आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चाैकशी गुंडाळलेल्या प्रकरणांत अद्याप एकही गुन्हा दाखल नाही

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर/अमरावती : सिंचन घोटाळ्यात लाचलुचपत विभागाकडून नस्तीबंद केलेल्या अमरावती विभागातील एकूण ९ प्रकरणांत अद्यापपर्यंत एकही गुन्हा दाखल नाही. विभागातील जिगाव (जि. बुलडाणा), रायगड, वाघाडी, व निम्न पेढी (जि. अमरावती) या प्रकल्पातील बांधकामाच्या अनियमिततेबाबत कंत्राटदारांविरुद्ध मात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी नागपूर येथील जनमंच संस्थेच्यावतीने चौकशीसाठी हायकोर्टात याचिका दाखल झाली. यानंतर नागपूर विभागातील प्रकल्पासह अमरावती विभागातील २८ प्रकल्पांच्या चौकशीचे आदेश कोर्टाने दिले होते. त्यानुसार एसीबीने चौकशी करून अहवाल वरिष्ठांकडे सादर केला आहे.

शपथपत्रातही उल्लेख


उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आतापर्यंत सिंचन घोटाळ्यातील तपास अहवाल न्यायालयात सादर करावा लागतो. एखाद्या प्रकरणात पुरावा मिळाला नाही तर ते प्रकरण बंद करण्यात येते. तसे शपथपत्राच्या माध्यमातून न्यायालयास कळवावे देखील लागते. एसीबीने यापूर्वीच शपथपत्रातून ही बाब मांडली आहे, याकडे सूत्रांनी लक्ष वेधले.

या प्रकरणांत अजित पवारांवर आरोप

1 सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांच्यावरील आरोप झालेल्या प्रकरणांत प्रामुख्याने नागपूर विभागातील गोसेखुर्द व संलग्नित प्रकल्पांचा तसेच अमरावती विभागातील जिगाव, वाघाडी, रायगड बराज, निम्नपेढी या ४ प्रकल्पांच्या कामांचा समावेश आहे. या प्रकरणांची चौकशी नागपूर आणि अमरावती एसीबीकडून सुरु आहे.


2 अमरावती विभागातील प्रकल्पांमधील घोटाळ्यांसंदर्भात सामाजिक कार्यकर्ते अतुल जगताप यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यात जलसंपदा खात्याचे मंत्री अजित पवारांनी स्वत:च्या प्रभावाचा वापर करून राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार संदीप बाजोरिया यांच्या बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीला या प्रकल्पांच्या कामांचे नियमबाह्य कंत्राट दिले, असा मुख्य आरोप आहे.

3 कामांच्या निविदांत अनुभवाची अट प्रमुख होती. बाजोरिया यांच्या कंपनीकडे कामाचा अनुभव नसल्याने ते कंत्राटासाठी अपात्र होते. मात्र, कंत्राटासाठी बनावट प्रमाणपत्रे सादर केली. निविदांच्या किमती महिनाभरातच १८ ते २४ टक्क्यांनी वाढवून दिल्या. मोबिलायझेशन अॅडव्हान्सची तरतूद नसताना तो दिला गेला. असाही आरोप आहे. या सर्व प्रकरणांची चौकशी सुरु असल्याचे एसीबीकडून सांगण्यात आले.

4 नागपूर एसीबीकडून गोसेखुर्द प्रकल्पांशी संबंधित निविदांची चौकशी सुरू आहे. एसीबीचे माजी संचालक संजय बर्वे यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या शपथपत्रात नेमक्या गोसेखुर्दच्या कामांमध्येच अजित पवार यांच्या संशयास्पद भूमिकेकडे अंगुलीनिर्देश केले गेले आहेत. या प्रकरणांची चौकशीही सुरू असल्याची माहिती एसीबीच्या नागपूर विभागाच्या अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी दिली.
 

नागरिकांमध्ये विनाकारण संभ्रम

नस्तीबंद केलेल्या ९ प्रकल्पांशी अजित पवार यांचा कोणताही संबंध नाही. सदर प्रकरणे नस्तीबंद करून ते जाहीर करण्याची ही वेळ नव्हती. यामुळे विनाकारण सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. - शरद पाटील, याचिकाकर्ते, नागपूर

बातम्या आणखी आहेत...