Home | Editorial | Columns | nitin phaltankar article in marathi

निवडणुकीच्या ताेंडावर शिमगा

नितीन फलटणकर | Update - Mar 16, 2019, 10:14 AM IST

या माेर्चाला उत्तर द्यायला ग्राम पंचायतीत काेणीच नसल्याने संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर आपला सगळा राेष काढला.

 • nitin phaltankar article in marathi

  आैरंगाबाद जिल्ह्यातील फर्दापुरात गुरुवारी महिलांनी हंडा माेर्चा काढला. या माेर्चाला उत्तर द्यायला ग्राम पंचायतीत काेणीच नसल्याने संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर आपला सगळा राेष काढला. फर्निचरची माेठ्या प्रमाणावर माेडताेड करण्यात आली. मागील अनेक दिवसांपासून गावांमध्ये टँकर सुरळीत सुरू करावेत, अशी या महिलांची मागणी हाेती. तब्बल २५ वर्षांपासून ग्रामस्थ नळ याेजनेसाठी लढा देताहेत. मात्र, याकडे शासन, प्रशासन, काही नेते, अधिकारी कारणं पुढे करत दुर्लक्ष करत आहेत. पाऊस कमी झाल्याने जानेवारीपासूनच गावकऱ्यांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाण्याचा व्यवसाय तेजीत आहे. गावात वीसएक टँकरवाले पाण्याचा व्यवसाय करताय.


  पेट्राेल आणि डिझेलचे दर ज्या वेगाने बदलतात त्याहीपेक्षा फर्दापुरातील पाण्याच्या टँकरच्या दरांचा वेग जास्त आहे. या साऱ्याचा परिणाम म्हणजे फर्दापुरातील महिलांनी गुरुवारी व्यक्त केलेला राेष. मुळात यंदा (नेहमीप्रमाणेच) महाराष्ट्रातील ग्रामीण भागावर पावसाची अवकृपा राहिल्याने एेन उन्हाळ्यापूर्वीच पुन्हा एकदा ग्रामीण भागाला जलसंकटाचा सामना करावा लागत आहे. खरे तर ज्या पद्धतीने भारतात ऋतू परिवर्तन नित्याची बाब मानली जाते; त्याच धर्तीवर आता ‘नित्याचाच हा दुष्काळ’ असे म्हणण्याची वेळ आपल्यावर आली आहे. फर्दापूरकरांनाच केवळ दुष्काळाशी दाेन हात करावे लागताहेत असे नाही. मराठवाड्याचा विचार करता जवळपास सर्वच जिल्ह्यांवर जलसंकट आहे. ग्रामीण भागासह शहरेही यातून सुटलेली नाहीत. वाढत्या शहरीकरणामुळे शहरांवरील भार वाढत आहे. यंत्रणा जुनीच असल्याने तसेच ‘हाेतंय तेवढ्यात भागवा’ या मानसिकतेमुळे ‘नया है वह’ म्हणण्याची गरजच पडत नाही.
  मराठवाड्यातील जिल्ह्यांचेच घ्या ना. जालना आैद्याेगिक नगरी. गेल्या महिनाभरापासून मात्र प्यायच्या पाण्याची साेय हाेईना. जिल्ह्यात राेज किमान तीन ते चार टँकरची वाढ करावीच लागतेय. सध्या जिल्ह्यात २४६ गावांना ३०१ टँकरने पाणी पुरवले जाते. बीडची परिस्थितीही फारशी वेगळी नाही. जिल्ह्यातील ४०४ गावांत ५१६ टँकरने पाणी पुरवले जातेय. आष्टीमध्ये सर्वाधिक पाणीबाणी आहे. जिल्ह्यातील १४४ मध्यम-लघु प्रकल्पांतील ८२ प्रकल्प, तलाव मार्चच्या पहिल्या आठवड्यातच काेरडेठाक पडलेत. लातूरमध्ये पाणीटंचाई सामान्यांच्या इतकी अंगवळणी पडलीय की पाणी वेळेत आले तर नागरिकांना धक्का बसताे. उस्मानाबादमध्ये २५९ गावांमध्ये पाणीटंचाई असून, त्यासाठी ४१ गावांमध्ये ५४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सर्वाधिक पाणी टंचाई येडशीमध्ये असून, या गावाला ६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.


  नांदेडमध्ये इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जरा बरी परिस्थिती आहे. सर्वात माेठा जिल्हा असूनही सध्या नांदेडमध्ये ४३ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जाताेय. परभणी आणि हिंगाेलीतही अनेक गावांमध्ये टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा हाेताेय. महाराष्ट्राचा ग्रामीण भाग दुष्काळाने हाेरपळताेय. जळगाव जिल्ह्यातील ४६ गावांना ३४ टँकरद्वारे पाणी पाेहोचवले जातेय. अमळनेर, पाराेळा, जामनेर, पाचाेरा या तालुक्यांना टंचाईच्या सर्वाधिक झळा बसत आहेत. धुळ्यातील १५ गावांना टँकरने पाणी पाेहोचवले जातेय. यात शिंदखेडा तालुक्यात चुडाणे, सोनशेलू, कामपूर, वरूड घुसरे, विटाई, डाबली, मेलाणे, रहिमपुरे, झिरवे, निशाणे, तर धुळे तालुक्यात फागणे व वडजाई गावात टँकर सुरू आहेत. नैसर्गिकदृष्ट्या सधन असलेल्या नाशिकमधील मालेगावकरांनाही पाण्याचा फटका बसताेय. २१ गावे अन‌् ६८ वाड्यांना टँकरने पाणी पुरवावे लागतेय. नाशिकच्या १४ तालुक्यांचा विचार करता १३८ गावे, ४४० वाड्यांवर १४० टंॅकरच्या माध्यमातून पाणी पुरवले जातेय. सोलापूर जिल्ह्यात एकूण ११३ टँकर सुरू आहेत. प्रामुख्याने माढा तालुक्यातील मोडनिंब, कुर्डु आणि करमाळा तालुक्यातील बिटरगाव येथे पाण्यासाठी आंदोलने होताहेत. अक्कलकोटमध्ये नियोजनाअभावी कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील सुरू असलेल्या ११३ टँकरपैकी एकट्या मंगळवेढा तालुक्यात ४१ टँकर सुरू करण्यात आले आहेत.


  एकीकडे निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच दुसरीकडे सामान्यांना मात्र पाण्यासाठी वणवण भटकावे लागते आहे. निवडणुकांची जंत्री वाजताना पाण्यासाठीचा हा शिमगाच त्यांच्या नशिबी आहे. याला दुसरे काय म्हणावे? वारंवार उपाय-याेजना करूनही ग्रामीण भागाला दरवर्षी जलसंकटांचा सामना करावा लागताे. जलयुक्त शिवार याेजनेच्या यशस्वीतेच्या दाव्यांनंतरही ग्रामीण भागातील परिस्थिती फारशी बदलेली नाही. नद्या, नाले, विहिरींना भलेही पाणी नसेल; पण ग्रामीण जनतेच्या डाेळ्यात मात्र ते काठाेकाठ साचलेय.


  नितीन फलटणकर
  - डेप्युटी एडिटर, ग्रामीण

Trending