आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारवी गाडेकर
औरंगाबाद - आयुर्वेदाच्या नावाखाली ९५ टक्के पुत्रप्राप्तीचा दावा करणाऱ्या महिला डॉक्टरविरुद्ध कारवाई करण्यास मनपा आरोग्य विभाग १० महिन्यांपासून सपशेल अपयशी ठरला आहे. विशेष म्हणजे डॉक्टरवर खटला दाखल करण्यासाठी मनपाने राज्य कुटुंब कल्याण विभागाला पत्र पाठवून ८ महिने उलटले असतानाही त्याचे उत्तर आले नसल्याची माहितीही समोर आली आहे.
आयुर्वेदिक औषधाच्या माध्यमातून नाकपुडीत थेंब टाकायचे. यानंतर एक मंत्र देत याचा जप केल्यास गर्भवती महिलेच्या पोटी ९५ % मुलगाच जन्माला येईल, असा दावा करणाऱ्या महिला डॉक्टरचा ‘दिव्य मराठी’ने पर्दाफाश केला. या वृत्ताने संपूर्ण आरोग्य यंत्रणा कामाला लागली. प्राप्त पुराव्याच्या आधारे डॉ. जोशींवर खटला दाखल करण्यापूर्वी मनपाने राज्य कुटुंब कल्याण आयुक्त कार्यालय पुणे यांना लेखी पत्र पाठवून खटला दाखल करण्यासंदर्भात मार्गदर्शन मागवले. मात्र आठ महिन्यांपासून शासनाने कोणताच अभिप्राय मनपाला दिला नाही. याबाबत मनपा आरोग्य विभागाने विचारणाही केली नाही. या उलट पुरावे नसल्या कारणाने चौकशी समितीने प्रकरण बंद केले असल्याचे सांगितले. त्यामुळे एकूण या प्रकरणात दोषी डॉक्टरला अभय देण्यात येत आहे की काय, असा प्रश्न उपस्थिती होत आहे.
असा आहे घटनाक्रम
राजाबाजार येथे डॉ. सुषमा जोशी या महिला डॉक्टरचा आयुर्वेदिक दवाखाना होता. नंतर त्यांनी आपल्या राहत्या घरीच प्रॅक्टिस सुरू केली होती. विविध उपचारांसह डॉ. जोशींनी आयुर्वेदाच्या नावाखाली गर्भवती महिलेच्या नाकपुडीत औषध सोडून ९५ % मुलगाच होईल, असा दावा केला हाेता. आयुर्वेदाच्या नावाखाली सुरू असलेल्या या थोतांडाचा ‘दिव्य मराठी’ने स्टिंग ऑपरेशन करुन ७ एप्रिल रोजी पर्दाफाश केला. दरम्यान महापालिकेच्या आरोग्य विभाग जोशींच्या बंगल्यावर मनपाच्या समितीमधील डॉ. अमरज्योती शिंदे, डॉ. एस. के. कराड यांनी धाड टाकली होती. झाडाझडती घेऊन प्राप्त पुरावे हस्तगत केले होते. आरोग्य विभागाने डॉ. जोशींविरुद्धचे सर्व पुरावे एकत्रित करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. हे प्रकरण पीसीपीएनडीटी समितीपुढे ठेवण्यात आले होते. मात्र पुरावे सापडत नसल्याने मनपा चौकशी समितीने केस ‘क्लोज’ केल्याचे सांगितले. मनपाने उपलब्ध पुरावे राज्य कुटुंब कल्याण विभाग पुणे आयुक्तांना १५ जून रोजी पाठवून खटला दाखल करण्यासंदर्भात अभिप्राय मागवला होता. मात्र अद्यापही या पत्राचे उत्तर आले नसल्याचे समोर आले आहे.
मार्गदर्शन येताच कारवाई
आम्ही प्राप्त पुराव्याच्या अनुषंगाने डॉ. जोशींवर काय कारवाई करता येईल याबाबत मार्गदर्शन मागवले आहे. अद्याप आम्हाला उत्तर मिळाले नाही. कारवाई करण्यासाठी आमच्याकडेही ठोस पुरावे नाहीत.
डॉ. अमरज्योती शिंदे, चौकशी अधिकारी, मनपा.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.