आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारणात येण्यास क्वालिटी लागत नाही : नितीन गडकरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर  - नेता किंवा राजकारणी समाजापेक्षा वेगळा असू शकत नाही. कारण नेताही समाजातून आलेला असतो. त्यामुळे जसा समाज असतो तसाच नेताही असतो, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले. चिटणवीस सेंटरतर्फे आयोजित प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. निवेदक मनोज साल्पेकर यांनी ही मुलाखत घेतली.  


गडकरी म्हणाले, मला खोटे बोलता येत नाही. ओठात एक आणि पोटात एक असा माझा स्वभाव नाही. जे मनात असेल ते थेट बोलतो. एकच गोष्ट वारंवार केल्याने त्या गाेष्टींचा उबग येतो. म्हणून अनेकदा इतर क्षेत्रात रस घेतो. कृषीमध्ये मला विशेष रस आहे. एखादी गोष्ट होत नाही असे कोणी सांगत असेल तर ती गोष्ट पूर्ण करून दाखवण्याची जिद्द माझ्याकडे आहे. काहीही करून मी ती गोष्ट पूर्ण करतोच. राजकारणात चतुर असावे, पण चतरे नसावे. आपले काम पॅशनने करावे, असा माझा आग्रह असतो.   मेरिट आणि फर्स्ट क्लासचा यशस्वी होण्याशी काहीही संबंध नाही. अनेक क्षेत्राचा अभ्यास केल्यास त्या त्या क्षेत्रात विशेष गती नसलेले पुढे त्याच क्षेत्रात कमालीचे यशस्वी झालेले दिसतात. व्यावहारिक जीवनात तुम्ही यशस्वी होणे गरजेचे आहे. मेरिटमध्ये आलेला आयएएस अधिकारी होतो, फर्स्ट क्लास आलेला कारकून होतो. तीनदा नापास झालेला मंत्री होतो आणि आयएएस झालेला मंत्र्याला सलाम करीत “यस सर’ करतो. त्यामुळे राजकारणात येण्यास कोणतीही क्वालिटी लागत नाही, असे गडकरींनी स्पष्ट केले.  


सर्वात कमी मतदान सुशिक्षितांचेच  
विद्वान आणि सुशिक्षितांच्या पाठिंब्यावर राजकारण चालत नाही. सर्वात कमी मतदान विद्वान आणि सुशिक्षितांच्या भागातच होते, तर झोपडपट्टी तसेच वेश्यावस्तीत सर्वाधिक मतदान होते. त्यामुळे राजकारणात सर्वांना सोबत घेऊन चालावे लागते, असे ते म्हणाले.   लोकांचा माझ्यावर माझ्या क्षमतेपेक्षा जास्त विश्वास आहे. त्यामुळे तो कमी कसा करावा हाच प्रश्न आहे. माझ्या आयक्यूचा योग्य दिशेने उपयोग केला असता तर महिन्याला किमान २०० कोटी कमावले असते. पण जीवन पॅशन म्हणून जगायला आवडते. म्हणून लोकांचा विश्वास बसणार नाही अशा कल्पना मांडून त्या पूर्ण करण्यासाठी ताकद पणाला लावतो, असे गडकरींनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...