आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागतिक आरोग्य संघटनेतर्फे १० जुलै हा सुरक्षित मातृत्व दिन म्हणून साजरा केला जातो. गर्भधारणा, गरोदरपण, प्रसूती आणि प्रसूतीपश्चात देखभाल या सर्व चक्रादरम्यान स्त्रियांचं मानसिक, भावनिक आणि शारीरिक आरोग्य सुदृढ असावं, कुटुंब, समाजाला याची जाणीव व्हावी हा यामागचा उद्देश. सुरक्षित मातृत्वाचं महत्त्व सांगणारा हा लेख.
आधुनिक आणि विज्ञान तंत्रज्ञानाच्या जोरावर आज देशानं प्रगतीचे शिखर गाठले आहे. तरीही देशात बालमृत्यू आणि मातामृत्यूचे प्रमाण वाढतेच आहे. बालमृत्यू आणि मातामृत्यू प्रमाण कमी होण्याच्या दृष्टीने शासनही उपाययोजना करत आहे. वास्तविक भारतात गर्भधारणेपासून ते बाळाच्या जन्मापर्यंत मातेचे संगोपन आवश्यक त्या पद्धतीने केले जात नाही. देशात आजही मुलींचे विवाह १४ ते १६ या वयात होतात. ग्रामीण तसेच आदिवासी भागात हे प्रमाण अधिक आहे. लग्नानंतर वर्ष-दोन वर्षांतच या अल्पवयीन मुलींना मातृत्व प्राप्त होते. वयाच्या २० वर्षांच्या आत मातृत्व प्राप्त झाल्यास गरोदरपणात किंवा बाळंतपणात स्त्रीचा मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळेच अल्पवयीन मातांच्या बालमृत्यूचे प्रमाणही जास्त आहे. अशा वेळी जन्मणारी बालके कमी वजनाची, अपुऱ्या दिवसांची जन्माला येतात. अशा जन्मणाऱ्या बालकांच्याही जिवालादेखील जास्त धोका असतो. मुलींचा विवाह वयाच्या १८ वर्षांनंतर झाला, मातृत्व २० व्या वर्षी आले तर हे धोके टाळता येतात. स्पर्धेच्या युगात तरुण मंडळींचे विवाह विविध कारणांमुळे उशिरा होतात. त्यामुळे वयाच्या ३५ नंतर मातृत्व प्राप्त होणाऱ्या स्त्रीच्या जीवनाला गरोदरपणात, बाळंतपणात दोष व उणीव निर्माण होऊ शकतात. त्यामुळे उशिराचं मातृत्व टाळावं. गर्भधारणेदरम्यान मातेच्या आरोग्याबाबत, पोषण आहाराबाबत विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. या काळात गरोदर मातेच्या अन्नाची गरज वाढती असते. गर्भवती, बाळापर्यंत केवळ अन्न घटकच पोहोचवत नाही, तर प्राणवायूही पोहोचवते. त्यासाठी दूध, दुधाच्या पदार्थांचा भरपूर प्रमाणात आहारात समावेश असायला हवा. गर्भावस्थेतील सुरुवातीच्या तीन महिन्यांत उलट्या आणि मळमळीमुळे गर्भवती माता हैराण होतात. पुढच्या ६ महिन्यांत गर्भाशयाच्या वाढत्या आकारामुळे जठराची अन्न साठवण्याची क्षमता कमी होत जाते व आतड्यातून प्रवास करण्याचा अन्नद्रव्यांचा वेग कमी होतो. त्यामुळे पचन संस्थांच्या अनेक तक्रारींचा विचारदेखील आहाराच्या दृष्टीने केला पाहिजे. सहज पचन होईल असा परिपूर्ण आहार घेतले पाहिजे. नियमित वैद्यकीय तपासणी करायला हवी. शासनाने विविध योजना आखलेल्या असल्या तरी त्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवून मातृसुरक्षा जागृती करणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे
सुरक्षित मातृत्वासाठी...
> अन्नातील आहार द्रव्यांतील सहा घटकांचा म्हणजे प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कार्बोदके, जीवनसत्त्वे, खनिजे आणि पाणी यांचा विचार करून आहार नियोजन करावे.
> पाणी उकळून, गार केलेलेच द्यावे.
> गर्भवतीच्या आहारात कॅल्शियम व लोहयुक्त अन्नपदार्थांचा अधिक समावेश करावा.
> गर्भवतीच्या नियमित आणि पुरेशा प्रमाणात पाणी पिण्याकडे लक्ष द्यावे.
> गर्भवतींनी चहा, कॉफी आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळावे.
> गर्भवतींनी प्रसन्न, आनंदी राहावे. पुरेशी विश्रांती, वाचन, संगीत ऐकणं अशा स्वत:ला आवडणाऱ्या छंदात मन गुंतवून ठेवावे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.