आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘घराणेशाही’ ही राजकारणातील कीड, पुण्याईवर तिकीट नकाेच : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे परखड मत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 नागपूर  - ‘सांप्रदायिकता’, ‘जातीयता’ आणि ‘परिवारवाद’ (घराणेशाही) ही सध्याच्या राजकारणाला लागलेली कीड आहे. सध्या महाराष्ट्र किंवा देशाच्या पातळीवरही जी घराणेशाही सुरू आहे, तो लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही. अनेक नेत्यांची मुले राजकारणात येत आहेत. तुम्ही कुणाचा मुलगा असणे हा गुन्हा नाही, हे मला मान्य. पण, निवडणुकीतील उमेदवारीची मागणी जनतेतून आली पाहिजे. ती आई-वडिलांच्या पुण्याईवर नको. याचा साऱ्याच राजकीय पक्षांनी अंतर्मुख होऊन विचार करावा. अगदी भाजपनेही..” असे परखड मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान व्यक्त केले.  

 


महाराष्ट्रातील अनेक नेत्यांची मुले आता निवडणुकीच्या राजकारण उतरत आहेत. पक्षातून संधी न मिळाल्यास दुसऱ्या पक्षात जाऊन संधी शोधत आहेत. या ताज्या घडामोडींवर भाष्य करताना गडकरी यांनी सर्वच राजकीय पक्षांत सध्या सुरू असलेल्या घराणेशाहीवर नाराजी व्यक्त केली. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी कायम चर्चेत राहिलेले नितीन गडकरी सध्या ‘इलेक्शन मोड’मध्ये आलेले दिसले. निवडणुकीच्या धामधुमीत अनेक प्रश्नांवर आपली परखड मते मांडताना वाद अाेढवून घेणाऱ्या गडकरींनी अापल्या फटकळ स्वभावाला मुरड घालून अत्यंत संयमाने उत्तरे दिली.

 

प्रश्न : युती होऊ नये असे भाजपमधील अनेक नेत्यांना वाटत होते?  
गडकरी : युतीचा आधार हिंदुत्व आहे. युती झाली नसती तर काय? हा मुद्दाच आता गौण आहे. सारे जण एकदिलाने कामाला लागले आहेत. महाराष्ट्रात भाजपची कामगिरी मागील निवडणुकीप्रमाणेच सरस राहील.  

 

 

प्रश्न :  मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, असे शरद पवार यांना वाटते?  
गडकरी : शरद पवार हे विरोधी पक्षाचे नेते आहेत. त्यांचे ते कामच आहे. त्यामुळे त्यांच्याकडून काय अपेक्षित? त्यांची मते विरोधी पक्ष नेत्याची आहे. 

 

 

प्रश्न : मोदींनंतर तुम्ही... या चर्चेबद्दल?  
गडकरी : मला वाटते की, या मुद्द्यावर भरपूर चर्चा झालेली आहे. पुन्हा बोलण्याची आवश्यकता वाटत नाही.  

 

 

प्रश्न : राज यांचा ‘मोदीमुक्त’ भारतचा नारा?  
गडकरी : कोणी काय बोलावे, हा ज्याचा-त्याचा प्रश्न. शेवटी त्यांनी ५० वर्षांत काय केले, आम्ही ५ वर्षांत काय करून दाखवले, याचीच परीक्षा या निवडणुकीत होणार. 

 

 

प्रश्न : तरीही भाजपला प्रचारात सर्जिकल स्ट्राइक्सचा आधार का घ्यावा लागतोय?  
गडकरी : देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा मुद्दा राजकीय होऊ नये. त्यावर राजकारण होऊ नये, असे माझे मत आहे. त्यामुळे मी अधिक बोलणार नाही.  

 

 

प्रश्न : लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशींसारखे दिग्गज नेते यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नाहीत?  
गडकरी
: पक्षाचा पार्लमेंटरी बोर्ड त्यावर निर्णय घेत असतो. त्यामुळे मला यावर प्रतिक्रिया व्यक्त करता येणार नाही.  

 

 

प्रश्न : भाजपमध्ये इतर पक्षांच्या उमेदवारांचे प्रचंड इनकमिंग सुरू आहे. यामुळे भाजपचे काँग्रेसीकरण तर होणार नाही?  
गडकरी : पक्षात लोक येतात, जातात. ते कामही करतात. ती प्रत्येक पक्षाची गरजही असते. शेवटी कोणाला पक्षात घ्यायचे, नाही घ्यायचे, हे राज्यातील पदाधिकाऱ्यांनीच ठरवायचे असते.

 

प्रश्न : स्वपक्षीयांच्या नाराजीचे काय?  
गडकरी :
शेवटी हा निर्णय पक्षाच्या राज्य शाखेने घ्यायचा आहे. असे निर्णय का घेतले जातात, याचे उत्तर राज्य शाखेचे लोकच देऊ शकतात. 

 

 

 

प्रश्न : विदर्भ राज्याचा मुद्दा संपला का?  
गडकरी : विदर्भाचा मुद्दा मुळीच संपलेला नाही. आम्ही विदर्भ राज्याचा ठराव घेतला होता. कालही त्याचे समर्थक होतो व आजही आहोत. विदर्भावर सातत्याने झालेल्या अन्यायापायी हा मुद्दा आला होता. आम्ही मोठ्या प्रमाणात तो अन्याय दूर करण्याचे काम केले आहे. 

 

 

प्रश्न : मग तुम्ही ‘विदर्भवाद्यांना ठोकून काढू’ ही भाषा कशासाठी वापरली?  
गडकरी : आमच्या सभेत येऊन आम्हाला बोलू द्यायचे नाही, हे कितपत योग्य आहे? लोकशाहीत असे अपेक्षित नाही. वारंवार सांगूनही विदर्भवादी ऐकत नव्हते. त्यामुळे नाइलाज म्हणून मला तसा इशारा द्यावा लागला.  

 

 

प्रश्न : शेतकऱ्यांच्या मालाला आजही पुरेसे दर नाहीत?  
गडकरी :
साखर, तांदूळ, डाळी अशा सर्वच बाबत देशात सरप्लस स्थिती आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दर ठरतात. दुर्दैवाने ते आपल्या हाती राहिलेले नाही. मात्र, शेतकऱ्यांसाठी जे काही करता येईल, ते सारे प्रयत्न सुरू आहेत.

 

 

 

प्रश्न : शेतीच्या क्षेत्रात सरकारने फार काही केले नाही, अशी टीका हाेत आहे?

गडकरी : हा आधीच्या सरकारांच्या ५० वर्षांतील धोरणांचा परिणाम आहे. आमच्या सरकारने १.८८ कोटी हेक्टर जमीन पाण्याखाली आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रात २६ प्रकल्प पंतप्रधान सिंचन योजनेअंतर्गत सुरू आहेत. बळीराजा योजनेत १०८ प्रकल्पांचे काम सुरू आहे. सिंचनासाठी आमच्या सरकारने ४० हजार कोटी रुपये दिलेत. 
 

 

 

प्रश्न : कुठल्या क्षेत्रात सरकार कमी पडले असे वाटते?

गडकरी : सर्वच क्षेत्रांत मोठी कामे झाली आहेत. शेवटी लोकांच्याही अपेक्षा वाढत असतात. ज्याच्याकडे सायकल आहे, त्याला स्कूटर पाहिजे असते. स्कूटर आहे त्याचे मर्सिडीझ बाळगण्याचे स्वप्न असते. अपेक्षांना अंत नाही. काम करत राहणे, हाच त्यावर सर्वोत्तम पर्याय आहे.

बातम्या आणखी आहेत...