आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा टीडीआर घोटाळा : शाखा अभियंत्यासह लिपिक अटकेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मनपाच्या टीडीआर घोटाळ्याचा आर्थिक गुन्हे शाखा तपास करत आहे. मात्र, ज्यांच्या सहीने टीडीआर वाटप झाला, असे उपायुक्त वसंत निकम व अतिक्रमण विभागप्रमुख ए. बी. देशमुख यांना जबाब नोंदवून सोडून दिले असून ज्यांचे काम फक्त संचिका हलवण्याचे आहे, त्यांना मात्र बुधवारी अटक करण्यात आली आहे. लिपिक मझहरअली मोहंमद अली, शाखा अभियंता शिवदास भगू राठोड अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. 

 

शहर विकास आराखड्यात मालमत्तेचे क्षेत्र बाधित हाेऊन मावेजा घेऊनही पुन्हा लाभ मिळवण्यासाठी बनावट प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवल्याच्या प्रकरणात या दोघांचा सहभाग असल्याचे पुरावे हाती लागल्यानंतर ही कारवाई करण्यात आली, असे पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले यांनी सांगितले. दरम्यान, या दोघांना न्यायालयात हजर केले असता प्रथम वर्ग न्यायादंडाधिकारी गजाला अल अमोदी यांनी त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश दिले. यापूर्वी एका माजी नगरसेवकालाही अटक करण्यात आली हाेती. नंतर ताे जामिनावर सुटला. 

 

असे आहे प्रकरण :

या प्रकरणी मनपा शाखा अभियंता प्रभाकर दत्तात्रय पाठक यांच्या तक्रारीवरून २१ नाेव्हेंबर २०१६ राेजी सिटी चाैक पाेलिसांनी गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार, १९७५ मध्ये मंजूर विकास आराखड्यानुसार गांधी पुतळा शहागंज-मंजूरपुरा-लाेटाकारंजा व लेबर काॅलनी ते विश्वासनगरपर्यंत १५ मीटर रुंदीचा रस्ता मंजूर आहे.

 

मनपा टीडीआर घोटाळा : शाखा अभियंत्यासह... 
विकास आराखड्यात नगर भूमापन क्रमांक ७६६१ माेहल्ला मंजूरपुरामधील इमारतीचे १४४.८० चाै. मी. (१२ मीटर रुंद रस्ता) क्षेत्र बाधित झाले आहे. विकास आराखड्यानुसार हे क्षेत्र बाधित हाेत असल्यामुळे ९ जानेवारी १९९७ राेजी अर्जदार सर्फराज चेंबर्सच्या तत्कालीन भागीदारांनी हे बाधित क्षेत्र मनपास हस्तांतरित करण्याबाबत पत्राद्वारे कळवले. त्यानुसार माेहंमद अली साजेद माेहंमद अब्दुल सत्तार यांना मनपाकडून बाधित क्षेत्रासाठी ८ लाख २५ हजार रुपये अदा करण्यात आले. बाधित क्षेत्राचे भागीदार खतिजा बेगम माेहंमद अब्दुल साजेद व इतर वारसांना याबाबत माहिती हाेती. तरी खतिजा बेगम माेहंमद अब्दुल साजेद व इतर भागीदारांमार्फत या जागेचे आम मुख्त्यार अब्दुल सिकंदर अब्दुल साजेद यांनी २६ जून २०१६ राेजी जागेच्या मिळकतीचा टीडीआर (ट्रान्सफर आॅफ डेव्हलपमेंट राइट्स- हक्क हस्तांतरण) स्वरूपात १८ लाख ९० हजारांचा माेबदला मिळवण्यासाठी बनावट प्रस्ताव मनपाला सादर केला. याप्रकरणी खतिजा बेगम व त्यांचा मुलगा अब्दुल सिकंदर अब्दुल साजेद यांच्यावर मनपाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. 

 

कोरा अर्ज स्वीकारला 
याप्रकरणी दाखल गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केल्यानंतर केलेल्या चाैकशीत मावेजा मिळवण्यासाठी केलेला अर्ज पूर्णपणे काेरा हाेता. त्यावर फक्त अर्जदाराच्या स्वाक्षऱ्या हाेत्या. अर्ज अपूर्ण असताना मझहर अली यांनी काेणतीही खात्री न करता ताे अर्ज स्वीकारून त्यावर आवक क्रमांक टाकून ताे अर्ज शाखा अभियंता शिवदास राठाेड यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी दिला. 

 

खात्री न करता नाेंदही केली 
राठाेड यांनीही खात्री न करता कार्यालयीन नाेंद केली. यासंदर्भात मनपाकडून एक जाहीर प्रगटन प्रसिद्ध करण्यात आले हाेते. त्यावर किशाेर भालसिंग राजपूत यांनी आक्षेप घेतला. त्यावरून प्रकरणाची चाैकशी झाली. तपासात मुख्य आराेपीला आर्थिक फायदा व्हावा, हे निष्पन्न झाल्याने शिवदास राठाेड व मझहर अली यांना आर्थिक गुन्हे शाखेचे अटक केली. ही कारवाई नवले यांच्या मार्गदर्शनाखाली कारभारी गाडेकर व गणेश शिंदे यांनी केली. 

बातम्या आणखी आहेत...