आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा एकही रुग्ण नाही, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • देशात कोरोनाचे 28 रुग्ण, राज्यात अद्याप एकही रुग्ण सापडला नाही

मुंबई - जगासह भारतातही लोकांची झोप उडवणाऱ्या कोरोना व्हायरसपासून महाराष्ट्र अजुनही सुरक्षित असल्याचा दावा सरकार करत आहे. राज्यात आतापर्यंत कोरोना व्हायरसचा एकही रुग्ण सापडलेला नाही. तरीदेखील, खबरदारी म्हणून नागरिकांनी मास्क किंवा स्वच्छ धुतलेला रुमाल वापरावा,  अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज विधानपरिषदेत दिली.


पुढे ते म्हणाले की, "जगभरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण केवळ अडीच ते तीन टक्के असून या विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यशासनाने आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या आहेत. समाजमाध्यमांवर चुकीचे संदेश पसरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश सायबर क्राईमला दिले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत एकही संशयीत रुग्ण आढळला नाही. नागरिकांनी घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही. सर्वांनी एकत्रितपणे या विषाणूचा मुकाबला करु. राज्यात पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नका," असा सल्ला देखील यावेळी त्यांनी दिला.

देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 28 पर्यंत पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी बुधवारी ही औपचारिक आकडेवारी जारी केली. सोबतच, आतापर्यंत केवळ 12 देशांतून भारतात येणाऱ्यांची चाचणी घेतली जात होती. आता मात्र भारतात येणाऱ्या प्रत्येकाची चाचणी घेतली जाईल असे केंद्र सरकारने सांगितले. कोरोनावर महाराष्ट्रात काय बंदोबस्त करण्यात आले असा सवाल टोपे यांना विचारण्यात आले. त्यावर बोलताना टोपे म्हणाले, आम्ही या व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी सतर्क आहोत. आतापर्यंत कोरोनावर कुठल्याही प्रकारचे औषध निर्माण झालेले नाही. त्यामुळे, आधीच उपाययोजना केल्यास सर्वोत्तम ठरेल. याच दिशेने महाराष्ट्र सरकारने प्रत्येक जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र वार्ड तयार केले आहेत. तसेच प्रत्येक रुग्णालयात 10 अतिरिक्त बेड लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.