनी व्यक्त केला. तुमाने यांच्यासोबत डाॅ. दीपक सावंत, खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष आशिष जयस्वाल, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार, माजी जिल्हाप्रमुख सतीश हरडे आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. तर भाजपच्या रॅलीत आमदार आशिष शेलार, राज पुरोहित सहभागी झाले होते.   

 

 

चंद्रपुरात हंसराज अहिर, बाळू धानाेरकरांनी भरले अर्ज   
चंद्रपूर मतदारसंघात युतीचे हंसराज अहिर व काँग्रेसचे बाळू धानोरकर, रामटेकमध्ये कृपाल तुमाने यांच्यासह वंचित बहुजन आघाडीच्या किरण पाटणकर, भंडारा-गोंदियात युतीचे सुनील मेंढे व आघाडीचे नाना पंचबुद्धे यांनी शेकडो समर्थकांसह उमेदवारी अर्ज भरले.  युतीच्या उमेदवारांचे अर्ज भरून झाल्यानंतर काँग्रेसचे नाना पटोले व रामटेकचे काँग्रेस उमेदवार किशोर गजभिये यांनी हजारो समर्थकांसह येऊन अर्ज भरला. बिशप काॅटन स्कूलच्या मैदानावर एकत्र येऊन दोन्ही उमेदवार प्रथम संविधान चौकात आले. तिथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीने आकाशवाणी चौकात आले. दोघांनी एकत्रच अर्ज भरले. या वेळी विलास मुत्तेमवार, प्रशांत पवार, शहराध्यक्ष विकास ठाकरे, अनिल देशमुख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...