आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ये पाप है ना शाप है, ये तो जंतु का प्रताप है...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नितीन श्रीवास्तव,

कुष्ठरोग शोध अभियानानिमित्त माणूस म्हणून आपण आता या अभियानात सहभागी होऊन कुष्ठरोग निवारण्यासाठी पाऊल उचलणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे
 
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांत संयुक्त कुष्ठरोग शोध अभियान, सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम व असंसर्गजन्य प्रतिबंध जागरूकता अभियान १३ ते २८ सप्टेंबर या कालावधीत सर्व ग्रामीण, शहरी व निवडक कॉर्पाेरेशन क्षेत्रात राबवण्यात येते आहे. या अभियानादरम्यान तालुक्यातील ग्रामीण, शहरी व निवडक कॉर्पाेरेशन क्षेत्रातील घरांना आरोग्य कर्मचारी  भेट देऊन कुष्ठरोग निर्मूलनाकरिता सर्वेक्षण करत आहेत. कुष्ठरोग उपचारावरील, क्षयरोग, एमडीआर रुग्ण व समाजातील निदान न झालेले कुष्ठरोगी लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरित बहुविध औषधोपचाराखाली आणण्यात येणार आहे. क्षयरोगाच्या निदानाकरिता, क्षयरोगाच्या निदानाअभावी अद्यापही वंचित असणाऱ्या क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांना औषधोपचार देण्यात येणार आहेत. 

महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्य चळवळीबरोबरच कुष्ठरोग्यांच्या सेवेला महत्त्वाचे स्थान देऊन कुष्ठरोग निर्मूलन कार्यात मोठे योगदान दिले. ३० जानेवारी हा त्यांचा महानिर्वाणाचा दिवस ‘कुष्ठरोग निवारण दिन’ म्हणून देशात सर्वत्र साजरा केला जातो.

१९५५ सालापासून भारतात ‘राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम’ अस्तित्वात आला. १९८३ सालापासून या रोगावर ‘बहुविध औषधोपचार’ पद्धती उपलब्ध झाली. समाजाची कुष्ठरोगाबाबतची मानसिकता हाच कुष्ठरोग निर्मूलन कार्यात मोठा अडथळा आहे. समाजात या रोगाविषयी आजही भीती, गैरसमज, अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात आहे. समाजातील प्रत्येक घटकाला कळायला हवे की, कुष्ठरोग हा जंतूंमुळे होणारा इतर रोगांसारखा एक रोग आहे. तो केवळ श्वासोच्छ‌्वासावाटेच होतो. याचे जंतू शरीरात गेल्यास या रोगाची लक्षणे दिसून येण्यास जवळपास तीन ते पाच वर्षांचा काळ जातो. 

कुष्ठरोगाचा पूर्वजन्माचे पाप, दैवी शाप अथवा अानुवंशिकता यांच्याशी काही संबध नाही, हे लोकांना समजून सांगायला हवे. रोगाच्या लक्षणांवरून कुष्ठरोगाचे दोन प्रकार पडतात.

१) सांसर्गिक : या प्रकारात शरीरावरील त्वचेच्या रंग व पोतात बदल होऊन त्वचा तेलकट, चकाकणारी, जाडसर गुळगुळीत, लालसर होते. बारीक असंख्य चट्टे उमटतात.मज्जातंतू रोगग्रस्त होऊन जाड व दुखरे होतात. हातापायांना बधिरता येते. हातापायाचे स्नायू कमकुवत होतात. स्नायूंची झीज होऊन विकृती निर्माण होते.

२) असांसर्गिक : या प्रकारात प्राथमिक अवस्थेत न खाजवणारा, न दुखणारा फिकट, लालसर सपाट/उंचावलेला लहानमोठा बधिर चट्टा/चट्टे शरीराच्या कोणत्याही भागावर एक किंवा एक ते पाच चट्टे असू शकतात. 
पूर्वीच्या काळी कुष्ठरोग्याला अतिशय हीन दर्जाची वागणूक दिली जायची. डॉक्टरसुद्धा कुष्ठरोग्याला हात न लावता, न तपासता औषध देत तसेच शर्टच्या बाहीवरून इंजेक्शन देत. बाबा आमटे यांनी समाजाने वाळीत टाकलेल्या कुष्ठरोग पीडितांना जवळ केलं. त्यांना अभिमानाने जगण्याची कला शिकवली. बाबा आमटे हे कुष्ठरोगातील गरीब जनतेच्या पुनर्वसन आणि सशक्तीकरणासाठी कार्य करणारे कार्यकर्ते होते. देशात मार्च २०१२ अखेरीस एक लाख २६ हजार ८०० कुष्ठरुग्ण असल्याची माहिती आहे. जगात २ लाख १५ हजार ४९८ कुष्ठरुग्ण आहेत. म्हणजेच जगातील ५५.५ टक्के कुष्ठरुग्ण भारतात आहेत. महाराष्ट्रातच २०१० मध्ये १५ हजार ४९८ कुष्ठरुग्ण आढळले होते. जीवघेण्या कुष्ठरोगाबाबत करण्यात येत असलेले समाजप्रबोधन, जनजागृती, स्पर्श मोहीम यासह इतर प्रभावी उपयोजनांमुळे बुलडाणा जिल्ह्यातून कुष्ठरोग हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे.  सर्व रुग्णांवर औषधोपचार होत असल्यामुळे तेसुद्धा या जीवघेण्या आजारातून बरे होत आहेत. 
वन्यजीव सोयरे बुलडाणा यांनी कुष्ठरोगाबाबत जनजागृती करण्यासाठी चित्रफीत तयार केली आहे. ही चित्रफीत यूट्यूबवर “KUSHTH ROG SURAJ” टाइप केल्यास आपल्याला पाहायला मिळेल.

लेखकाचा संपर्क : ९४२१४९४०४०

बातम्या आणखी आहेत...