आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूरकरांनी करून दाखविले!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर.. मराठवाड्यातील माेठं शहर... अलिकडे शिक्षणाची पंढरी झालेलं. पुणे, मुंबई, आैरंगाबादसह पश्चिम महाराष्ट्रातूनही विद्यार्थी इथे शिक्षणासाठी येतात. शहर तसं चांगलं; पण पाणी आणि कचऱ्याच्या प्रश्नानं बदनाम हाेऊ लागलं होतं. पाण्याची टंचाई येथील जनतेच्या पाचवीलाच पुजलेली. विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली तसं शहर विस्तारत गेलं. पाण्यासाठी तीन वर्षांपूर्वी चक्क ५० बाेग्यांच्या रेल्वेने ४५ लाख लिटर पाणी मिरजेहून लातूरला पाेहोचवलं गेलं. आजही परिस्थिती फारशी बदललेली नाही. पण पाण्याचा प्रश्न सुटत नाही ताेच लातूरकरांना कचऱ्याच्या समस्येने ग्रासलं. स्वच्छतेची यंत्रणा ताेकडी पडू लागली. मात्र, मागील दाेन वर्षांत असा काही चमत्कार झाला की पुन्हा एकदा लातूरचं नाव राष्ट्रीय पातळीवर चमकलं. ज्या कचऱ्याच्या समस्येने हैराण हाेते त्याच समस्येवर मात करत घनकचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून लातूरकरांनी नवा आदर्श राज्यातील इतर शहरांना घालून दिला आहे. स्वच्छ सर्वेेक्षणात राज्यात तिसरा क्रमांक पटकावलेल्या लातूरला नुकताच घनकचरा व्यवस्थापनातही राष्ट्रीय पातळीवरचा पहिला क्रमांक मिळाला आहे. 
स्वच्छ सर्वेेक्षणात महाराष्ट्राने सर्वाधिक ४५ पुरस्कार पटकावले आहेत. 


या यादीवर नजर टाकली तर माेठ्या शहरांना मागे टाकत ज्या २७ शहरांना कचरामुक्त शहरासाठी ‘थ्री स्टार’चा दर्जा देण्यात आलाय त्यात वैजापूर, संगमनेर, परळी, पंढरपूर, मंगळवेढा, मलकापूर आदी छाेट्या शहरांनी आघाडी घेतली आहे.  लातूरचेच उदाहरण घ्यायचे झाले तर लातूरमध्ये झालेला बदल हा काही एका रात्रीत झालेला नाही. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला आलेली मरगळ झटकावी लागली. लातूरकरांनीही मानसिकता बदलत यंत्रणेला साथ दिली. अर्थात, या अनुशंगाने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना राेखण्याचा प्रयत्नही झाला. त्यांना अडचणी आणल्या गेल्या. मात्र, प्रशासकीय अधिकारी खंबीर व निश्चयी असल्यास आणि जनतेनेही त्यांना साथ दिल्यास शहरांचे चित्र कसे पालटू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणून लातूरकडे पाहावे लागेल. पाणी आणि कचऱ्याचा बिकट बनलेला प्रश्न कसा साेडवला जाऊ शकताे यासाठीही लातूरचा आदर्श इतर शहरांनी घ्यावा. लातूरमध्ये महापालिका आयुक्त म्हणून रुजू झाल्यानंतर आयुक्त काैस्तुभ दिवेगावकर यांनी प्रथम शहराचे प्रश्न समजून घेतले. मुळात दिवेगावकर हे लातूरचेच असल्याने त्यांना शहराची स्थिती अन‌् नेमके काय बदल करायचेत याबाबत कल्पना हाेती. आधी त्यांनी याची रुपरेषा आखून घेतली. तसं पाहायला गेलं तर लातूर आणखी एका कारणासाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे ‘राजकारण’. यातूनही त्यांना मार्ग काढायचा हाेता. वर्षानुवर्षे स्थानिकांची मानसिकता बदलण्याचे माेठे आव्हानही त्यांच्या पुढ्यात हाेते.  


या साऱ्यातून मार्ग काढत त्यांनी सकाळी ज्या वेळी सफाई कर्मचारी वाॅर्डा-वाॅर्डात सफाई करतात त्या वेळी प्रत्येक वाॅर्डात फिरणे सुरू केले. स्वच्छता ताईंच्या माध्यमातून शहरात कचरा गाेळा केला जाताे. स्वच्छता मित्रांच्या माध्यमातून याचे वर्गीकरण केले जाते. यानंतर नांदगाव येथे कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते व त्यापासून खतनिर्मिती केली जाते. आधी ही यंत्रणा सुरळीत करत सफाई ताई, सफाई मित्र यांच्यामध्ये दिवेगावकर यांनी विश्वास निर्माण केला. याचसाेबत व्यापक प्रमाणात त्यांनी लातूरकरांमध्ये कचऱ्याविषयीची जागृती निर्माण केली अन‌् आज लातूरचे रुपडे पालटले आहे. आैरंगाबाद, पुणे, नाशिक, साेलापूर या साऱ्या मोठ्या शहरांमध्ये कचऱ्याचा प्रश्न बिकट बनला. आैरंगाबादमध्ये तर कचऱ्याच्या प्रश्नावरून दंगल झाली. पर्यटनाची राजधानी असतानाही शहरात कचऱ्याचे ढीग पाहायला मिळतात. येथे येणारा पर्यटक साेबत आठवणी घेऊन जाताे, त्याही कचऱ्याच्या. आैरंगाबाद व लातूरची तुलना हाेऊ शकत नाही. 


शहराचा विस्तार, लाेकसंख्या, भाैगाेलिक क्षेत्र या साऱ्यांमध्ये तर दाेनही शहरांत माेठी तफावत आहेच; पण इच्छाशक्तीचीही तफावत असल्याचे दिसून येते. दिवेगावकरांनी कचऱ्याचा निपटारा करायचे ठरवल्यानंतर त्यांना विराेध करणाऱ्या राजकीय पक्षांनीही एकत्र येत कचऱ्याविराेधात शड्डू ठाेकले हाेते. आैरंगाबादच नाही तर इतर माेठ्या शहरांमध्ये मात्र असे हाेताना दिसत नाही. राष्ट्रसंत तुकडाेजी महाराजांनी ग्रामगीतेच्या १३ व्या अध्यायात स्वच्छतेचा संदेश दिला आहे.. 
हात फिरे तेथे लक्ष्मी शिरे । हें सूत्र ध्यानीं ठेवोनि खरें । आपुलें ग्रामचि करावें गोजिरें । शहराहूनि ॥१॥
हें गांवीचे लोक विसरले । आळसाद्वारें दुर्दैव शिरलें । दैन्य दारिद्र्य सर्वत्र भरलें । गांवामाजीं ॥२॥
हा संदेश साऱ्यांनी पाळला आणि प्रशासकीय यंत्रणांना जर सामान्यांनी साथ दिली तर निश्चितच यंदा मिळालेल्या पुरस्कारांची संख्या ४५ वरून १०० पर्यंत जायला वेळ लागणार नाही. 


नितीन फलटणकर
- डेप्युटी एडिटर, ग्रामीण 

बातम्या आणखी आहेत...