आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माझ्या भागात जातीयवाद केल्यास चोप दिला जाईल! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा इशारा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी पुण्यातील एका कार्यक्रमात जातीयवाद करणाऱ्यांना गर्भित इशारा दिला आहे. माझ्या भागात कुणी जातीयवाद केल्यास चोप दिला जाईल अशा शब्दांत केंद्रीय मंत्र्यांनी ठणकावले आहे. एवढेच नव्हे, तर हीच गोष्ट आपण आपल्या कार्यकर्त्यांना देखील सांगितल्याचे गडकरींनी स्पष्ट केले आहे. पिंपरी चिंचवड परिसरात पुनरुत्थान समरसता गुरुकुलमच्या कार्यक्रमात ते बोलत होते. समाजाला आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या एकत्रित आणायला हवे. यात जातीयवाद आणि धर्मवादाला जागा असूच नये असे मत केंद्रीय मंत्र्यांनी मांडले आहे.


जनता नेत्यांची धुलाई करते तेव्हा...
गेल्या काही दिवसांपासून भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आपल्या रोख-ठोक वक्तव्यांवरून चर्चेत आहेत. नुकतेच त्यांनी मुंबईत एका कार्यक्रमामध्ये बोलताना आश्वासने देऊन विसरणाऱ्या नेत्यांची खरडपट्टी काढली. सुवर्ण स्वप्ने दाखवणारे नेते जनतेला खूप आवडतात. परंतु, ते स्वप्न पूर्ण नाही झाल्यास तीच जनता अशा नेत्यांना चोप सुद्धा देते असे गडकरी म्हणाले होते. त्यांच्या या विधानावरून विरोधकांनी भांडवल केले. एवढेच नव्हे, तर गडकरींचा निशाणा पंतप्रधान नरेंद्र मोदी होते असा दावा सुद्धा केला. त्यानंतर गडकरींना आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देऊन ते विधान पंतप्रधानांसाठी नव्हते असे म्हणाले लागले.


कार्यकर्त्यांनो आधी कुटुंब, मग पक्ष...
एवढेच नव्हे, तर गडकरींनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना आधी कुटुंब नंतर पक्ष असा उपदेश दिला होता. भाजप कार्यकर्त्यांनी आधी कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या, कारण जो कुटुंबाची काळजी घेत नाही तो देशाची काळजी सुद्धा घेऊ शकत नाही असे गडकरी म्हणाले होते. यावर सुद्धा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसह अनेक काँग्रेस नेत्यांनी भाजपच्या पक्षश्रेष्ठी आणि पंतप्रधानांवर निशाणा साधला होता. गडकरींचे नेत्यांना धुलाई करणारे आणि कुटुंबावर आधी लक्ष देणारे हे दोन्ही विधाने पंतप्रधानांनाच लक्ष्य करून होते असा दावा काँग्रेस प्रवक्ते मनीष तिवारी यांनी केला होता.

बातम्या आणखी आहेत...